Wednesday, April 18, 2012

व्यवहार

खड्ड्यात गेले सगळे नियम
सोडून देतो सगळे संयम

डोंगरावरती उघड्याने खाईन म्हणतो भेळपुरी
भर रस्त्यावरती बसेन म्हणतो समाधीत अघोरी
इकडे आग, तिकडे विहीर
इकडे थेटर, तिकडे मंदीर
जाउया कुठेतरी करुया काहीतरी
अर्थ कुठे आहे दोन्हींना नाहीतरी

जाता जाता उडवून देतो नासके ढिगारे
जमल्यास मित्रांना देतो प्राजक्ताचे फुलोरे
वर लावून थोडं कुंकू
पूजेसाठी आणखी लिंबू
नाचूया सगळे मिळून अंगणदारी
अर्थे कुठे आहे दोन्हींना नाहीतरी

वेड्यासारखे काहीतरी बोलतोय असे म्हणू नका
शहाणेसुरते वेगळे काय करताहेत जरा मला सांगा
वेड्यांची दुनिया, वेड्यांचा बाजार
शहाण्यांचा सभ्य, शांत व्यवहार
अव्यवहारांची करू भागीदारी व्यवहारी
अर्थ कुठे आहे दोन्हींना नाहीतरी

Monday, January 24, 2011

पिया के मिलन की आस

रॅशनल रहायचं ठरवलं किंवा मी रॅशनल आहे असं स्वत:ला सांगितलं तरीही भावूक व्हायला होतंच. त्यांच्या प्रतिभेपुढे आणि कर्तृत्वापुढे मी नतमस्तक आहे. त्यांच्या गाण्याचं किंवा व्यक्तिमत्वाचं वेगळेपण सांगावं असं भरपूर आहे, पण आज इच्छा होत नाही.

कुमार किंवा मन्सूर गेले त्यावेळी मी बऱ्यापैकी लहान होतो व त्यांचं गाणंही त्यावेळी एवढं ऐकलं नव्हतं. पण पार्थिव अस्तित्वाच्या पुढे जाऊन कुमार किंवा मन्सूर आज त्यांच्या गाण्यातून उपलब्ध आहेत आणि माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. भीमसेनांच्या बाबतीत हेच होईल. येणारी बरीच वर्षे मी त्यांना ऐकत राहतील आणि भीमसेन आपल्या अपार्थिव अस्तित्वातून मला भेटत राहतील. "याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा॥"

Friday, January 14, 2011

शोध स्वातंत्र्याचा


Shawshank redemption या चित्रपटाबद्दल लिहायचं ठरवलं की विचाराची चक्रं सुरू होतात, कुठुन सुरू करावं कळत नाही. मग मी थोडा वेळ तोच चित्रपट पाहतो आणि लिहायचं राहूनच जातं. या वेळी मात्र ठरवून लिहायला बसलो आहे.

Shawshank Redemption (सोयीसाठी इथून पुढे SR असं लिहीतो) ची कथा सुरू होते एका कोर्टकेस पासून - अ‍ॅन्डी डुफ्रेन्स हा बॅंकर आहे व त्याच्यावर स्वत:च्या व्यभिचारी बायकोच्या खून केल्याचा आरोप आहे. निर्दोष असूनही प्राप्त साक्षीपुराव्यानुसार अ‍ॅन्डीला दोषी ठरवण्यात येतं आणि अ‍ॅन्डीची रवानगी होते Shawshank या तुरूंगात. चित्रपटातील पुढील भागाचं थोडक्यात वर्णन सोपं आहे - अ‍ॅन्डीचं तुरूंगातील आयुष्य आणि सरतेशेवटी पळून जाऊन तुरंगातून करून घेतलेली सुटका.

