Saturday, January 31, 2009

माण्साने

माण्साने पहिल्याप्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्वस्त करुन घ्यावे
बिनधास डिंगडांग धतींग करावी
चरस गांजा ओढावा
अफीन लालपरि खावी
मुबलक कंट्री प्यावी - ऐपत नसेल तर
स्वस्तातला पाचपैसा पावशेर डाल्डा झोकावा
दिवसरात्र रात्रंदिवस तर्रर रहावे
याला त्याला कुणालाही आयभयणीवरून
गाली द्यावी धरुन पिदवावे...
माण्साने जवळ रामपुरी बाळगावा
गुपची फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू
ऍसिडबल्ब इत्यादि इत्यादि हाताशी ठेवावे
मागेपुढे न पाहता कुणाचेही डेहाळे बाहेर काढावे
मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी
माण्साला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे
त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगर्‍या शिजवून घ्याव्या
शेजार्‍याला लुटावे पाजार्‍याला लुटावे बँका फोडाव्यात
शेठसावकाराची आय झवून टाकावी नात्यागोत्याचा
केसाने गळा कापावा जेवणातून विष घालावे मूठ मारावी
माण्साने कुणाच्याही आयभयणीवर केव्हाही कुठेही चढावे
पोरीबाळींशी सइंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये
तरणी म्हणू नये कवळी म्हणू नयी सर्वांना पासले पाडावे
व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे
रांडवाडे वाढवावेत : भाडखाव व्हावे : स्त्रियांची नाकं थानं
कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत
माण्साने रस्ते उखनावेत ब्रीज उखडावेत
दिव्याचे खांब कलथावेत
पोलिसस्टेशने रेल्वेस्टेशने तोडावीत
बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात
साहित्यसंघ शाळा कॉलेजं हॉस्पिटलं विमानअड्डे
राजधान्या इमले झोपड्या वखवखलेल्या भुकाळ वस्त्या
यावर हातबाँब टाकावेत
माण्साने प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस
मार्क्स अशोक हिटलर कामू सार्त्र काफ्का
बोदलेअर रेम्बो इझरा पाउंड हापकिन्स गटे
दोस्तोव्स्की मायकोव्हस्की मॅक्झीम गॉर्की
एडिसन मिडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपीअर
ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे
मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे
येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे
देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करुन टाकावे
पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने
भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत
माण्साने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने
फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत
कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात आता हागावे मुतावे गाभडावे
मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे
घाणेंद्रिये जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे
जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक
उभारावेत..... अश्लील अत्याचारी व्हावे माण्सांचेच
रक्त प्यावे डल्ली सल्लीबोटी खावी चर्बी वितळवून प्यावी
टिकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर
वर्गयुद्धे . जातियुद्धे . पक्षयुद्धे . धर्मयुद्धे . महायुद्धे
घडवून आणावी पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे
बेलाशक अराजक व्हावे
अन्न न पिकवण्याची मोहिम काढावी अन्नावाचून पाण्यावाचून याला त्याला
स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही
पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी माण्साने विव्हळत किंकाळत
लवकरात लवकर मरण्याचे योजाने
हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे

नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये
काळागोरा म्हणू नये तू ब्राम्हण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा
आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावे
माण्साचेच गाणे गावे माण्साने


-- नामदेव ढसाळ