Tuesday, April 21, 2009

दर्द से मेरा दामन भर दे...

रसिकतेचं आणि वेदनेचं नातं बरंच जवळचं आहे. जर वेदना नसेल तर जगणं फारच गुळचट/ स्वप्नाळू होउन जाईल. त्यामुळे केवळ आनंदासाठी कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं माझ्य़ा रसिकतेच्या भूमिकेत बसत नाही. त्यामुळे एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट गंभीर आहे किंवा शोकांत आहे म्हणून न बघणं मला पटत नाही. कलेची परिपूर्ण व्याख्य़ा करण्याएवढा अजून विचार झालेला नाही पण जी मला जगण्याच्या जास्त जवळ घेउन जाते, जो प्रत्येक अनुभव मला घेणं शक्य नाही तो अनुभव एका रुपात माझ्यापुढे मांडते ती कला असं मला वाटतं. यात रंजनाचा भाग आहे पण केवळ रंजन नाही.

मागे एकदा अभय बंग यांनी एका भाषणात फार सुंदर मुद्दा मांडला होता. आपण गरीबांच्या/पीडीतांच्या/वंचिताच्या/ निसर्गाच्या दु:खाशी का जोडून घ्यावं याचं उत्तर देताना ते म्हणाले की बाबा आमटे यांच्या आनंदवनात कुष्ठरोग झालेला एक मुलगा होता जो वेदनेसाठी देवाकडे प्रार्थना करायचा. जर वेदना झाली तर हातपाय जिवंत आहेत जर वेदना झाली नाही तर कुष्ठरोग आपलं जाळं पसरवतोय आणि आपण मृत्यूच्या जास्त जवळ जातोय. त्याचप्रमाणे समाजातील गरीबांच्या किंवा पीडीतांच्या दु:खाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच कोषात राहिलो तर आपल्याला मनाचा कुष्ठरोग व्हायला वेळ लागणार नाही. मग उरेल एक संवेदनाहीन मन जे कुठल्याच भावनांना अनुभवू शकणार नाही.

मला हा वेदनेचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे पटला. मी माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रीण आठवून पाहिले आणि मला जाणवलं की ज्या- ज्यावेळेस आमच्या दोघापैकी कुणीतरी एकजण दु:खात होतं त्यावेळेस त्याला/तिला दुसऱ्याने आधार दिला किंवा दु:ख समजावून घेतलं. त्या दु:खाच्या bond मुळेच मैत्री जास्त घट्ट होऊ शकली. केवळ मौजमजेवर आधारीत मैत्री फार जवळीक साधू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत दोन-तीन-चार वर्ष घालवलीत, फक्त मौजमजा केली ते मित्र/मैत्रिणी तेवढी वर्षं संपली की लगेच किंवा काही काळानंतर माझ्या भावविश्वातून दूर होत गेले.

काही दिवसांपुर्वी निर्माण शिबिरात एका सत्राची सुरूवात प्रियदर्शनने लताच्या ’दर्द से मेरा दामन भर दे’ या गाण्याने केली. त्यावेळेस हे गाणं आणि त्याचे शब्द खूपच आवडले. माझा हा लेख या गाण्यापासूनच सुचला. ’दर्द से मेरा दामन’ इथे ऐकता येईल. त्याचे शब्द इथे हिंग्लीश मधे आणि इथे हिंदी मध्ये वाचता येतील.

Friday, April 10, 2009

अर्थ

कवितेचा अर्थ लागणं ही एक शब्दांत सांगायला अवघड अशी प्रक्रिया आहे. त्यामुळेच एका व्यक्तीला लागलेला एखाद्या कवितेचा अर्थे दुसऱ्या व्यक्तीला जसाच्या तसा समजावून देणं नुसतं अवघड नाही तर काही कवितांच्या बाबतीत अशक्य आहे. जो अर्थ मला कळालाय असं वाटतं पण शब्दांत मांडता येत नाही तो दुसऱ्याला कसा काय समजावून सांगणार? तरीही कविता समजण्यासाठी रसग्रहण हा एक चांगला मार्ग आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ सांगणं नाही तर कवितेची सौंदर्यस्थळं दाखवून देणं. रसग्रहणाबद्द्ल पुन्हा केव्हातरी.

