बखर बिम्मची - जी. ए. कुलकर्णी
वनवास - प्रकाश नारायण संत
शाळा - मिलींद बोकील
यातल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल वेगळा लेख होऊ शकतो. त्यातील शाळा बर्याच जणांनी वाचलेलं असेल. वनवास वाचणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा थोडी कमी भरेल आणि (माझ्या माहितीप्रमाणे) बखर बिम्मची फारशा लोकांनी वाचलं नसेल. मी वनवास वाचून संपवलं आणि या तीन पुस्तकांना बांधणारा समान दुवा लक्षात आला. तीनही पुस्तके अतिशय सुंदर असून एकदा हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाहीत. या तीन पुस्तकातील समान गोष्टींआधी (ज्यांनी वाचली नसतील) त्यांच्यासाठी थोडासा पुस्तक परीचय. हा परिचय अतिशय लहान असल्यामुळे पुस्तकाची अनेक वैशिष्ठे त्यात जाणवणार नाहीत त्यामुळे या परिचयावरून पुस्तकाविषयी ग्रह करुन घेऊ नये.
बखर बिम्मची : बिम्म हा ३-४ वर्षांचा मुलगा आहे. अजुन शाळेत जायला सुरूवात झाली नाही. बब्बी (मोठी बहीण) शाळेत जाते म्हणून ती बिम्मसमोर थोडा शिष्टपणा दाखवते. बिम्मचे बाबा बाहेरगावी नोकरीला आहेत. त्यामुळे बब्बीसोबत खेळणं (किंवा भांडणं), तिच्यासोबत बरोबरी करणं आणि आईला आपल्या खोड्यांनी वैतागून सोडणं हा बिम्मचा प्रमुख दिनक्रम. यातील बहुतेक खोड्या या खोड्या नसून बिम्मच्या बालबुद्धीला पडणारे निरागस प्रश्न आहेत आणि आईलाही ते जाणवतं. त्या (बहुतांशी) निरागस खोड्या आपल्याला बिम्मच्या जास्तच जवळ आणतात. बिम्म मधील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या लहानपणीच्या मनात असलेल्या fantasy ची आठवण करुन देते. हळूहळू आपण पण बिम्मच्या विश्वात प्रवेश करतो. जीए आपल्या असाधारण कथांसाठी प्रसिद्ध आहेत. एवढ्या complex कथा लिहीणारे जीए बिम्म सारखं हळूवार लिहू शकतात हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.
जर मी बिम्म कोणाला वाचायला दिलं आणि त्यानं भारावून जाउन बखर बिम्मची बद्दल बोलला नाही तर मला जाणवतं की त्या व्यक्तीची व माझी wavelength थोडीशी वेगळी आहे. त्यातल्या त्यात ज्यांचं बालपण निमशहरी भागात गेलेलं आहे अशांना तर बखर बिम्मची अगदी nostalgic बनवतं. लहानपणी आपल्याला काही प्रश्न पडतात, व त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपण काही fantasies चा विचार करतो. मोठं झाल्यावर अर्थातच त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात पण त्यातील सौंदर्य हरवतं. जी. ए. बिम्मच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा हरवलेल्या fantasies मिळवून देतात.
वनवास : लंपन नावाच्या एका मुलावरचं पुस्तक. लंपन साधारण ११-१२ वयाचा आहे. प्रकाश नारायण संतांनी लंपनच्या भावविश्वावर चार पुस्तकं लिहीली आहेत. त्यातलं हे पहिलं. बाकीची तीनही वाचायची आहेत. तर लंपन हा आपल्या आजी-आजोबांकडे राहात आहे. बिम्मप्रमाणे लंपनलाही काही भन्नाट प्रश्न पडतात पण fantasies ऐवजी तो प्रश्नांची उत्तरं शोधायला आजूबाजूच्या लोकांची (आजी, आजोबा, सुमी नावाची मैत्रीण, इ.) मदत घेतो किंवा स्वतःचं काहीतरी भन्नाट logic लावतो. मुलींविषयी वाटणारं आकर्षण प्रकाश नारायण संतांनी सुमीसोबतच्या प्रसंगांच्या माध्यमातून फारच सुंदर रितीनं व्यक्त केलंय.
