Sunday, June 22, 2008

Stages of listening

मागच्या पोस्ट मधे गाणे ऐकण्याच्या modes बद्दल लिहीले होते. तसेच माझ्यामते गाणे ऐकण्याच्या तीन stages/ पायऱ्या आहेत. पहिली पायरी - गाणं आवडणं आणि त्यातील technicalities न कळता/माहीत नसतानाही गाण्यातला भाव तुमच्यापर्यंत पोचणे.उदाहरणार्थ गीतरामायणाचे संगीत हे पूर्णपणे रागसंगीतावर आधारलेले आहे. पण गीतरामायण ऐकताना त्यातील technicalities समजून घ्यायची मुळीच गरज भासत नाही. दुसरे उदाहरण म्हणून किशोरी आमोणकरांची 'सहेला रे' ही बंदिश घेऊ या. त्यातील राग भूप आहे की भूपाचा variant आहे हे समजून घेण्याची गरज भासत नाही. त्याशिवायही तो enjoy करता येतो.
दुसरी पायरी - गाण्याच्या तांत्रिक बाबी समजून गाणे enjoy करणे. यामध्ये मी analytical pleasure मध्ये सांगितलेल्या बहुतेक बाबी येतात. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या / समजणाऱ्या काही व्यक्ती या तांत्रिक बाबींमुळे शास्त्रीय संगीतच सर्वश्रेष्ठ आहे असे मानू लागतात. इथे शास्त्रीय संगीत great नाही असे मला म्हणावयाचे नाही. शास्त्रीय संगीतासाठी लागणारी साधना आणि बुद्धिमत्ता ही सोपी गोष्ट नाही. पण त्यामुळे शास्रीय संगीतच सर्वात श्रेष्ठ आणि बाकीचे संगीत कमी दर्जाचे हा विचार मला मान्य नाही. सांगायचा मुद्दा हा की तांत्रिक बाबी कळू लागल्या की त्यातच गुंतून पडून त्यातील गाणे ऐकणे किंवा गाणे enjoy करणे हे बाजूला पडून फक्त तांत्रिक बाबींची चिरफाड करत राहणे हा धोका आहे.
तिसरी पायरी - ही सर्वात वरची आणि अवघड पायरी. गाण्याच्या तांत्रिक बाबी माहीत असूनही तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित न होऊ देता त्यातील भाव या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. या पायरीवर पोचल्यावर शास्रीय / अशास्रीय / उपशास्रीय हा भेदच मुळी राहत नाही. उरते ते फक्त शुद्ध गाणे. ही पायरीच मुळी वेगळी आहे. आधी गाण्याचा वापर आनंद घेण्यासाठी होत असतो. यामध्ये तो स्वतःचा शोध किंवा तत्सम तत्त्वज्ञानाशी निगडीत विचारांसाठी माध्यम म्हणून होतो. सूर, ताल, लय ही बंधने असूनही ती गळून पडतात. मला वाटतं इथे पोचणारे लोक हे एका अर्थाने योगाची साधना करत असतात आणि ही पायरी म्हणजे त्या साधनेचे फळ आहे. संगीताच्या व्याख्येत असलेला नादब्रम्ह या शब्दाचा अर्थ इथे कदाचित उलगडत असेल. इथे श्रोता किंवा गायक यापैकी कुठल्या भूमिकेत साधक आहे याने फारसा फरक पडत असेल असे मला वाटत नाही.
या ठिकाणी मला कबीराची आठवण होते. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कबीर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कबीराच्या कवितेच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्यात कबीराच्या सुरुवातीच्या रचना या 'मला चांगलं बनायचंय' किंवा 'मला वाईट गोष्टींपासून दूर रहायचंय' या भावनेशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत (उदाहरणार्थ - माया महा ठगनी हम जानी, हिरना समझ बूझ). पण त्याच्या नंतरच्या/शेवटीच्या काळातल्या रचना या परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतरच्या म्हणजेच आप/ पर असं काही नाहीच, ज्यापासून पळून जायचंय असं काहीच नाही, ज्याला अंगीकृत करायचंय असंही काही नाही अशा स्वरूपाच्या आहेत . या रचनेचे एक उदाहरण म्हणून 'साधो सहज समाधी भली' ही कविता बघता येईल. तर गाणं ऐकणे किंवा शिकणे यामधली तिसरी पायरीची तुलना याच्याशी करता येईल.
वरील उताऱ्याची ( तिसरी पायरी) अवस्था लहान तोंडी मोठा घास अशी झालीय. पण जे वाटत गेलं तसं ते लिहीत गेलो.