कवी अनिलांची कविता "अर्थ" वाचण्यात आली, जी वाचल्यावर वाटलं की मला कवितेचा अर्थ लागण्याची प्रक्रिया या कवितेतील प्रक्रियेशी बरीच मिळतीजुळती आहे. कविता भावली तर त्यातील शब्द बाजूला पडून त्या कवितेतील भावनांचा परिणाम राहतो. त्यामुळे एखाद्या कवितेपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया निरनिराळे विचार करत पुन्हा एकदा त्या कवितेपाशी येते आणि कवितेतील एखादी प्रतिमा किंवा कल्पना समजली नसेल तरी कवितेचा पूर्ण अर्थ लागल्याचा अनुभव येतो. अनिलांची कविता -

अर्थ
कुणाच्या कवितेत असलेल्या शब्दव्यूहांत
अर्थ शोधीत बसत नाही
वाहावल्या त्याच्या भावप्रवाहात वाहत जातो
बुडी घेऊन पाहतो ठाव कुठे लागतो
चाचपडत बुद्धीचे हात
तळचा गाळ उपसतात
त्यांना काही मिळत नाही
अटकतात चरण मात्र अंत:करणाचे असावधान
जीवनवेलीच्या तंतूने गुंफिल्या
बारीक मुळ्यांच्या कोवळ्य़ा गुंतागुंतीत
सुटतां सुटत नाहीत पाय फसत जातात
आत-बाहेर भिजून होऊन ओलाचिंब पुन्हा येता थडीवर
काही जरी सापडले नाही तरी
सार्थक होते!

- अनिल

Wednesday, April 8, 2009

माण्साने - अनावश्यक लेख

खरंतर हा लेख लिहायची गरज नसावी असं माझं मत होतं. त्यामुळेच माण्साने या कवितेला मी काहीही आगापीछा न लिहीता फक्त कविता टाकली होती. पण कौस्तुभशी बोलताना माझा हेतू तेवढासा सफल झालेला नाही आहे हे लक्षात आलं. लेख लिहायला कारणीभूत अजून एक गोष्ट म्हणता येईल. कुठलाही लेख लिहीला की ब्लॉग कमेंटस, काही इ-मेल आणि/किंवा काही प्रत्यक्ष भेटीतले उल्लेख त्या लेखाची पोच देत असतात. ’माण्साने’ या पोस्टच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. असं का व्हावं?

असं ध्यानात आलं की त्यातील कल्पना मध्यमवर्गी पांढरपेशाला रुचणाऱ्या नाहीयेत. त्या प्रतिमा/कल्पना धुवट या गटात मोडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळे (फक्त) संदीप खरे टाईप लोकांना तर त्या पचणं जरा अवघडच आहे. मी स्वत: कवितेचा बऱ्यापैकी रसिक आहे. कविता ही भावनांचं expression आहे असं माझं मत आहे. त्या भावना अनुभवजन्य असतील व अनुभव प्रामाणिक असतील तरच ती कविता कुठेतरी मनास भिडते असं माझं मत आहे. त्यामुळे पाडगावकरांच्या ’प्रेम म्हणजे प्रेम..’ आणि ’सलाम’ ही कविता दोन्ही मला सारख्याच आवडतात. विंदाची ’साठीचा गझल’ आणि ’रक्तसमाधी’ मला सारख्याच आवडतात. अशी अगणित कवितांची यादी येथे देऊ शकेल. सांगण्याचा मुद्दा हा की फक्त विद्रोही कविताच उत्कृष्ट आणि बाकीच्या त्या कचकड्या असं माझं मुळीच मत नाही. कवितेत (पुरेसा) अनुभव नसेल तर किंवा अनुभवांना प्रामाणिकपणा नसेल तर कवितेत दंभ येतो. संदीप खरे टाईप कवी याचं उत्तम उदाहरण आहे.