शाळा : मिलींद बोकीलांची ही कादंबरी एका नववीतल्या मुलाचं (मुकुंद) भावचित्रण आहे. लंपन आणि बिम्म हे आपल्यापुढे कथास्वरूपात उलगडत जातात तर शाळाचा form कादंबरीचा आहे. त्याचा plot आहे तो शाळेत आणि शाळेच्या भोवती घडणार्या घटनांचा. सुरूवात होते ते मुकुंदचं नववीचं वर्ष सुरू होण्यापासून. स्वतःची वेगळी ओळख (distinct identity) निर्माण होण्याच्या हा काळ. या कादंबरीतील गाव आणि काळ दुर्लक्षित करुन प्रत्येक मुलाचा या काळातील भावनांचा व घटनांचा आलेख बघितला तर मला वाटतं त्यांचा मसावि (महत्तम सामायिक विभाजक) शाळा मधे सापडेल (ही बाब ७०-८०% मुलांसाठी खरी ठरेल. उरलेले त्यांच्या respective वयात अतिसज्जन किंवा अतिवाह्यात या category मधे मोडतील).
ही तीनही पुस्तकं आपल्याला त्या-त्या वयातल्या भावविश्वाची सफर घडवून आणतात. ही पुस्तकं साधी असली तरी अशी पुस्तकं लिहीणं सोपं निश्चीतच नाही. ललित साहित्य हे अनुभवांवर आधारलेलं साहित्य आहे. या वयांतील भावना कुणाच्या उसन्या घेऊन या पुस्तकांसारखं ललित साहित्य लिहीणं अशक्य आहे. अशी पुस्तकं लिहीण्यासाठी त्या वयातील भावनांचा एक कोपरा मनात कायम असायला लागतो. कितीही मोठं झालं तरी तो कोपरा विसरून चालत नाही.वरवर जरी सोपी कथा / कादंबरी वाटली तरी केवळ अत्युच्च प्रतिभेचे लेखकच असं लिहू शकतात आणि त्या लिखाणासाठी तेवढ्याच अभ्यासाची जोड असावी लागते. बिम्म आणि शाळा एकापेक्षा जास्त वेळेस वाचलेलं आहे. पहिल्या वेळेस वाचताना त्यातील कथा आवडली व नंतरच्या वाचनात त्यातील साहित्यीक पैलू समोर येत गेले.
लंपनचं सुमीबद्दच्या वागणं किंवा मुकुंदच्या शिरोडकर नावाच्या मुलीबद्दलच्या भावना या त्या वयातील लैंगितकेचा एक सुंदर पैलु आपल्यापुढे मांडतात - ज्याविषयी मराठी साहित्यात जास्त लिहीलं किंवा बोललं गेलेलं नाही. विशेषतः शाळा या बाबतीत जास्त सरस आहे. माझ्या मते लंपन हा थोडा मोठेपणीचा बिम्म आहे आणि मुकुंद हा थोडा आणखी मोठा झाल्यानंतरचा शहरी (मुंबईकर) लंपन आहे. अजून थोडासा विचार केला तर असं वाटलं की ही पुस्तकं फक्त nostalgic बनवत नाहीत तर आपल्याला त्या-त्या वयातील मुलांची भावावस्था समजावून सांगतात. त्यामुळे ज्यांनी ही पुस्तकं ज्यांनी वाचलीत ते लोक आपल्या मुला-मुलींना जास्त चांगलं समजावून घेऊ शकतील - विशेषतः teenage मुलांच्या लैंगिक भावना - ज्याबद्दल आजही जास्त मोकळेपणाने बोललं जात नाही.
अजून एक - जिथे आजूबाजूला सगळीकडूनच भडकतेचा मारा चालू आहे - मग ते साहित्य असो की अजून काही, यातील हळूवार भावना कुठेतरी आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवतात असं मला वाटतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
Mala Bimm "Aai bimmla laadu det aahe" ase chitr kadhato ani aaila te samajavun sangato te far aavadale hote te pustak vachatana.
आज खूप दिवसांनंतर निवांत वाचायला वेळ मिळाला.
वेगळ्या विषयांवर लिहितो आहेस, वेगळं लिहितो आहेस.
छान. :)
आणि एक ऍडिशन: देनिसच्या गोष्टी: व्हिक्तर द्रागून्स्की, अनुवाद: अनिल हवालदार
'बखर बिम्मची'बद्दल ऐकलं नव्हतं कधी. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशक कोण?
@Abd, I guess Parchure or Popular. Don't remember exactly. But can be easily available in most of the book stores in pune (e.g. Sadhana, Pathfinder)
@meghana, i read 'Denischya goshti' few days back. Indeed it is a nice book, though i couldn't feel connected to it ( as I could feel with all of the three).
Post a Comment