Wednesday, August 27, 2008

रंजिश ही सही...

एक अजरामर गझल....

गझल म्हणजे रडत बसणं ही माझी आधीची समजूत. त्यामुळे आणि उर्दू समजण्याचा ताण वाटल्यामुळे मी गझलचे शब्द पूर्ण ignore करून त्यातल्या गायकीसाठी गझल ऐकायचो. त्यामुळे माझे आवडते गझल गायक पण मेहंदी हसन आणि बेगम अख्तर आहेत. ६-७ वर्षांपूर्वी रंजिश ऐकण्यात आली आणि खूपच आवडली पण अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. IIT मध्ये असताना अनिकेतने एकदा त्याचा अर्थ असलेली link forward केली आणि रंजिश चे शब्द आणि अर्थ पण प्रचंड आवडला.

मुळात ही एक देवदास मनोवृत्तीची गझल. मला देवदास मनोवृत्तीचा मनापासून राग. देवदास आणि देवदास मनोवृत्तीचे लो़कं म्हणजे पळपुटे हे समीकरण मनात नक्की बसलेलं.परिस्थितीशी सामना न करता जुन्या आठवणींचा गहिवर काढत रडत बसणं हाच यांचा धर्म. मग नशिबाला दोष देत दारु किंवा तत्सम गोष्टींचे व्यसन लावून हे कायम रडण्याचं दळण दळत बसलेले. ही माझी देवदास लोकांबद्दलची समजूत. माझ्या स्वःतच्या philosophy नुसार खरं तर मला रंजिश आवडायला नव्हती पाहिजे. पण रंजिशचा अर्थ कळाल्यानंतर का कोण जाणे मला रंजिश प्रचंड आवडली. त्यातल्या मनोवृत्तीचा तिटकारा नाही आला. पहिल्यांदाच देवदास कुठेतरी थोडासा समजतोय असं वाटायला लागलं. अजूनही देवदास आणि त्या category मधले लोक आवडत नाहीतच पण प्रेमभंग/कायमचा विरह झाल्यानंतर प्रत्येकजण या अवस्थेतून अगदी थोड्या काळासाठी का होईना पण जातोच अशी जाणीव झाली आणि म्हणूनच याच्याशी संबंधित भावभावना कितीही practical/ideal जरी असल्या तरी रंजिश ही गझल त्याचं एक मानवी स्वरूप वाटलं. रंजिश ही गझल प्रेमातलं किंवा आकर्षणातलं उदात्त रूपाबरोबरच त्याचं मानवी स्वरूप पण मांडते आणि म्हणूनच ती जास्त सुंदर वाटते असं मला वाटतं.

मेहंदी हसन यांनी रंजिश जशी गायलीय त्याला तोड नाही. त्यावर किंवा रंजिश च्या musical composition वर एक वेगळा लेख होऊ शकेल. पण आज अहमद फराज (रंजिश चे शायर) गेल्याची बातमी वाचली आणि त्यांना लेखातून श्रद्धांजली वाहावी असं वाटलं. अहमद फराज यांना माझी श्रद्धांजली.

Tuesday, August 19, 2008

शास्त्रीय संगीतातील शास्त्र आणि श्रवण

शास्त्रीय संगीत ऐकण्याबद्दलचा एक फार मोठा गैरसमज म्हणजे ते ऐकण्यासाठी गाण्याचं शास्त्र समजावं लागते. आधीच्या post मध्ये गाणं ऐकण्याचे analytical mode आणि pleasure mode असे दोन modes सांगितले होते. याचाच दुसरा अर्थ आहे की गाणं कुठल्या mode मध्ये ऐकायचं हा सर्वस्वी तुमचा choice आहे. त्यात उच्चनीच असं काही नाही. शेवटी शास्त्रीय संगीतातील शास्त्र म्हणजे तरी काय आहे?

जेव्हाकेव्हा शास्त्रीय संगीतातील शास्त्र तयार झालं नव्हतं (किंवा जेव्हा फक्त लोकसंगीत अस्तित्वात होतं) , तेव्हाच्या संगीतकारांना संगीतातील काही गोष्टींना, काही नियमांना किंवा काही आकृतीबंधांना (patterns) मूर्तरूप (formal models) द्यावंसं वाटंलं. ते त्यांनी राग किंवा तत्सम संज्ञांच्या (स्वर, कोमल/तीव्र/शुद्ध स्वर, आरोह, अवरोह, इ.) स्वरूपात मांडलं. (काळाच्या रेषेवर) त्यानंतरच्या संगीतकारांनी तीच मूर्तरूपं वापरणं चालू ठेवलं. याचं अगदी साधं कारण म्हणजे ती models बर्‍यापैकी परिपक्व होती/होत गेली आणि त्यांना आधी formalize केलेल्या गोष्टी पुन्हा formalize करण्यात वेळ दवडण्यापेक्षा ( re-inventing the wheel) संगीतातील काही दुसर्या गोष्टींवर (नवीन राग, गाण्याच्या नवीन शैली, .) लक्ष केंद्रित करावंसं वाटलं. त्यामुळे तीच formal models पुढे वापरण्यात येत गेली आणि विकसत गेली. आता, ज्या लोकांना ही models समजून घेण्यापेक्षा स्वतःची अमूर्त रुपं वापरायची (abstract models) आहेत ते ती खुशाल वापरू शकतात. श्रवणाच्या आनंदाचा गाण्याच्या तांत्रिक बाबींशी संबंध नाही तो याच कारणासाठी. त्यामुळे पारंपारिक चालत आलेले formal models असू द्या किंवा स्वतः develop केलेले अमूर्त models असू द्यात, त्यामुळे श्रवणाच्या आनंदात बाधा यायचं मुळीच कारण नाही. उदाहरणार्थ, भूपाचे स्वर ऐकल्यावर एखाद्याला भूप राग त्यातील शास्त्र समजेल तर दुसर्या कोणाला त्यातलं शास्त्र समजून घेताही स्वतःच्या भावभावनांशी link करता येईल (जो की गाण्याचा एक हेतू आहे). पुलंनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त त्या रागातील स्वरांच्या रचना (permutations) नव्हेत तर त्यातील भाव जास्त महत्त्वाचा आहे. म्हणूनच जे लोक गाण्यातील फक्त गणित किंवा शास्त्र बघतात ते लोकच ऐकण्यासाठी गाणं "समजलं" पाहिजे या गोष्टीचा पुरस्कार करतात.