आता थोडंसं ’माण्साने’ विषयी -
नामदेव ढसाळांबद्दल मला फारशी माहिती नाही. ही कविता त्यांच्या सुरूवातीच्या कवितांपैकी आहे. सुरूवातीच्या कवितांनंतर ढसाळांच्या कवितेचाही साचा बनत गेला असं माझ्या एका ज्येष्ठ मित्राचं आणि परिचयातल्या एका ज्येष्ठ लेखकाचं मत आहे. मला जे काही सांगायचंय ते फक्त प्रस्तुत कवितेबद्दल आहे.

ज्या माणसाला जन्म झाल्यापासून कायम अन्यायच झालेला आहे, त्या माणसाकडून शुद्ध भाषेची, धुवट पाढरपेशेपणाची अपेक्षा करणं हे नुसतं चूक नाही तर तो त्यावर अजून एक अन्याय आहे. माण्साने ही कविता अशा एका माणसाची प्रस्थापित व्यवस्थेबद्दलची चीड आपल्यासमोर मांडते. हा माणूस झालेल्या अन्यायाच्या संतापाने थरथर कापतोय आणि ही कविता लिहीतोय असं वाटतं. त्यामुळेच कधीकधी दोन वेगळ्या व्यक्तींना एकाच पारड्यात बसवलेलं आढळेल. अन्यायाची वेगवेगळी (आणि किंचीत परस्परांशी संबंध नसलेली) रूपं एकानंतर एक मांडलेली आढळतील. आता त्या कवितेतील प्रतिमा किंवा वर्णन केलेली अन्यायाची रूपं जरा भडक वाटली तरी नीट विचार केला तर जाणवेल की सध्याच्या अन्यायाचं स्वरूप तेच आहे फक्त ढसाळांनी ते वेगळ्या स्वरूपात आणि शब्दांत मांडलं. बरं, ढसाळांना नुसतीच प्रस्थापित व्यवस्थेला शिव्या द्यायच्यात असं नाही हे त्यांनी शेवटच्या कडव्यात दाखवून दिलंय. ’सर्वे सन्तु निरामय:’ या श्लोकातील किंवा पसायदानातील भावनेशी नातं सांगणारं शेवटचं कडवं आहे.

ही कविता मी सांगितलेल्या दोन्ही निकषांवर उतरते आणि म्हणून ती मला सुंदर वाटते आणि आवडते. ज्यांना संदीप खरे आवडतो पण अशा कवितांकडे बघायला नको वाटतं त्यांनी आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांचा पुन्हा एकदा विचार करावा. मी आधी post केलेल्या कवितेवर काहीच प्रतिक्रिया (online/offline/प्रत्यक्ष) मिळाल्या नाहीत म्हणून हा लेख लिहीला.

Monday, February 23, 2009

काही योगायोग

एकदा किशोरींची मैफल ऐकून बाहेर येत होतो. फक्त मल्हार रागांवर आधारित मैफिल होती. किशोरीताईंनी ३-४ मल्हार गायले व शेवटी त्यांनी अडाणा मल्हार गायला. तो राग आणि बाकीचे मल्हार ऐकल्यावर असं जाणवलं की ज्या रागात गंधार (ग) स्वर महत्त्वाचा आहे किंवा ग स्वरावर विशेष focus आहे त्या रागांचं मल्हार रागावर चांगलं कलम होऊ शकतं. उदाहरणार्थ - दरबारी कानडा + मल्हार -> मियां मल्हार, अडाणा + मल्हार -> अडाणा मल्हार (दोन्ही रागांत ग वर आंदोलन आहे). मी ’ग’ स्वरावर विशेष focus असणारे बाकीचे राग आठवले. डोळ्यापुढे झिंझोटी, जयजयवंती हे राग आले. जयजयवंती आणि मल्हार यांचा मिश्र राग कसा असेल याचा विचार करू लागलो. डोक्यात रागस्वरूपावर विचार चालू होता. धडपडत का होईना डोळ्यापुढे रागस्वरूप उभं राहात होतं. घरी आलो, जयजयवंती व मल्हारावर आणखी माहिती मिळवावी म्हणून इंटरनेटवर गुगललं तर जयजयवंती आणि मल्हार यांचं मिश्रण असलेला जयंत मल्हार असा राग आधीच अस्तित्वात आहे हे कळालं. पं. बस्वराज राजगुरूंची या रागामधली recording मिळाली. त्याच्याशी मी विचार केलेलं रागस्वरूप त्याच्याशी बरंच जुळत होतं. माझे विचार कुठल्यातरी संगीतकाराशी थोडेसे का असेना जुळतात हे बघून छान वाटलं.

