Thursday, December 24, 2009

आज फेरिले गोरी...

आज फेरिले गोरी रंग बसंती चीर
रुतुराज कोयलरिया कूके

रंग दे रंगा दे रंगरेजवा
रुतुराज कोयलरिया कूके

ही कुमारांची गौरी बसंत मधली अप्रतिम बंदिश आहे. सवयीने कुमारांच्या बंदिशीचे शब्द कळतात पण अर्थ बऱ्याच वेळेस लागत नाही. याही बंदिशीच्या वेळेस असंच झालं. यातलं बसंती चीर हे काय प्रकरण आहे कळालं नाही. रुतुराज या उल्लेखामुळे आणि कोकिळेच्या कूजनामुळे तसंच राग बसंताचा मिश्रराग आहे यामुळे बंदिश वसंत ऋतूवर आहे हे अगदीच सहज ओळखता येतं. रंगाचा उल्लेख आहे त्यामुळे कदाचित तिसऱ्या ओळीचाही अर्थ लावता आला असता. पण त्यातही कपडे (रंग टाकुन) रंगव असा आग्रह प्रियकराला नाही तर तो रंगरेजवाला (म्हणजे कपडे रंगवणाऱ्याला - रंगारी) आहे. त्यामुळे या उल्लेखाबद्दल कुतुहल निर्माण झालं.

गुगल बाबा मुळे संदर्भाचा शोध घेणं खूपच सोपं होउन बसलं आहे. फक्त थोडासा वेळ द्यायची तयारी हवी आणि थोडीशी खटपट करायला लागते. तर गुगल वर संदर्भ शोधले तर पहाडी होलीच्या संदर्भात खालील माहिती मिळाली. - "फाल्गुनच्या एकादशीला चीर बंधन असते. या दिवशी मंदिर किंवा गावप्रमुखाच्या घरासमोर खांब रोवून त्यावर अनेक रंगाचे कापड बांधले जाते. यादिवशी मंदिरात रंग खेळल्यानंतरच गाववासी रंग खेळायला सुरुवात करतात" .

या संदर्भामुळे बंदिशीचा संपूर्ण अर्थ कळाला. बंदिश आधीपासून माहिती होतीच पण आता एका नवीन dimension मध्ये बघता येते. एका शांत, रम्य अशा पहाडी खेड्यातील होळीचं चित्र डोळ्यापुढे येतं. कुमारांनी काय पाहून रचना केली असेल ते कळतं. एवढंच, बाकीचं ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) गाण्यातून शोधावं.

. संदर्भ एक - नवभारत टाईम्स मधला लेख

. संदर्भ दोन - कुमारांचा गौरी बसंत

Saturday, December 5, 2009

तू उषा होउन ये

मी निशेने ग्रस्त होता तू उषा होउन ये
कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये

या जगाच्या यातनांनी दृष्टी माझी कुंठिता
तू उद्याची स्वप्नसृष्टी लोचनी लेवून ये

जायबंदी आर्ष मूल्ये पाहुनी मी खंगता
दीपसा आरक्त त्यांचा तू टिळा लावून ये

संशयाच्या वायसांनी टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या चंदनी नाहून ये

सूर माझे क्षीण होता शब्द होता पारखे
पैंजणे श्रद्धांश्रुतींची तू पदी लेउन ये

- बा भ बोरकर

नुकतीच बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. ही कविता त्यांच्या अखेरच्या दिवसातील 'चिन्मयी' या कविता संग्रहातील आहे. कवितेतील काही शब्द संस्कृत किंवा प्राकृत मराठी आहेत पण ते कवितेचा आशय कळण्याच्या आड येत नाहीत. कविता कुठल्या स्त्रीरूपाला उद्देशून लिहिली असावी असा विचार ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मनात आला होता पण "कोरशी प्राजक्ता वेणी" आणि "पैंजणे श्रद्धाश्रुतींची" वरून ती प्रेयसीलाच उद्देशून लिहिली असावी हे कळाले.