Friday, June 20, 2008

Dedicated listening

मला गाणं गुणगुणण्याची सवय आहे. अगदी शास्त्रीय संगीत ते 'अटरिया पे लूटन कबुतर रे' किंवा 'बिडी जलाय ले' इथपर्यंतची गाणी मी गुणगुणत असतो. अर्थात शास्त्रीय किंवा दर्जेदार (जुने मराठी/ हिंदी, नाट्यसंगीत, गझल) संगीतच जास्त ऐकत असल्यामुळे तेच जास्त वेळेस गातो हा भाग वेगळा. सांगायचा मुळ मुद्दा असा की गाणे गाताना/गुणगुणताना कुणी नवीन माणूस आजुबाजुला असेल तर तो/ती हमखास विचारतातच - 'तू गाणं शिकलेला आहेस काय' किंवा 'तू गाणं गातोस वाटतं'. मग मी त्यांना उत्तर देतो की - ' मी गायक नाही. शास्त्रीय संगीताची थोडीशी ओळख आहे. मी मुळात एक पूर्णवेळ श्रोता (dedicated listener) आहे'. त्यावर हमखास थोडासा प्रश्नार्थक चेहरा किंवा 'विचीत्रच असतात लोक! ' असे expression उत्तर म्हणून मिळतात. याचा कारण बऱ्याच लोकांसाठी गाणे ऐकणे हा एक timepass किंवा करमणुक असते. त्यामुळे dedicated listening म्हणजे काय ते सांगावसं वाटलं.
माझ्या मते गाणे ऐकणे (किंवा अजून generalization करुन, कुठल्याही कलेचा आस्वाद घेणे) या गोष्टीचे दोन modes आहेत. एक आहे आनंदासाठी ऐकणं. ज्यामध्ये एकमेव निकष असा आहे की ते गाणं ऐकून 'छान' वाटलं पाहिजे. जसं एखादं फूल पाहून छान वाटतं, किंवा पावसात भिजून छान वाटतं, किंवा लहान मुलाचं हसणं बघून छान वाटतं. अशा वेळी आपण या आनंदाच्या कारणांची मीमांसा करत बसत नाही (काहीजण करतही असतील, करो बिचारे!), फक्त त्या गोष्टीचा आनंद घेतो. दुसरी गोष्ट आहे विश्लेषणात्मक आनंद (analytical pleasure) -ज्यामध्ये एखाद्या कलाप्रकाराची घडण कशी होत गेली आहे किंवा तो कलाप्रकार घडवतानाची कलाकाराची thought process समजावून घेणे.अर्थात प्रत्येक वेळेस ऐकताना analytical mode मधे ऐकणे माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे.
सुरूवातीला शास्त्रीय संगीत ऐकताना मला वाद्यसंगीत खूप आवडायचं आणि कंठसंगीत तेवढंसं आवडायचं नाही. जसजसं शास्रीय संगीत जास्त ऐकत गेलो, तसतसं कंठसंगीतातही रुची वाढु लागली. मग हळुहळू रागांच्या सुरावटी ओळखीच्या झाल्या. कुठल्यातरी चित्रपटसंगीतातल्या गाण्यात वापरलेला राग, भावसंगीतात वापरलेला राग ओळखू यायला लागला. काही रागांसाठी स्वतःचे अमूर्त models तयार झाले. मग हळुहळू बाकीच्या तांत्रिक बाबींशी ओळख होत गेली. मग एखादा रागाच्या अंतरंगात डोकवायची सवय लागली. एखादा राग आपल्याला समजतोय असं वाटावं आणि लगेच असा काही performance/recording ऐकण्यात यावा की आधीच्या सगळ्या findings चा पुन्हा विचार करण्याची गरज भासावी असं बऱ्याच वेळेस होतं.
शास्त्रीय संगीतात अनवट राग असा एक प्रकार आहे. जर राग त्याच्या अवघड रचनेमुळे समजण्यास सोपा नसेल आणि त्याचमुळे तो जास्त गायला जात नसेल तर त्याला अनवट राग म्हणतात. माझी अनवट रागाची व्याख्या जो राग मला समजत नाही तो अनवट अशी आहे. तर अशा अनवट रागांचा अभ्यास हा एक आनंदाचा मोठाच ठेवा आहे. याशिवाय घराणा पद्धतींचे गायन आणि त्यातील सौंदर्य, एकाच घराण्याचे दोन गायक, तसेच गुरू शिष्य यांच्या गायनातील साम्यस्थळे आणि फरक, एखाद्या गायकाची शैली, जोड तसाच मिश्र रागांची घडण आणि त्यातील त्या रागाच्या / बंदिशीच्या रचनाकर्त्याला अभिप्रेत असलेला सौंदर्यविचार या सगळ्या गोष्टी अगणित आनंदाचा ठेवा आहेत. कधीकधी वर सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींची उलगड लवकर होत नाही. मग त्यावर विचार करत असताना कधीतरी अचानक साक्षात्कार झाल्यासारख्या काही गोष्टी स्पष्ट होतात त्यावेळेसचा आनंद तर केवळ शब्दात न सांगता येण्यासारखा. त्याचबरोबर हे कुणाला सांगता येत नसेल तर होणारे थोडेसे दुःखही त्याचाच भाग (हे कौस्तुभनेही इथे सांगितले आहे).
हे सगळे होत असताना आपल्या स्वतःच्या (सर्वार्थाने) लहानपणाची होणारी जाणीव आणि या कलेची भव्यता आयुष्यविषयक funde ही शिकवून जातात. मला तर अत्युच्च आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी गाण्यामुळे जी मदत झालीय त्यामुळे मी या कलाकारांच्या आणि संगीताच्या न फिटल्या जाणाऱ्या ऋणात बांधला गेलोय.