असाच आणखी एक योगायोग.
लॅबमधून रुमवर जाताना मी नेहमीच डोक्यात कुठलातरी राग घोळवत जायचो. त्यादिवशी नंद राग (मनातल्या मनात) गात चाललो होतो. नंद हा तीन रागांचं थोडंसं अवघड असं मिश्रण आहे - यमन, बिहाग आणि हमीर (हे राजन पर्रीकरांच्या site वरून स्पष्ट झालं), थोडाही तोल ढळला की नंद पार बिघडतो. 'ढूंढू बर सैंया' ही नंद रागातली प्रसिद्ध विलंबित बंदिश. यातील "बर सैं" या ठिकाणी आपल्याला बिहाग जाणवतो (सा-ग या आलापामधून). मी गात असताना मात्र एकदोनदा सा-ग ऐवजी चुकून सा-म असं गायलो आणि केदार रागाचा आभास निर्माण झाला. मला ते छान वाटलं. नंतर गाताना पण कधीकधी सा-म असं गायची इच्छा व्हायची. असं वाटलं की नंद आणि केदार यांचं मिश्रण करुन नवीन रागस्वरूप करता येईल का? थोडासा प्रयत्न केला पण नंद हा बऱ्यापैकी अवघड राग असल्याने नंद आणि केदार यांचं मिश्र स्वरूप खूप स्पष्टपणे दिसलं नाही. बऱ्याच दिवसांनी कुमारांच्या खूप साऱ्या खाजगी रेकॉर्डिंग मिळाल्या त्यात केदार नंद असा राग होता जो नंद आणि केदार रागाचा मिश्र राग आहे. पुन्हा एकदा छान वाटलं.

अजुन असे १-२ योगायोग आहेत. ते पुन्हा कधीतरी.

Wednesday, February 4, 2009

आमीर खाँ साहेब

काही दिवसापूर्वी लिहीलं होतं. त्यावेळेस publish करावंसं वाटलं नाही. आत्ता वाचून बघितलं तर माझं मलाच ठीक वाटलं.
============================================================

अचानक ठरवता केलेल्या गोष्टींची मजा plan करून केलेल्या गोष्टींना येत नाही. खरेतर आज office मधे प्रचंड काम आहे. रात्रीचे ११ वाजलेत. उद्या गावाला जायचंय त्यामुळे काम करणे आवश्यक आहे पण गाणे कवितांचा असा काही मस्त मूड लागलाय! आमीर खाँसाहेबांचा अतिशय सुंदर यमन ऐकतोय त्यामुळे काहीतरी लिहावं अशी इच्छा झाली.

मला आमीर खाँचा यमन मी सगळ्यात पहिल्यांदा ऐकला. साधारणतः - वर्षांपूर्वी. त्याआधी फक्त "मधुबन मे राधिका नाचे रे" या रफीच्या गाण्यातील शेवटच्या ताना आमीर खाँनी गायल्यात एवढंच माहीत होतं. त्या ताना ऐकून छान तर वाटायचं पण आमीर खाँच्या गायकीच्या उंचीचा अंदाज आला नाही. सुरुवातीला त्यांचे - राग प्रचंड आवडले. मग तेच राग पुन्हापुन्हा ऐकत गेलो. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी सापडत गेलं - अजूनही सापडतं. PG करताना बरंच गाणं (recorded स्वरूपातलं) ऐकलं आणि आमीर खाँच्या उंचीचा अंदाज येत गेला.