आत्तापर्यंत जे काही fiction पाहिलंय/वाचलंय (यात कथा/कादंबरी/नाटक/चित्रपट सर्वच आलं) त्यावरून चांगल्या fiction बद्दल माझी काही निरीक्षणं आहेत. अशा कलाकृतीमधली कथा उत्तम असते. आणि अशी कलाकृती त्या कथेपलीकडच्या मानवी मूल्यांच्या बाबतीत, मानवी नातेसंबंधाच्या बाबतीत, समाजव्यवस्थेच्या बाबतीत, शाश्वत सत्याच्या बाबतीत सूक्ष्मपणे भाष्य करत असते. हे भाष्य समर्पक असतं, प्रामाणिक असतं. ते भाष्य अतिरंजित, बटबटीत किंवा अप्रामाणिक झालं की त्या कलाकृतीचा तोल ढळतो आणि ती कलाकृती चांगल्या fiction पासून दूर जाते.

SR चित्रपटाचा गाभा स्वातंत्र्य हे मूल्य आहे. SR ही एका व्यक्तीची स्वातंत्र्य या तत्त्वासाठी दिलेल्या लढ्याची कथा आहे. स्वातंत्र्य या शब्दाबद्दल मला कायमच संभ्रम राहिलेला आहे. 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले या ओळीचा अर्थ समजून घेण्यासाठी खूप जास्त अभ्यासाची गरज आहे. कारण स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय नव्हते? ते मिळाले म्हणजे नेमके काय मिळाले?

आजच्या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ (हक्क आणि जबाबदाऱ्या) यावर मला संपूर्ण स्पष्टता नाही. आपण लोकशाही व्यवस्थेचे घटक आहोत. आपल्यावतीने आपण काही जबाबदाऱ्या शासनातील काही घटकांना देतो. त्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत बहुतांश वेळेस आपण त्या व्यवस्थांचे म्हणणे मान्य करतो. म्हणजे आज मी स्वतंत्र आहे पण मी मला वाटेल त्या गोष्टी करू शकत नाही. केल्यास मला दंड करण्यासाठी पोलीस/न्याययंत्रणा अस्तित्त्वात आहे. स्वातंत्र्य हे अमर्याद स्वातंत्र्य किंवा स्वैराचार होऊ शकत नाही. मग ही स्वतंत्रतेची सीमा नक्की कुठे आखणार? आणि शासनव्यवस्था जर चुकीच्या वागल्या तर माझं त्याला उत्तर काय असणार?

आपला समाज, त्यातल्या सिस्टीम्स या शेवटी आकाशातून अवतीर्ण झालेल्या सिस्टीम्स नाहीत. त्या आपण समाज म्हणून घडवत आणलेल्या सिस्टिम्स आहेत ही जाणीव फार जणांना नसते. ही सिस्टीम किंवा व्यवस्था चुका करू शकते. ही जाणीव दुर्दैवाने फार व्यापक नाही. बहुतांश लोक सिस्टिम्सला अंतिम मानून चालत असतात. एखादे टिळक, गांधीजी, सावरकर, थोरो यांना याची जाणीव असते. म्हणूनच टिळकांना ब्रिटीशांची सत्ता ही काही अंतिम निसर्गत:च आलेली सत्ता नाही हे समजते व ते त्याविरुद्ध आवाज उठवतात. टिळकांचे मंडालेच्या शिक्षेच्या वेळी काढलेले “न्यायालयाच्या वर एक न्यायालय असून त्यावर आपला विश्वास आहे” हे बोल किंवा थोरोचे थोडे उपहासिक अर्थाचे “Any fool can make a law, and any fool will mind it” हे शासनव्यवस्थेला उद्देशून काढलेले बोल याचीच साक्ष देतात. ही जाण तुकाराम, विजय तेंडुलकर, अल्बेर काम्यु सारख्या साहित्यिकांना असते. त्यामुळेच तुकाराम “सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता” असे लिहू शकतो. आजच्या काळात मेधा पाटकर, अरूणा रॉय, बाबा आमटे यासारख्या लोकांना ही जाणीव असते. सिस्टीम्स या आपणच घडवलेल्या आहेत व त्या अंतिम अधिकारी असू शकत नाहीत ही जाणीव राज्यकर्त्यांना नेहमीच त्रस्त करत आली आहे. राज्यकर्ते किंवा हातात सत्ता असणारे लोक ही जाणीव नेहमीच दडपण्याचा प्रत्यत्न करतात.

