Tuesday, April 21, 2009

दर्द से मेरा दामन भर दे...

रसिकतेचं आणि वेदनेचं नातं बरंच जवळचं आहे. जर वेदना नसेल तर जगणं फारच गुळचट/ स्वप्नाळू होउन जाईल. त्यामुळे केवळ आनंदासाठी कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं माझ्य़ा रसिकतेच्या भूमिकेत बसत नाही. त्यामुळे एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट गंभीर आहे किंवा शोकांत आहे म्हणून न बघणं मला पटत नाही. कलेची परिपूर्ण व्याख्य़ा करण्याएवढा अजून विचार झालेला नाही पण जी मला जगण्याच्या जास्त जवळ घेउन जाते, जो प्रत्येक अनुभव मला घेणं शक्य नाही तो अनुभव एका रुपात माझ्यापुढे मांडते ती कला असं मला वाटतं. यात रंजनाचा भाग आहे पण केवळ रंजन नाही.

मागे एकदा अभय बंग यांनी एका भाषणात फार सुंदर मुद्दा मांडला होता. आपण गरीबांच्या/पीडीतांच्या/वंचिताच्या/ निसर्गाच्या दु:खाशी का जोडून घ्यावं याचं उत्तर देताना ते म्हणाले की बाबा आमटे यांच्या आनंदवनात कुष्ठरोग झालेला एक मुलगा होता जो वेदनेसाठी देवाकडे प्रार्थना करायचा. जर वेदना झाली तर हातपाय जिवंत आहेत जर वेदना झाली नाही तर कुष्ठरोग आपलं जाळं पसरवतोय आणि आपण मृत्यूच्या जास्त जवळ जातोय. त्याचप्रमाणे समाजातील गरीबांच्या किंवा पीडीतांच्या दु:खाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच कोषात राहिलो तर आपल्याला मनाचा कुष्ठरोग व्हायला वेळ लागणार नाही. मग उरेल एक संवेदनाहीन मन जे कुठल्याच भावनांना अनुभवू शकणार नाही.

मला हा वेदनेचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे पटला. मी माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रीण आठवून पाहिले आणि मला जाणवलं की ज्या- ज्यावेळेस आमच्या दोघापैकी कुणीतरी एकजण दु:खात होतं त्यावेळेस त्याला/तिला दुसऱ्याने आधार दिला किंवा दु:ख समजावून घेतलं. त्या दु:खाच्या bond मुळेच मैत्री जास्त घट्ट होऊ शकली. केवळ मौजमजेवर आधारीत मैत्री फार जवळीक साधू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत दोन-तीन-चार वर्ष घालवलीत, फक्त मौजमजा केली ते मित्र/मैत्रिणी तेवढी वर्षं संपली की लगेच किंवा काही काळानंतर माझ्या भावविश्वातून दूर होत गेले.

काही दिवसांपुर्वी निर्माण शिबिरात एका सत्राची सुरूवात प्रियदर्शनने लताच्या ’दर्द से मेरा दामन भर दे’ या गाण्याने केली. त्यावेळेस हे गाणं आणि त्याचे शब्द खूपच आवडले. माझा हा लेख या गाण्यापासूनच सुचला. ’दर्द से मेरा दामन’ इथे ऐकता येईल. त्याचे शब्द इथे हिंग्लीश मधे आणि इथे हिंदी मध्ये वाचता येतील.

Friday, April 10, 2009

अर्थ

कवितेचा अर्थ लागणं ही एक शब्दांत सांगायला अवघड अशी प्रक्रिया आहे. त्यामुळेच एका व्यक्तीला लागलेला एखाद्या कवितेचा अर्थे दुसऱ्या व्यक्तीला जसाच्या तसा समजावून देणं नुसतं अवघड नाही तर काही कवितांच्या बाबतीत अशक्य आहे. जो अर्थ मला कळालाय असं वाटतं पण शब्दांत मांडता येत नाही तो दुसऱ्याला कसा काय समजावून सांगणार? तरीही कविता समजण्यासाठी रसग्रहण हा एक चांगला मार्ग आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ सांगणं नाही तर कवितेची सौंदर्यस्थळं दाखवून देणं. रसग्रहणाबद्द्ल पुन्हा केव्हातरी.

कवी अनिलांची कविता "अर्थ" वाचण्यात आली, जी वाचल्यावर वाटलं की मला कवितेचा अर्थ लागण्याची प्रक्रिया या कवितेतील प्रक्रियेशी बरीच मिळतीजुळती आहे. कविता भावली तर त्यातील शब्द बाजूला पडून त्या कवितेतील भावनांचा परिणाम राहतो. त्यामुळे एखाद्या कवितेपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया निरनिराळे विचार करत पुन्हा एकदा त्या कवितेपाशी येते आणि कवितेतील एखादी प्रतिमा किंवा कल्पना समजली नसेल तरी कवितेचा पूर्ण अर्थ लागल्याचा अनुभव येतो. अनिलांची कविता -

अर्थ
कुणाच्या कवितेत असलेल्या शब्दव्यूहांत
अर्थ शोधीत बसत नाही
वाहावल्या त्याच्या भावप्रवाहात वाहत जातो
बुडी घेऊन पाहतो ठाव कुठे लागतो
चाचपडत बुद्धीचे हात
तळचा गाळ उपसतात
त्यांना काही मिळत नाही
अटकतात चरण मात्र अंत:करणाचे असावधान
जीवनवेलीच्या तंतूने गुंफिल्या
बारीक मुळ्यांच्या कोवळ्य़ा गुंतागुंतीत
सुटतां सुटत नाहीत पाय फसत जातात
आत-बाहेर भिजून होऊन ओलाचिंब पुन्हा येता थडीवर
काही जरी सापडले नाही तरी
सार्थक होते!