काही लोक प्रसिद्धिसाठी गातात, काही लोक त्यांचं/त्यांच्या घराण्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी गातात, काही लोकांना खूष करण्यासाठी गातात. पण काही लोक गाण्याच्या रूपातून आत्मतत्वाचा शोध घेत असतात. मला आमीर खाँ या category मधले गायक वाटतात. खरंतर शास्त्रीय संगीतात बुद्धिमान गायकांची कमी नाही. dedicated गायकांची पण कमी नाही. मग आमीर खाँचं वेगळेपण कोणतं? शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत मला नाही सांगता येणार. पण मला जाणवणारं वेगळेपण नक्कीच सांगू शकतो.

आमीर खाँ संगीत गात नसावेत, तर ते संगीत जगत असावेत. कारण त्यांचं कुठलंही recording घेतलं तरी आमीर खाँ एक अगदी नवीन विचार मांडत आहेत असं वाटत नाही, किंवा चमत्कृतीपूर्ण मांडणी करत नाहीत. आपल्याला जाणवणाराच विचार ते सांगताहेत असं वाटतं. एखाद्या व्यक्तीने स्वतः जगत नसलेला विचार मांडायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला काय सांगायचंय ते कळतं पण ते सांगणं/ तो विचार आतपर्यंत झिरपत नाही. आमीरखाँ साहेबांचं गाणं आतमध्ये झिरपतं त्यामुळे त्यांचं केवळ गाणं ऐकून, त्यांना प्रत्यक्ष भेटताही त्यांच्या lifestyle चा, personality चा मला अंदाज येतो. वागण्या-बोलण्यात कुठलाही डौल नाही, अतिशय साधं वागणं/बोलणं . गाणं हा विषय सोडून दुसर्या विषयांबाबत विरक्ती म्हणता येईल एवढा अलिप्तपणा. कायम गाण्याचं चिंतन मनात. हे चिंतन काय असेल याचा मात्र थांग लागत नाही.

त्यांचं सगळं व्यक्तिमत्व त्यांनी गायलेल्या मारवा रागातून व्यक्त होतंय. धीरगंभीरपणा - आव आणलेला नव्हे तर जीवनाचं सार पचवून पण त्याचं जडत्व आलेला. मी हा मारवा enjoy करत ऐकू शकत नाही. तो मला अस्वस्थ करतो तरीही ऐकावासा वाटतो. आपल्याला न उलगडणारी कोडी हा माणूस उलगडून सांगतोय असं वाटत राहतं, ती भाषा तर कळत नाही, पण या माणसाची प्रामाणिकपणा आणि अधिकार आत भिडतो आणि मी पुन्हा एकदा खोलवर विचार करू लागतो.