तुरूंगात टाकलेली व्यक्तीच्या अगदी साध्या साध्या वागण्यावर बंधने असतात. तुरूंगात असलेल्या कैद्यांची स्वातंत्र्याप्रती असणारी तीव्र ओढ आणि ती ओढ जागृत ठेवणारा अ‍ॅन्डी SR मध्ये सुरेख चित्रीत झाला आहे. त्यामुळे त्याच्या मनातल्या स्वातंत्र्याच्या इच्छेला (तो दोषी नसल्यामुळे) अपराधीपणाच्या भावनेचा स्पर्श झालेला नाही. स्वत:च्या मनातल्या दुर्दम्य आशावाद अ‍ॅन्डी पुन्हापुन्हा दाखवतो – मग ते स्वत: जोखीम घेऊन सह-कैद्यांना कॅप्टनच्याच खर्चाने तुरूंगातल्या गच्चीवर बीअरची पार्टी देणे असो, स्वत:ला शिक्षा होईल हे माहीत असतानासुद्धा तुरूंगातील लाऊडस्पीकरवर संगीत लावणे असो किंवा तुरूंगाचा वॉर्डन ज्यावेळी आपले रास्त म्हणणे नाकारतो त्यावेळी अ‍ॅन्डीने वॉर्डनला करून दिलेली त्याच्या मूर्खपणाची जाणीव असो, अ‍ॅन्डी स्वत:मध्ये आणि आपल्या सह-कैद्यांमधे ही स्वातंत्र्याची जाणीव कायम जागती राहील अशा कृती करतो.

चित्रपटात अ‍ॅन्डी आपल्याला एक साधा माणूस म्हणून दिसतो – जो तुमच्यामाझ्यासारखाच आहे. तो अतर्क्य साहसी कृत्ये करू शकतो म्हणून तो चित्रपटाचा नायक नाही, तो अतिशय देखणा आहे व त्याच्यावर नायिका फिदा आहे म्हणून तो चित्रपटाचा नायक नाही, त्याला नायक काय बनवतो तर त्याचा तत्वासाठीचा लढा. SR मधील अ‍ॅन्डीची स्वातंत्र्याची जाण आणि त्याचा लढा हा वर उल्लेखलेल्या लोकांच्या क्वालिटीचा आहे. देशप्रेम वगैरे लेबल्स लागले नाही म्हणून अ‍ॅन्डीची जाण कमी प्रतीची ठरत नाही. सुटकेसाठीचे दीर्घकालीन प्रयत्न करताना सुटका नक्की होणार का ते माहीत नाही, तुरूंगातून सुटताना कदाचित पुन्हा पकडले जाऊ ही शक्यता आहेच. तरीही कुठला विचार आणि श्रद्धा त्याला सलग 20 वर्षांपर्यंत सुटकेसाठी प्रयत्न करण्यास उद्युक्त करतो? याची उत्तरे सोपी नाहीत आणि अ‍ॅन्डीच्या कथेत ती fictional आहेत म्हणून आपल्याला टाळता येणार नाहीत. कारण वर उल्लेखलेल्या व्यक्तींच्या रुपात अशी माणसे आपल्यात होऊन गेलेली आहेत किंवा अस्तित्वात आहेत. अन्यायाविरूद्ध तत्त्वांसाठीची अहिंसक परंतु निश्चयपूर्वक, सातत्यपूर्वक लढा असे अ‍ॅन्डीच्या सुटकेचे खरे स्वरूप आहे.