- अनिल

Wednesday, April 8, 2009

माण्साने - अनावश्यक लेख

खरंतर हा लेख लिहायची गरज नसावी असं माझं मत होतं. त्यामुळेच माण्साने या कवितेला मी काहीही आगापीछा न लिहीता फक्त कविता टाकली होती. पण कौस्तुभशी बोलताना माझा हेतू तेवढासा सफल झालेला नाही आहे हे लक्षात आलं. लेख लिहायला कारणीभूत अजून एक गोष्ट म्हणता येईल. कुठलाही लेख लिहीला की ब्लॉग कमेंटस, काही इ-मेल आणि/किंवा काही प्रत्यक्ष भेटीतले उल्लेख त्या लेखाची पोच देत असतात. ’माण्साने’ या पोस्टच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. असं का व्हावं?

असं ध्यानात आलं की त्यातील कल्पना मध्यमवर्गी पांढरपेशाला रुचणाऱ्या नाहीयेत. त्या प्रतिमा/कल्पना धुवट या गटात मोडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळे (फक्त) संदीप खरे टाईप लोकांना तर त्या पचणं जरा अवघडच आहे. मी स्वत: कवितेचा बऱ्यापैकी रसिक आहे. कविता ही भावनांचं expression आहे असं माझं मत आहे. त्या भावना अनुभवजन्य असतील व अनुभव प्रामाणिक असतील तरच ती कविता कुठेतरी मनास भिडते असं माझं मत आहे. त्यामुळे पाडगावकरांच्या ’प्रेम म्हणजे प्रेम..’ आणि ’सलाम’ ही कविता दोन्ही मला सारख्याच आवडतात. विंदाची ’साठीचा गझल’ आणि ’रक्तसमाधी’ मला सारख्याच आवडतात. अशी अगणित कवितांची यादी येथे देऊ शकेल. सांगण्याचा मुद्दा हा की फक्त विद्रोही कविताच उत्कृष्ट आणि बाकीच्या त्या कचकड्या असं माझं मुळीच मत नाही. कवितेत (पुरेसा) अनुभव नसेल तर किंवा अनुभवांना प्रामाणिकपणा नसेल तर कवितेत दंभ येतो. संदीप खरे टाईप कवी याचं उत्तम उदाहरण आहे.

आता थोडंसं ’माण्साने’ विषयी -
नामदेव ढसाळांबद्दल मला फारशी माहिती नाही. ही कविता त्यांच्या सुरूवातीच्या कवितांपैकी आहे. सुरूवातीच्या कवितांनंतर ढसाळांच्या कवितेचाही साचा बनत गेला असं माझ्या एका ज्येष्ठ मित्राचं आणि परिचयातल्या एका ज्येष्ठ लेखकाचं मत आहे. मला जे काही सांगायचंय ते फक्त प्रस्तुत कवितेबद्दल आहे.

ज्या माणसाला जन्म झाल्यापासून कायम अन्यायच झालेला आहे, त्या माणसाकडून शुद्ध भाषेची, धुवट पाढरपेशेपणाची अपेक्षा करणं हे नुसतं चूक नाही तर तो त्यावर अजून एक अन्याय आहे. माण्साने ही कविता अशा एका माणसाची प्रस्थापित व्यवस्थेबद्दलची चीड आपल्यासमोर मांडते. हा माणूस झालेल्या अन्यायाच्या संतापाने थरथर कापतोय आणि ही कविता लिहीतोय असं वाटतं. त्यामुळेच कधीकधी दोन वेगळ्या व्यक्तींना एकाच पारड्यात बसवलेलं आढळेल. अन्यायाची वेगवेगळी (आणि किंचीत परस्परांशी संबंध नसलेली) रूपं एकानंतर एक मांडलेली आढळतील. आता त्या कवितेतील प्रतिमा किंवा वर्णन केलेली अन्यायाची रूपं जरा भडक वाटली तरी नीट विचार केला तर जाणवेल की सध्याच्या अन्यायाचं स्वरूप तेच आहे फक्त ढसाळांनी ते वेगळ्या स्वरूपात आणि शब्दांत मांडलं. बरं, ढसाळांना नुसतीच प्रस्थापित व्यवस्थेला शिव्या द्यायच्यात असं नाही हे त्यांनी शेवटच्या कडव्यात दाखवून दिलंय. ’सर्वे सन्तु निरामय:’ या श्लोकातील किंवा पसायदानातील भावनेशी नातं सांगणारं शेवटचं कडवं आहे.

ही कविता मी सांगितलेल्या दोन्ही निकषांवर उतरते आणि म्हणून ती मला सुंदर वाटते आणि आवडते. ज्यांना संदीप खरे आवडतो पण अशा कवितांकडे बघायला नको वाटतं त्यांनी आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांचा पुन्हा एकदा विचार करावा. मी आधी post केलेल्या कवितेवर काहीच प्रतिक्रिया (online/offline/प्रत्यक्ष) मिळाल्या नाहीत म्हणून हा लेख लिहीला.