Saturday, January 31, 2009

माण्साने

माण्साने पहिल्याप्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्वस्त करुन घ्यावे
बिनधास डिंगडांग धतींग करावी
चरस गांजा ओढावा
अफीन लालपरि खावी
मुबलक कंट्री प्यावी - ऐपत नसेल तर
स्वस्तातला पाचपैसा पावशेर डाल्डा झोकावा
दिवसरात्र रात्रंदिवस तर्रर रहावे
याला त्याला कुणालाही आयभयणीवरून
गाली द्यावी धरुन पिदवावे...
माण्साने जवळ रामपुरी बाळगावा
गुपची फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू
ऍसिडबल्ब इत्यादि इत्यादि हाताशी ठेवावे
मागेपुढे न पाहता कुणाचेही डेहाळे बाहेर काढावे
मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी
माण्साला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे
त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगर्‍या शिजवून घ्याव्या
शेजार्‍याला लुटावे पाजार्‍याला लुटावे बँका फोडाव्यात
शेठसावकाराची आय झवून टाकावी नात्यागोत्याचा
केसाने गळा कापावा जेवणातून विष घालावे मूठ मारावी
माण्साने कुणाच्याही आयभयणीवर केव्हाही कुठेही चढावे
पोरीबाळींशी सइंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये
तरणी म्हणू नये कवळी म्हणू नयी सर्वांना पासले पाडावे
व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे
रांडवाडे वाढवावेत : भाडखाव व्हावे : स्त्रियांची नाकं थानं
कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत
माण्साने रस्ते उखनावेत ब्रीज उखडावेत
दिव्याचे खांब कलथावेत
पोलिसस्टेशने रेल्वेस्टेशने तोडावीत
बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात
साहित्यसंघ शाळा कॉलेजं हॉस्पिटलं विमानअड्डे
राजधान्या इमले झोपड्या वखवखलेल्या भुकाळ वस्त्या
यावर हातबाँब टाकावेत
माण्साने प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस
मार्क्स अशोक हिटलर कामू सार्त्र काफ्का
बोदलेअर रेम्बो इझरा पाउंड हापकिन्स गटे
दोस्तोव्स्की मायकोव्हस्की मॅक्झीम गॉर्की
एडिसन मिडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपीअर
ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे
मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे
येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे
देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करुन टाकावे
पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने
भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत
माण्साने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने
फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत
कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात आता हागावे मुतावे गाभडावे
मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे
घाणेंद्रिये जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे
जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक
उभारावेत..... अश्लील अत्याचारी व्हावे माण्सांचेच
रक्त प्यावे डल्ली सल्लीबोटी खावी चर्बी वितळवून प्यावी
टिकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर
वर्गयुद्धे . जातियुद्धे . पक्षयुद्धे . धर्मयुद्धे . महायुद्धे
घडवून आणावी पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे
बेलाशक अराजक व्हावे
अन्न न पिकवण्याची मोहिम काढावी अन्नावाचून पाण्यावाचून याला त्याला
स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही
पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी माण्साने विव्हळत किंकाळत
लवकरात लवकर मरण्याचे योजाने
हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे

नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये
काळागोरा म्हणू नये तू ब्राम्हण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा
आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावे
माण्साचेच गाणे गावे माण्साने


-- नामदेव ढसाळ

Friday, December 26, 2008

शास्त्रीय संगीत श्रवणातील बदलते trends

बर्याच जणांना माझी ही post आवडणार नाही. कारण त्यामध्ये त्यांच्या शास्त्रीय संगीतातील जी श्रद्धास्थाने आहेत त्यांना धक्का लागू शकतो.

परवाच (मराठी "परवा" - वर्षांपर्यंत मागे जाउ शकतो) पुण्यात शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्व महोत्सव झाला. पूर्ण नाही पण बराचसा ऐकला. अगदीच मोजके (२-३) performance माझ्या मनाला भिडले. अगदी गाजलेले म्हणावेत अशा संगीतकारांनीही निराशा केली (किंवा नेहमीच करतात). त्यातून आणि in-general गेल्या काही दिवसांत शास्त्रीय संगीत ऐकण्यात जे बदल मी अनुभवले ते मांडावेसे वाटतात. हे बदल आत्ताच झाले असतील असे नाही पण मला गेल्या २-३ वर्षात प्रकर्षाने जाणवले.