Thursday, September 17, 2009

संवेदनशीलता - तीन संदर्भ

भीगा भीगा सा क्यूं है ये अखबार

अपने हाकरको कल से चेंज करो


पॉंच सौ गाव बह गए इस साल

कवी गुलजार यांची एक त्रिवेणी. सकाळी सकाळी गरम चहासोबत पेपर हातात घ्यावा तर हे काय? पेपर एवढा का भिजलाय? पेपरवाल्याला नीट पेपर टाकता येत नाही का? हा पेपरवाला बदलून टाकूया. आणिपावसाच्या पुरात पाचशे गावे वाहून गेली!” ही बातमी.

जो वाचतोय त्याच्या अर्थाने ही केवळ बातमी आहे. त्यामुळे तिथे पाचशे छापून आलं काय, तीनशे आलं काय, आणि सातशे आलं काय; त्याच्यासाठी (किंवा तिच्यासाठी) तो फक्त एक आकडा आहे. एक गाव वाहून जाणं म्हणजे काय याचा अंदाज त्याला बसल्याबसल्या येणं शक्य. त्यामुळेच तो पेपरवाल्याला बदलून टाकण्याची भाषा करू शकतो.

तो पेपरवाला बहुतांशी गरीब परिस्थितीतीलच असेल. गरीबी आणि बेकारीमुळे शहरात स्थलांतरित झाला असेल. कदाचित त्याचं गावही पुरामुळे धोक्यात आलं असेल. अशा वेळी त्याला क्षेमकुशल विचारणं तर दूरच पण माझा पेपर भिजलेला कसा? कुणाचं काहीही होवो, माझं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. दुर्दैव असं की, या व्यक्तीला नवीन पेपरवाला मिळेलही. कारण ती जागा घेण्यासाठी बेकारांचे आणि स्थलांतरितांचे तांडे उपलब्ध आहेतच.

शहरी जीवनातून अपरिहार्यपणे जगण्यात येणारी स्वकेंद्रित मानसिकता वरच्या त्रिवेणीतून फार चांगल्या रीतीने व्यक्त होते. शहरी जीवनातील कोरडेपणा आणि अलिप्तपणा या त्रिवेणीतून फार चांगला व्यक्त झालाय. हा कोरडेपणा दाखवण्यासाठी गुलजार यांनी पावसाच्या ओलीचा विरोधाभासी संदर्भ गुलजार यांनी किती समर्पकपणे (कदाचित अजाणतेपणी) वापरलाय.

दुसरा संदर्भ बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकरांच्या पुस्तकातील. बोक्याच्या कथा प्रभावळकरांनी फारच सुंदर लिहील्या आहेत. मला बहुतेक कथा आवडल्या. बोक्याचा खोडकरपणा, चलाखपणा आवडला. एक गोष्ट मात्र खटकली. ती संवेदनशीलतेशी निगडित असल्यामुळे त्याचा उल्लेख करावासा वाटतो.

बोक्या मुंबईला राहतो. आगंतुक पाहुणा या गोष्टीत बोक्याच्या घरी एक -मुंबईकर आगंतुक पाहुणे येतात. त्या पाहुण्यांना वागायची रीतभात नसते. त्यात बोक्याच्या वडिलांनी सुट्टीची आखणी केलेली असते. हे पाहुणे आल्यामुळे बोक्याची आणि त्याच्या कुटुंबियांची एक सुटी वाया जायची शक्यता निर्माण होते. बोक्या आपल्या सुपीक डोक्याने आणि गनिमी काव्याने पाहुण्यांना पळवून लावतो. वरवर पाहिली तर कथा छान आहे, विनोदी आहे, ज्यांना वागण्याची रीतभात नाही त्यांना अद्दल घडवणारी आहे.