हा झाला स्वातंत्र्याच्या जाणीवेचा भाग. SR ने अजून एका बाबतीत खूप भारी दृष्टीकोन दिला, तो म्हणजे institutionalization ही संकल्पना. एका बाजूला स्वातंत्र्याची तीव्र ओढ दाखवतानाच दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची भीतीही हा चित्रपट दाखवतो. एखाद्या बंधनात एखादी व्यक्ती खूपकाळ राहिली तर तर ती व्यक्ती त्या बंधनाला institutionalize होऊन जाते. ते बंधन बरेवाईट कसेही असो त्या व्यक्तीला बंधनातून मुक्ततेची भीती वाटू लागते. बहुतांश काळ त्या बंधनात राहिल्यामुळे आयुष्य हे बंधनाला सरावलेले असते. पुन्हा ते सोडून नवा डाव मांडणे हे त्या व्यक्तीला अवघड जाऊ लागते. अ‍ॅन्डी आणि त्याचे सह-कैदी यातील फरक इथे दिसून येतो. एखाद्या बंधनाला institutionalize न होण्यासाठी काय करावे लागते? अ‍ॅन्डी ज्याप्रमाणे सतत क्रियाशील आणि आशावादी राहतो ते याला उत्तर असू शकेल काय?

कथा, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, अभिनय, संवाद या बाबतीत SR उत्कृष्ट आहे. अ‍ॅन्डीचा आणि आत्तापर्यंत उल्लेख न केलेला रेड हा अ‍ॅन्डीचा मित्र यांचा अभिनय खूपच सुंदर आहे. त्या दोघांमधले काही संवाद हे कित्येकदा पाहूनही माझ्यासाठी शिळे झालेले नाहीत. SR ने वर मांडलेले विचार व प्रश्न माझ्यापुढे उपस्थित केले म्हणून मला तो एक उत्कृष्ट चित्रपट वाटतो.

Thursday, December 16, 2010

अभंग तुकयाचे

काही गाणी अगदी लहानपणापासून सोबत करत आहेत. एखादं गाणं हे गीतकार, संगीतकार, गायक यांच्या प्रयत्नांचं एकत्रित फलित असतं ही जाण खूप उशिरा आली. माझ्या तिसरी-चौथी पर्यंत आमच्याकडे टेपरेकॉर्डर नव्हता, त्यामुळे बहुतेक चांगल्या गाण्यांची पहिली ओळख रेडिओवर झालेली आहे. स्वत:हून निवडता अनेक उत्तम गाणी रेडिओमुळे कानावर पडत गेली आणि त्यामुळे नकळत गाण्यातली रुची वाढत गेली असावी. लहाणपणापासून सोबत असलेल्या आणि अजूनही अवीट गोडी कमी झालेल्या अशा एका अल्बमबद्दल लिहावे असे वाटले.

अभंग तुकयाचेया अल्बमचे माझ्या छोट्या संगीतविश्वात एक अढळ स्थान आहे. तुकारामाचे अभंग, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि लताचा अजोड नैसर्गिक स्वर. यातील प्रत्येकाचा मी फॅन आहे आणि इथे तिघेही एकत्र! हा पूर्ण अल्बम एक उत्कृष्ट सांगितिक अविष्कार आहे. अगा करुणाकरा, भेटी लागी जीवा, कन्या सासुरासी जाये या सारख्या अभंगांतील आर्त भाव असेल, सुंदर ते ध्यान, वृक्षवल्ली आम्हा सोयरे सारखे ऐकून गुळगुळीत झालेले अभंग असोत, किंवा आनंदाचे डोही, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, हाचि नेम आता सारखी भक्तीरसातले आणि प्रसन्न अभंग असोत, प्रत्येक अभंगाला त्याच्या अर्थाशी समर्पक अशी अप्रतिम चाल आहे आणि लताने ती तेवढीच उत्कृष्ट गायली आहे.

