Tuesday, July 28, 2009

वर्तुळ

आज सकाळी थोडा अस्वस्थ होतो, नेमका कशामुळे माहीत नाही. त्यानंतर लोकप्रभामध्ये ज्यूंच्या छळछावण्यांबद्दलचा एक लेख वाचला. त्यामुळे अस्वस्थता अजून थोडी वाढली. अस्वस्थता घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या - चहा घेतला, नवी गाणी ऐकली, पेपर वाचला; पण अस्वस्थता जाईना. शेवटी आंतरजालावर भटकायला सुरूवात केली. एका ब्लॉगवर "सखी मन लागेना" ही बंदिश दिसली. अगदी नकळत मी कुमारांची "सखी मन लागेना" ही रेकॉर्डिंग लावली.

बागेश्री हा विरहरसप्रधान राग आहे असं वाचलेलं/ऐकलेलं आहे. मलापण बागेश्रीतील विरहरस जाणवतो. इतर वेळी, बागेश्री ऐकून अगदी थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. आज मात्र अगदी अनपेक्षित परिणाम घडला. जसजसा ती रेकॉर्डिंग ऐकत गेलो, तसतसं अस्वस्थता हळूहळू दूर होत गेली. मनात शांतता पसरायला लागली. रेकॉर्डिंग जेव्हा संपली तेव्हा मी पूर्ण normal ला होतो. अगदी अलगदपणे हा परिणाम घडला.

राग आणि रागातून व्यक्त होणाऱ्या भावनांचं वर्तुळ पूर्ण झालं.