Thursday, December 16, 2010

अभंग तुकयाचे

काही गाणी अगदी लहानपणापासून सोबत करत आहेत. एखादं गाणं हे गीतकार, संगीतकार, गायक यांच्या प्रयत्नांचं एकत्रित फलित असतं ही जाण खूप उशिरा आली. माझ्या तिसरी-चौथी पर्यंत आमच्याकडे टेपरेकॉर्डर नव्हता, त्यामुळे बहुतेक चांगल्या गाण्यांची पहिली ओळख रेडिओवर झालेली आहे. स्वत:हून निवडता अनेक उत्तम गाणी रेडिओमुळे कानावर पडत गेली आणि त्यामुळे नकळत गाण्यातली रुची वाढत गेली असावी. लहाणपणापासून सोबत असलेल्या आणि अजूनही अवीट गोडी कमी झालेल्या अशा एका अल्बमबद्दल लिहावे असे वाटले.

अभंग तुकयाचेया अल्बमचे माझ्या छोट्या संगीतविश्वात एक अढळ स्थान आहे. तुकारामाचे अभंग, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि लताचा अजोड नैसर्गिक स्वर. यातील प्रत्येकाचा मी फॅन आहे आणि इथे तिघेही एकत्र! हा पूर्ण अल्बम एक उत्कृष्ट सांगितिक अविष्कार आहे. अगा करुणाकरा, भेटी लागी जीवा, कन्या सासुरासी जाये या सारख्या अभंगांतील आर्त भाव असेल, सुंदर ते ध्यान, वृक्षवल्ली आम्हा सोयरे सारखे ऐकून गुळगुळीत झालेले अभंग असोत, किंवा आनंदाचे डोही, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, हाचि नेम आता सारखी भक्तीरसातले आणि प्रसन्न अभंग असोत, प्रत्येक अभंगाला त्याच्या अर्थाशी समर्पक अशी अप्रतिम चाल आहे आणि लताने ती तेवढीच उत्कृष्ट गायली आहे.

तुकारामाच्या एवढ्या समृद्ध अभंगसाठ्यातून निवडक दहा-अकरा अभंग निवडताना खळ्यांची (किंवा ज्यांनी हेच अभंग निवडले त्यांची) दमछाक झाली नसेल काय? मी बऱ्यापैकी unorganized पद्धतीने तुकारामगाथा वाचतो. कुठलंही पान उघडायचं, त्यावरचा कुठलातरी अभंग वाचायचा. आधी वाचलेला एखादा अभंग कधीतरी अचानक आठवतो, पण त्याचा गाथेतील अभंग क्रमांक किंवा पहिला चरण नेमकेपणाने आठवत नाही. तो शोधत असताना कुठलातरी तिसराच अभंग सापडतो आणि या नवीन अभंगानं आनंद मिळतो, जुना शोधायचा अभंग राहूनच जातो. असे असताना दहा-अकरा निवडक अभंग बहुतेक first-come-first-served या पद्धतीनेच निवडले असतील :). मला तुकारामात निर्माण झालेला रस याचं श्रेय तुकाराम या विषयावरच्या लिखाणाबरोबरच या अल्बमलाही जातं.

तुकारामाचे अभंग मौखिक परंपरेतून टिकले आहेत असे भालचंद्र नेमाडे त्यांच्या तुकाराम या पुस्तकात लिहितात. भारतीय संतसाहित्यामधील काही संत - विशेषत: ज्यांची रचना एकसंध नाही, वेगवेगळ्या पदांच्या, अभंगांच्या रूपात आहे - यांच्या साहित्यात बरेच पाठभेद आढळतात ते बहुधा यामुळेच. शबनम वीरमणी कबीरावरील आपल्या documentary प्रोजेक्ट मध्ये असे नोंदतात - तुम्ही उत्तर प्रदेशात जा आणि कबीराची पदं त्या भाषेत ऐकू येतात, तुम्ही राजस्थानात जा, कबीराची पदंही आपली भाषा बदलतात.

मौखिक परंपरेतून अभंग गद्य रुपात पुढे जाणार नाहीत, त्यांना चाल असेलच. आजच्या काळात मुद्रण अवस्थेसोबतच मौखिक परंपरेतून हे अभंग खळे/लता यांच्या कलेतून टिकवले जात आहेत, नाही का? गाथेत जाउन जेवढ्या लोकांनी हे अभंग वाचले असते त्यापेक्षा कितीतरी पट लोकांच्या ऐकण्यात हे अभंग सहजगतीने गेले आहेत. आपल्यापर्यंत हे अभंग पोचवण्याचं आणि ते रुजवण्याचं लता/खळे यांचं ऋण मान्य केलंच पाहिजे.

1 comment:

aativas said...

गाथा वाचताना हे ऐकलेले अभंग 'समजले' आहेत अस वाटत राहत! न ऐकलेल्या अभंगावर जास्त विचार केला जात नाही माझ्याकडून.