तुकारामाच्या एवढ्या समृद्ध अभंगसाठ्यातून निवडक दहा-अकरा अभंग निवडताना खळ्यांची (किंवा ज्यांनी हेच अभंग निवडले त्यांची) दमछाक झाली नसेल काय? मी बऱ्यापैकी unorganized पद्धतीने तुकारामगाथा वाचतो. कुठलंही पान उघडायचं, त्यावरचा कुठलातरी अभंग वाचायचा. आधी वाचलेला एखादा अभंग कधीतरी अचानक आठवतो, पण त्याचा गाथेतील अभंग क्रमांक किंवा पहिला चरण नेमकेपणाने आठवत नाही. तो शोधत असताना कुठलातरी तिसराच अभंग सापडतो आणि या नवीन अभंगानं आनंद मिळतो, जुना शोधायचा अभंग राहूनच जातो. असे असताना दहा-अकरा निवडक अभंग बहुतेक first-come-first-served या पद्धतीनेच निवडले असतील :). मला तुकारामात निर्माण झालेला रस याचं श्रेय तुकाराम या विषयावरच्या लिखाणाबरोबरच या अल्बमलाही जातं.

तुकारामाचे अभंग मौखिक परंपरेतून टिकले आहेत असे भालचंद्र नेमाडे त्यांच्या तुकाराम या पुस्तकात लिहितात. भारतीय संतसाहित्यामधील काही संत - विशेषत: ज्यांची रचना एकसंध नाही, वेगवेगळ्या पदांच्या, अभंगांच्या रूपात आहे - यांच्या साहित्यात बरेच पाठभेद आढळतात ते बहुधा यामुळेच. शबनम वीरमणी कबीरावरील आपल्या documentary प्रोजेक्ट मध्ये असे नोंदतात - तुम्ही उत्तर प्रदेशात जा आणि कबीराची पदं त्या भाषेत ऐकू येतात, तुम्ही राजस्थानात जा, कबीराची पदंही आपली भाषा बदलतात.

मौखिक परंपरेतून अभंग गद्य रुपात पुढे जाणार नाहीत, त्यांना चाल असेलच. आजच्या काळात मुद्रण अवस्थेसोबतच मौखिक परंपरेतून हे अभंग खळे/लता यांच्या कलेतून टिकवले जात आहेत, नाही का? गाथेत जाउन जेवढ्या लोकांनी हे अभंग वाचले असते त्यापेक्षा कितीतरी पट लोकांच्या ऐकण्यात हे अभंग सहजगतीने गेले आहेत. आपल्यापर्यंत हे अभंग पोचवण्याचं आणि ते रुजवण्याचं लता/खळे यांचं ऋण मान्य केलंच पाहिजे.

Thursday, November 25, 2010

सातवीण


हे नाव ऐकलंय? किंवा सोबतच्या फोटोमधली फुले आणि झाड पाहिलंय? दुर्दैवाने वासाला attach करण्याचे तंत्रज्ञान अजून आलेले नाहीये :) , नाहीतर या फुलांचा वाससुद्धा attach करून विचारलं असतंहा वास घेतला आहे? मी दरवर्षी एका झाडाच्या प्रेमात पडतोयमागच्या वर्षी बहाव्याच्या प्रेमात पडलो होतो, त्याच्या आधीच्या वर्षी बूचाच्या, या वर्षी सप्तपर्णीच्या! तसं हे झाड 4-5 वर्षे आधीपासूनच माहिती आहे. मुंबईमध्ये पवईत हिरानंदानी गार्डन्स या भागात सप्तपर्णीची खूप झाडं आहेत. मुंबई सोडल्यानंतर पुण्यात आलो पण पुण्यात मला हे झाड कुठे आढळलं नाही. सध्या नाशिक मध्ये आहे, आणि इथे सप्तपर्णी 4-5 ठिकाणी सापडलं. त्यामुळे मुंबईमधील वास्तव्याबद्दल nostalgic झालो आणि या झाडाचं नाव आणि अजून थोडी माहिती शोधली.सातवीण (किंवा सप्तपर्णी) या झाडाला साधारणत: ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये ही फुलं येतात आणि त्यांचा सुगंध केवळ अवर्णनीय असतो. याला devil’s tree असेही नाव आहे. फुलाचा गुच्छ आणि त्याचं डिझाईन हे अतिशय नेत्रसुखद असतं. खूप सप्तपर्णी एकत्र असतील तर त्या वासाने दडपून जायला होतं. छाती भरून वास घेतला तरी अजून घ्यावासा वाटतो. कविकुलगुरू कालिदासाने रघुवंश या काव्यात (की नाटकात?) ’सप्तच्छदक्षीरकटुप्रवाहमासह्यमाघ्राय मदं तदीयम।’ (म्हणजे सप्तच्छदकिंवा सप्तपर्णी) या झाडाचा पांढरा, कडू चीक असतो. त्याचा दर्प रानटी, मदमस्त हत्तींच्या मदासारखा असतो) असे वर्णन केले आहे.
संदर्भ – 1. आपले वृक्षश्री. . महाजन