वाद्य किंवा कंठ (vocal) हे एक माध्यम आहे ज्यातून संगीतकार आपले संगीतविचार सांगत असतो. शास्त्रीय संगीताच्या साधनेत दोन गोष्टी आहेत - पहिली माध्यमावरची (किंवा ते वाजवण्याच्या तंत्रावरची) हुकुमत आणि दुसरी स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत जाणं. पहिली गोष्ट जी आहे ती तुलनेने फारशी अवघड नाही. म्हणजे काय, की काही ठराविक वर्षे तंत्राचा रियाज केला की तंत्रावर हुकुमत येऊ शकते. आता ही ठराविक वर्षे कुणासाठी /१०/१५/२०/२५/४० अशी असू शकतात. पण तंत्रावर हुकुमत मिळवणं हे बरंचसं hard work मधून साधु शकतं. पण दुसरी गोष्ट जी आहे - स्वतःचे संगीतविचार प्रगल्भ करत राहणं त्यासाठी मात्र विचारप्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, एक उपजत सौंदर्यदृष्टी असावी लागते, प्रतिभा असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्णत्वाला पोचलेलो नाही आहोत हे भान कायम जागृत असावं लागतं.आता ही दुसरी गोष्ट फक्त hard work ने साधू शकते का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की अतिउच्च प्रतीचा संगीतकार असेल तर त्यात थोडासा नैसर्गिक देणगीचा भाग असायला लागतो.

एखादा चांगला संगीतकार होण्यासाठी तंत्रावरची हुकुमत तर आवश्यक आहेच पण पुरेशी नाही. कारण संगीतविचार प्रगल्भ नसतील तर नुसत्या तंत्राने संगीत प्रभावी होउ शकत नाही. एखादा राग कुठल्याकुठल्या काव्यरसाशी जोडला जातो, त्याचं स्वरुप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे - तो राग लाजरा आहे की धीट आहे, धसमुसळा आहे की नाजुक आहे,. त्याचा जीव किती (किंवा तो किती वेळ रंगवता येईल) या सगळ्या गोष्टींवर संगीतकाराला अतिशय मेहनत(विचार) करावी लागते. असाच विचार फक्त राग या गोष्टीवर नसून ताल/गायकी . अनेक गोष्टींवर एकत्रितपणे करावा लागतो. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हा विचार तंत्राशिवाय केला जाऊ शकतो.

संगीतकार/ साथीदार करत असलेल्या काही चुका
. केवळ फास्ट वाजवणं म्हणजेच चांगल वाजवणं असं समजणं ही पहिली चूक. ते काही वेळ बरं वाटू शकतं पण काही वेळानंतर irritating होतं. यात आजकालचे बहुतेक वाद्य वाजवणारे येतात. अगदी ज्येष्ठ आणि (तथाकथित) लोकप्रिय संगीतकारपण (वाद्यवादक) असं समजतात याचं दु: होतं.
. साथीदार म्हणजे तबलजी/संवादिनी यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते साथ करत आहेत आणि स्वतःचं कौशल्य दाखवण्याची ही जागा नाही. ते कौशल्य त्यांनी सोलो वादनात दाखवावे. एखाद्या/दुसर्या ठिकाणी तबल्याच्या हरकती चांगल्या वाटू शकतात पण त्या जास्त झाल्यानंतर त्याला मूळ वादक तबलजी यातील हाणामारीचं स्वरूप येतं आणि मूळ रागाचा विचार अगदीच बाजूला पडतो. चांगल्या साथीदारांची उदाहरणं द्यायची झाली तर पुष्कळ आहेत. . अहमदजान थिरकवा साहेब, पं सुरेश तळवळकर, पं अरविंद थत्ते, पं अप्पा जळगावकर ही काही लगेच आठवणारी नावं. हे सर्व अतिशय मोठे कलाकार आहेत पण यांची साथ कुठेही आक्रस्ताळेपणा करता अतिशय संयत असते. यातले तबलेवाले आणि आजकालचे काही इतर leading आणि popular तबलजी आठवून बघा म्हणजे फरक जाणवेल. कधीकधी असंही जाणवतं की वादकाची तयारी कमी असल्यामुळे तो/ती तबलजीला जास्त scope देतात.
. काही वाद्य ही लोकसंगीतातून/ पाश्चात्य पद्धतीतून शास्त्रीय संगीतात आलेली आहेत याचं भान ठेवणं. दरबारी कानडा हा राग संतूरवर ऐकून मी सर्द झालो. हा राग मींडकारी/ आंदोलनातून खुलतो. संतूर या वाद्यावर दोन्ही गोष्टी प्रभावीपणे वाजवणं शक्य नाही, वाजवल्या तरी कानाला गोड वाटत नाही. आता माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला ज्या गोष्टी कळतात त्या एवढ्या मोठ्या कलाकाराला कळत नाहीत की कळूनही वळत नाहीत?
. लोकांना आवडेल तसं आपलं गाणं mold करणं. या मुद्द्या वर मुळातून वाद होउ शकतात. पण केवळ लोकांना आवडतं म्हणून एकच आलाप/तान पुन्हापुन्हा गाणं/वाजवणं यानं काय साध्य होतं?