पुस्तक परिचय : बारोमास - सदानंद देशमुख

आपण बर्‍याच गोष्टी आपल्याला सोयीस्कर पडतील अशा गृहीत धरतो. मग कधीतरी एखादा अनुभव असा येतो किंवा असं काहीतरी वाचण्यात येतं की ती गृहीतके पूर्णपणे मोडून पडतात व वस्तुस्थिती लक्षात येउन परिस्थितीचा पूर्ण विचार करणं आवश्यक बनतं. सध्या आपण शेतकर्‍यांचं जगणं असंच गृहीत धरुन चाललो आहोत. पेपरमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी वाचली की थोडा वेळ हळहळ वाटून आपण कामाला लागतो. कर्जबाजारीपणा हेच शेतकर्‍यांच्या आत्महत्याचं कारण आहे असं प्रसारमाध्यमं भासवतात. पण हा कर्जबाजारीपणा का आला आहे याचं बारोमास इतकं अचूक चित्रण मला तरी कुठल्या लिखाणात आढळलं नाही. (कदाचित माझं वाचन कमी असेल, पण त्यामुळे बारोमासचं महत्व कमी होत नाही.)

बारोमास वरवर पाहता एक कादंबरी आहे. पण नीट विचार केला तर बारोमास फक्त ललित अनुभव मांडणारी कादंबरी न ठरता सध्याच्या शेतीविषयक प्रश्नावर भाष्य करणारं पुस्तक आहे. शेती, शेतीचे सध्याचे स्वरूप व त्यातील डोंगराएवढ्या अडचणी निस्तरता निस्तरता होणारी शेतकर्‍याची होणारी दमछाक देशमुखांनी एका सुशिक्षीत तरुणाच्या व त्याच्या कुटुंबियाच्या माध्यमातून मांडली आहे.

एकनाथ हा एक सुशिक्षीत तरुण. पण नोकरीसाठी लाच देउ न शकल्याने तो आपला वडिलोपार्जित धंदा - शेती करु लागतो. या शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने त्याची व त्याच्या कुटुंबाची होणारी घुसमट, कुठेच मार्ग दिसत नसल्यामुळे अंधश्रद्धकडे होणारी वाटचाल, आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळे भावाभावात बिघडलेले संबंध व विस्कटलेली वैवाहिक नाती, नोकरीसाठीच्या असहायतेचा फायदा घेउन पैसे घेणारे व फसवणारे नोकरीचे दलाल,या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणारे नेते आणि या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध देशमुखांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडला आहे.

शेतकर्‍यांची vote bank सर्वच राजकीय नेत्यांनी गृहीत धरल्यामुळे जागतिकीकरणानंतर आवश्यक असलेले policy मधील बदल केले गेले नाहीत. ( जागतिकीकरणानंतर - हे माझं आधीचं मत होतं. अरूण देशपांडे यांच्या अंकोली येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर समजलं की या policies शेतकर्‍यांना favourable कधीच नव्हत्या. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून - संदर्भ : महात्मा फुले व पंजाबराव देशमुखांचं लिखाण). या policies च्या अभावामुळं शेतकर्‍यांना मोठा तोटा सोसून आपला माल विकावा लागतोय. व त्याचं फलित म्हणजे शेतकर्‍यांचं खालावलेलं राहणीमान, मुलभूत सुविधांचा अभाव, विकासाच्या संधीचा अभाव. या सगळ्या गोष्टी आणि सोबतच निसर्गाची अवकृपा यांचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकर्‍यांची परिस्थिती दिवसेदिवस बिघडतच जातेय. लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणं ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाय केले तरंच चित्र थोडंफार बदलण्याची शक्यता आहे.

एकंदरीत बारोमास हे एक अस्वस्थ करणारं पुस्तक आहे. सदानंद देशमुखांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २००४ सालचा पुरस्कार मिळालेला आहे.

disclaimer :
पुस्तकाच्या विषयावरूनच लक्षात आलं असेल की हा एक खूप मोठा विषय आहे. शेती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, जागतिकीकरण या विषयांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्यावर प्रभुत्वानं लिहीणं शक्य नाही. माझ्या या लेखाचा हेतू शेती किंवा तत्सम विषयावर भाष्य करणं हा नसून असं भाष्य करणार्‍या एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन देणे हा आहे. पण हे पुस्तक वाचल्यावर मलातरी या विषयाचा जास्त अभ्यास (theoritical/practical) करावा असं वाटलं म्हणून हा लेख लिहीला आहे. आधीच्या post मध्ये नमूद (mention) केल्याप्रमाणे टीका व सूचनांचे स्वागत. तपशीलातील चुका असतील तर अवश्य कळवा.