ज्याला आजकाल सुट्टी म्हणतात (weekend किंवा outing सारख्या) तशा सुट्ट्या मी फारशा अनुभवलेल्या नाहीत. माझ्या लेखी सुट्टी म्हणजे नातेवाईकांच्या गावाला जाणे तिथे (घरगुती) मौजमजा करणे. पाहुणे (जवळचे आणि दूरचे) येण्यातला आणि त्यांच्याकडे जाण्यातला आनंद मी पुरेपूर उपभोगला आहे. माझ्या भागात (किमानपक्षी नातेवाईकांत आणि शेजारपाजाऱ्यांत तरी) केवळ मुलंच नाही तर मोठी माणसेही अगदी उत्साहाने पाहुणचार करतात (किंवा करायची). त्यामुळे ही कथा मला कुठेतरी टोचली.

पाहुणे खरंच इतके वाईट असतात का? त्यातले कोणीही शिष्टाचाराला एवढे पारखे असतात? समजा एखाद्या चांगल्या नातेवाईकांसाठी गेली आपली एखादी सुट्टी, तर त्यात काहीच आनंद नसतो का? त्या गोष्टीत जसे पाहुणे आहेत ते अगदी टोकाचे म्हणता येतील. अशा पाहुण्यांना पळवून लावणंच इष्ट ठरेल. मला चिंता वाटली ती बोक्याच्या वयाची मुलं ही कथा वाचतील आणि त्यातला कुठला भाग त्यांच्या सर्वाधिक स्मरणात राहील (किंवा गोष्टीचं take-away काय असेल)? जर टाळण्यासारखे पाहुणे असतील तर ही मुलं त्यांना टाळायला शिकतीलच. नाही शिकली तर त्यांना शिकवायला घरोघरचे आईबाप समर्थ आहेत. पण अशा गोष्टींतून पोचणारा संदेश चांगला असावा असे मला वाटते. या गोष्टीत पुन्हा स्वकेंद्रितची झाक दिसली म्हणून हा लेखनाचा खटाटोप.

तिसरा संदर्भ कविवर्य कुसुमाग्रजांच्या एका बालकवितेतील. ती कविता खाली देत आहे. या कवितेवर वेगळे स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही पण काहीजणांचा असा आक्षेप असू शकेल की लहान मुलांच्या कोवळ्या मनावर (जी कोवळी मनं GTK, Roadrash, NFS सारखे हिंस्त्र गेम खेळू शकतात, विकृत टीव्ही सिरीयल्स बघू शकतात) वाईट परिणाम होईल. यावर उत्तर म्हणून विनोबा भाव्यांच्या शिक्षण विचार या पुस्तकातील एक विचार इथे मांडतो. मुलांना जगतानाच जगण्यातील जबाबदारीची ओळख व्हायला हवी हे सांगताना विनोबा म्हणतात - “पुष्कळांची अशी समजूत आहे की लहानपणापासून जीवनाच्या जबाबदारीचे भान जर मुलाला राहील तर त्याचे जीवन कोमेजून जाईल. पण जीवनाच्या जबाबदारीचे भान असण्याने जर जीवन करपून जात असेल तर जीवन ही वस्तु जगण्याच्या लायकीचीच नाही असे म्हणावे लागेल.”

कुसुमाग्रजांची कविता -

चांदोबा चांदोबा

चांदोबा चांदोबा

रुसलास का?

- हो रुसलो.

लिंबोणीच्या झाडाखाली

लपलास का?

- हो लपलो.

चांदोबा चांदोबा

का रुसलात?

का लपलात?

तुमच्याच गावी

काल पाहिली

तीन बालके गोजिरवाणी

पायपथावर अन्नावाचून

तडफडणारी

पहाटरात्री वस्त्रावाचून

गोठविणाऱ्या थंडीमध्ये

कुडकुडणारी,

आज पाहिली

त्याच ठिकाणी

तीन मुले ती

परंतु त्यांची जीवनज्योती

विझली होती.

अशा अमानुष गावासाठी

का उजळावे,

जिथे करूणा

वा माणूसपण

तिथे कशाला

मम अमृतकण

मी उधळावे?

म्हणून येथे दूर असा मी

बसलो आहे

लिंबोणीच्या झाडामागे

दडलो आहे.