५.एखाद्या व्यक्तीचे गुरू मोठे असतील तर त्या व्यक्ती पण मोठ्या असतील असे नाही. माझे गुरू उस्ताद अमुक किंवा पंडितजी तमुक असा सारखासारखा उल्लेख केल्याने आपण फार मोठे कलाकार होत नाही उलट जाणकारांत आपलं हसू होतं. त्यामुळे गुरूच्या नावाची पुण्याई फार दिवस टिकत नसते याची जाणीव गायक/वादकांनी ठेवावी व आपापल्या संगीतावर प्रामाणिक मेहनत करावी.


श्रोत्यांच्या काही त्रुटी :
. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायची वृत्ती - अर्थात हे सर्व श्रोत्यांना शक्य नाही पण कमीतकमी संगीताच्या विद्यार्थ्यांनी तरी याकडे गंभीरपणे बघायची गरज आहे. उदा. जो कोणी .रशिद खाँची स्तुती करतो त्याला मी रशिद खाँचे गुरु . निस्सार हुसेन खा साहेब ऐकण्याची शिफारस करतो. निस्सार हुसेन साहेबांची गायकी रशिद खां पेक्षा चांगली आहे त्यांचं गाणं ऐकल्यावर रशिद खाँच्या आजकालच्या गाण्यातील त्रुटी दिसतात. आजकालच्या इंटरनेटच्या युगात तर कुठलीही गोष्ट गुगलली की सापडते. इंटरनेटवर शोध घेतला तर निस्सार हुसेनखाँच्या काही recordings सापडतात, असे असताना फारच कमी जण मूळ आणि दर्जेदार गाण्याचा शोध घेताना दिसतात.

चांगल्या संगीत समीक्षकांची कमतरता :
. उठसूट कुठल्याही गाण्याला बहारदार/रंगतदार म्हटलं की त्या शब्दांना मोल रहात नाही. एखादं गाणं खराब झालं तर लिहा नं ते खराब झालं म्हणून. या वेळेस तर जवळपास सगळ्या newspapers मधे मला हे जाणवलं. मी एकदा अतिशय भिकारी गाण्याचं वर्णन बहारदार असं वाचलं आणि पुढचं परीक्षण वाचायचंच सोडून दिलं. अर्थात यात दोष रिपोर्ट लिहीणार्यांचा नसून तो newspapers चा आहे आणि कदाचित त्यांचाही नसेल कारण त्यांनाही त्यांना परवडणार्या rate मधे चांगलं समीक्षक मिळत नसेल.

या गोष्टींमुळे जो नवखा श्रोता असतो तो चुकीच्या गोष्टींना शास्त्रीय संगीत समजतो किंवा पळुन तरी जातो. change is the only constant thing असं म्हणतात. त्या न्यायाने सध्या जे शास्त्रीय संगीत आहे ते पण कुठल्यातरी बदलातून आलेलं आहे आणि ते यापुढेपण बदलत राहणार. फक्त बदल करणार्‍यांनी (किंवा आम्ही बदल करतो असं म्हणणार्‍यांनी) स्वतःच्या कुवतीचा अंदाज घ्यावा आणि मग बदल करावेत.