Tuesday, April 8, 2008

अमोना रे

परवा संध्याकाळी कुमारांचा दुर्गा ऐकत होतो. हा दुर्गा आधीही बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे. मित्राने त्याच बंदिशीची एक concert recording दिली होती म्हणून नवीन उत्साहाने ऐकत होतो. या रेकॉर्डिंगमध्ये कुमारांनी अमोना या शब्दाचा अर्थ 'अ मौना - मौन सोडलेला' असा सांगितला आणि सहज विचार केला की कुमारांनी मौन कधी पकडले असेल आणि ते का सोडले असेल? आयुष्यातील घटनांवर बंदिशी कुमारांनी बऱ्याच रचल्या आहेत. या घटना विशेष असतील किंवा सहज घडणाऱ्या असतील. उदाहरणार्थ - फेर आई मौरा अंबुआपे (बागेश्री) ही बंदिश त्यांनी पत्नी भानुमती निवर्तल्यावर तिची आठवण आल्यावर रचलेली आहे तर करन दे रे कछु लला रे (श्री) ही नातवाला खेळवताना रचलेली आहे.

अचानक मनात विचार आला की ज्या मौनाबद्दल कुमार बोलत आहेत ते मौन गाण्यातले तर नाही? कुमार त्यांच्या ऐन तारुण्यात काही वर्षे क्षयामुळे आजारी होते. डॉक्टरांनीत्यांना गायला मनाई केली होती. काही काळानंतर (अंदाजे ५-७ वर्षांनंतर) कुमारांनी पुन्हा गायला सुरूवात केली. माझ्या मते त्या वेळेच्या भावना कुमारांनी या बंदिशीत व्यक्त केल्या आहेत. ती बंदिश खालीलप्रमाणे :

अमोना रे अबु रे
बन गया मै का कहूं रे

सुरन के रंग सो
समझ लो मै का कहूं रे

अबु = अब, सुरन = सुर

मला भावलेला बंदिशीचा अर्थ :
खूप काळ गात नसल्यामुळे कुमारांनी त्याला मौनाची उपमा दिली आहे. गाणे पुन्हा गायला सुरू केल्यावर हे मौन सुटलेले आहे. मधल्या काळात कुमार गात नसले तरी चिंतन चालू होतेच. किंबहुना त्या काळात कुमारांनी जे चिंतन केले त्याचा परिणाम त्यांचे गाणे परिपक्व होण्यात दिसून आला. पण मधल्या काळातले चिंतन व्यक्त करता येत नसल्यामुळे किंवा प्रयोग करून बघता येत नसल्यामुळे त्यांच्यातल्या कलाकाराची अवस्था मौनाचे व्रत घेतलेल्या साधकाप्रमाणे असेल. अशा अवस्थेत असताना एक दिवस मौन सुटले आणि काय काय बोलु अशा स्थितीत कुमार आहेत.
त्यांच्यासारख्या सिद्धहस्त गायकाला भावना व्यक्त करण्यासारखे दुसरे माध्यम तरी कोणते असणार? म्हणुनच बंदिशीच्या अंतऱ्यात कुमार म्हणतात की माझे सुरच माझी भावना व्यक्त करत आहेत. यापलीकडे मी काय बोलणार? कुठल्याही कलाकारासाठी स्वतःची कला व्यक्त न करता येण्यासारखे दुःख नाही. साहजिकच गाणे गायची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्यानंतर झालेला अतिशय आनंद कुमार या बंदिशीमध्ये सांगत आहेत.

शास्त्रीय संगीताच्या बाबतीत फार कमी वेळेस असं होतं की बंदिशीचा भाव गाण्यात तंतोतंत उतरतो (हे माझ्यापुरतं तरी खरं आहे). अशा फार कमी बंदिशीमध्ये मला या बंदिशीचा समावेश करावासा वाटतो.

मी फारसा आस्तिक माणूस नाही. त्यामुळे ब्लॉगची सुरूवात करताना श्रीगणेशा वगैरे न लिहीता करता कुमारांसारख्या श्रेष्ठ गायकाच्या एखाद्या बंदिशीने सुरूवात करता आली याचा मला आनंद आहे. मी लावलेला या बंदिशीचा अर्थ बरोबर / चूक किंवा अंशतः बरोबर असेल याची मला पूर्ण जाणीव आहे. तपशीलात काही चुका असण्याची शक्यता आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि कवितांचा एक साधारण रसिक एवढीच माझी लायकी आहे. इथून पुढे जसे जमेल तसे गाण्यावर व कवितांवर लिहीण्याचा विचार आहे. तोअनियमित राहील याची मी पुरेपुर काळजी घेईन.