Thursday, October 28, 2010

कप भरून हवा चहा

एक
दोन
तीन
चार
पाच अधिक एक सहा
कप भरून हवा चहा

आता कुणाचं ऐकणार नाही
काळा झालो तरी भिणार नाही
तुम्हीच बोर्नव्हिटा पीत रहा
कप भरून हवा चहा

आजी भल्या पहाटे पिते
चहात आजोबांची मिशी नहाते
बाबा म्हणतात दूध प्या
पण मला हवा चहा

ताईला असतो अभ्यास म्हणून
दादा पावसात भिजला म्हणून
आईला दुखतंय डोकं म्हणून
होऊ द्या रात्र, वाजू द्या दहा,
मलाही आता हवा चहा
कप भरून हवा चहा

- कवी दासू वैद्य

Wednesday, August 25, 2010

कलंदर केसवा

आउ कलंदर केसवा करी अबदाली भेसवा

जिनि अकास कुलह सर कीनी कउसै सपत पयाला
चमर पोस का मंदरु तेरा इह बिधि बने गुपाला

छपन कोटि का पेहनू तेरा सोलह सहस इजारा
भार अठारह मुदगरू तेरा सहनक सभ संसारा


देहि महजिदी मनु मौलाना सहज निवाज गुजारै
बीबी कौला सउ काइनु तेरा निरंकार अकारै

भगती करत मेरे ताल छिनाए किह पहि करउ पुकारै
नामे का सुआमी अंतरजामी फिरे सगल बेदेसवा

कुमार गंधर्वांचं 'कलंदर केसवा' हे निर्गुणी भजन ऐकल्यापासून त्याच्या शब्दांबद्दल कुतूहल होतं . निर्गुण भजनामध्ये (किंवा भक्तीमध्ये) कुठल्याही विशिष्ट देवाची प्रार्थना नसते. आत्म्याचे गुण वर्णन करणारी, सृष्टीची आणि मानवाची उत्पत्ती याचा शोध घेणारी, एखाद्या विशिष्ट देवापेक्षा अविनाशी तत्वावर श्रद्धा असणारी निर्गुण भक्ती ही भक्ती शाखा आहे. कुमार गंधर्वांनी बरीच निर्गुणी भजनं गायली आहेत. शून्य गढ शहर, सुनता है गुरु ग्यानी, हिरना समझ बुझ इत्यादी भजनं जशी ऐकत गेलो तसे त्यातले शब्द समजत गेले, पूर्ण संदर्भ जरी लागले नसले तरी या भजनांचे अर्थ लागले.

कुमारांनी गायलेली निर्गुणी भजनं बहुतेक करून कबीराची किंवा नाथ संप्रदायातली आहेत. कलंदर केसवा या भजनाचे शब्द ऐकून हे भजन कबीराचं असावं असं उगीच वाटून गेलं. शेवटच्या दोह्यात/कडव्यात नाममुद्रा नाही असं मला वाटलं. त्यामुळे हे कबीराचं भजन असावं असं वाटून अर्थ लावायचा प्रयत्न केला. सुरुवातीची ओळ "कलंदर केसवा करी अब्दाली भेसवा" यावरून मी अर्थ लावला - "हे केशवा, तू अब्दालीचा वेश करून ये". पण पुढच्या ओळीचा या ओळीशी संबंध लागेना. आणि अजून एक पंचाईत -अब्दाली कोण? मला माहित असलेला अब्दाली एकच - अहमदशाह अब्दाली. असं काही झालं असावं का की अब्दालीचं आक्रमण झालं आणि त्यापासून वाचवा म्हणून कबीरांनी केशवाचा धावा केला? पण wikipedia वर कबिरांचा कालावधी १४४०-१५१८ असा आहे आणि अहमद शाह अब्दालीचा कालावधी खूप अलीकडचा - १७२२-१७३३. म्हणजे हे ही समीकरण जुळेना. गुगल वर पहिल्या दोन ओळी इंग्लिश किंवा देवनागरी मध्ये टाईप करून बघितल्या पण काहीही कामाचे संदर्भ मिळाले नाही.

खूप दिवस हा असा non-aggressive शोध चालू असताना एक दिवस मधल्या दोन ओळी देवनागरी मध्ये शोधल्या आणि wow! वाटावं अशी एक लिंक मिळाली. त्या लिंकमधून बहुतेक गोष्टी स्पष्ट झाल्या.

हे भजन नामदेवांनी लिहिलेलं आहे आणि हे गुरु ग्रंथसाहिब (शिखांचा धर्मग्रंथ) मध्ये आहे. नामदेवांनी पंजाबी भाषेत काही रचना केलेली आहे आणि त्यांचा गुरु ग्रंथसाहिब मध्ये समावेश आहे ही माहिती आधी होती पण याशिवाय इतर काहीही यासंदर्भात वाचण्यात आलं नव्हतं. शेवटची "नामे का स्वामी अंतर्यामी" ही नाममुद्रा हे पद/भजन नामदेवांचं भजन आहे एवढा अंदाज यायला पुरेशी होती पण शेवटच्या ओळीपर्यंत उच्चार व्यवस्थित ऐकून समजावून घ्यावेत हा patience कुमारांचं भजन ऐकताना राहिला नव्हता. नामदेवांना कुठला अब्दाली अपेक्षीत होता याचा उत्तर आणखी थोडं गुगल करून मिळालं. नामदेवांना अभिप्रेत असलेला अब्दाली किंवा अब्दाल हे सुफी संप्रदायातील संत आहेत.

नामदेव केशवाला सुफी संताचा वेश घेऊन या अशी प्रार्थना करत आहेत आणि बाकीच्या कडव्यांमध्ये त्या वेषाचे वर्णन आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हे विश्व एका निराकार अविनाशी निर्गुणी तत्वावर आधारित आहे आणि हे तत्व आपल्यापुढे सगुण होताना हे निराकार गुण (आकाश, पृथ्वी) घेऊन मानवी रुपात येतं अशी धारणा आहे.

वर दिलेल्या लिंक वरचा इंग्लिश मधला अनुवाद वाचला आणि शब्दांबद्दल बऱ्यापैकी स्पष्टता आली पण संदर्भ मात्र लागले नाहीत म्हणून काही गोष्टींवर गुगल केलं तर अबदाल बद्दल खालील माहिती मिळाली.
१. सुफी लोकांचा विश्वास आहे की अल्लाने अब्दाल, अक़्ताब, आणि अवलिया अशा प्रकारच्या संताना हे जग चालवायचा अधिकार दिला आहे.
२. या जगात सात अबदाल आहेत जे पृथ्वीच्या सात खंडावर राज्य करतात (कउसै सपत पयाला या ओळीचा अर्थ सात जग तुझ्या चपला आहेत असा लिहिलं आहे. ते सात जग म्हणजेच सात खंड असावेत)
३. कुलह (जिनि अकास कुलह सर कीनी ) म्हणजे एक प्रकारची टोपी. kulah असं गुगल केलंत तर त्या टोपीचं चित्र पण दिसेल.
संदर्भ
१. गुरु ग्रंथसाहिब
२. वेबसाईट १ (सुफी संप्रदायाशी संबंधित)
३. वेबसाईट २ (सुफी संप्रदायाशी संबंधित)