Wednesday, December 17, 2008

तुकाराम

सध्या तुकाराम वाचतोय. मी नास्तिकतेकडे वाटचाल करणारा माणूस आहे याचा मागे उल्लेख केलेला आहे. तरीही संतवाङ्मय हा माझ्या interest चा विषय आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं आणि धार्मिक (किंवा आस्तिक) असणं यांचा काहीही संबंध नाही हे बर्‍याच मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे आणि ते मी स्वतः पण अनुभवतो. त्यामुळे मी कुठलीही धार्मिक श्रद्धा न बाळगता संत साहित्य वाचतो व ते enjoy पण करू शकतो. संतांच्या उत्कट आणि आत्यंतिक प्रामाणिक भावना, त्यांची समाजसुधारणेची तळमळ, सरस काव्य या गोष्टींमुळे संतसाहित्याबद्दलची भीती (भाषेची आणि उपदेश ऐकण्याची) कमी झाली आणि ते साहित्य वाचायची आवड निर्माण झाली.

समग्र ग्रंथांमध्ये (स्फुट अभंग किंवा अभंगाचे निरूपण सोडून) याआधी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला होता पण ज्ञानेश्वरी झेपली नाही. आपली अजून ज्ञानेश्वरी वाचायची maturity आलेली नाही हे जाणवलं आणि ज्ञानेश्वरी काही काळासाठी बाजूला ठेवलीये. माझ्या एका ज्येष्ठ मित्राने मला तुकाराम वाच असं recommend केलं. म्हणून तुकाराम गाथा (निवडक अभंगांची - अर्थाशिवाय सं. भालचंद्र नेमाडे, प्र. साहित्य अकादमी ) घेतली, वाचायला सुरूवात केली आणि बाकीच्या संतांपेक्षा तुकारामाच्य कवितेतलं वेगळेपण लक्षात आलं ( असं प्रत्येकसंतकवीचं काहीतरी वैशिष्ठ्य असेलच ) आणि तुकारामाचा कवी किंवा बंडखोर म्हणून मोठेपणा जाणवायला सुरूवात झाली. अर्थाशिवायची गाथा वाचतोय त्यामुळे त्यातील अभंगाचा अर्थ लावण्यात आणि तो समजण्यात मजा येते.

ज्ञानेश्वरी वाचताना कायम आपण तत्त्वज्ञान वाचत आहोत हे जाणवत राहतं. तुकाराम वाचताना सोप्या भाषेमुळे (काळाचा फरक?), त्यातील प्रामाणिक अनुभवकथनामुळे अभंगातील तत्वज्ञानाचं ओझं जाणवत नाही. त्यामुळे तुकारामाचे अभंग समजायला सोपे व अर्थवाही झाले आहेत. वाचताना लक्षात येतंय की मराठीतील अनेक म्हणी, अनेक वाक्यप्रचार, अभंगातल्या स्फुट ओव्या ज्या सुविचार म्हणून वापरल्या जातात हे सर्व तुकारामाची मराठी भाषेला अतिशय मोलाची देणगी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर - बोलाचीच कढी बोलाचाच भात, गाजराची पुंगी (पूर्ण म्हण नाही तर फक्त concept), कानडीने केला मराठी भ्रतार, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, इत्यादी. मला वाटतं (की कुठं वाचलेलं आहे कुणास ठाऊक) - "सत्य असत्यासी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता|| " हा तुकारामाच्या कवितेचा पर्यायाने अनुभवांचा पाया आहे आणि त्यातूनच तुकारामाची बंडखोरी प्रवृत्ती दिसून येते.

तुकारामाच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्या कवितेतून आपल्याला तुकारामाचा अध्यात्मिक (धार्मिक नाही) प्रवास दिसतो. सुरूवातीला संसाराच्या ओझ्याने वाकलेला व यातून मला सोडव अशी विनवणी करणारा, या दु:खामुळे विरक्ती आलेला, विरक्तीतून भक्तीकडे वाटचाल करत असलेला आणि भक्तीतून आत्मज्ञानाकडे पोचलेला तुकाराम आपल्याला दिसतो. त्यामुळे त्याचं लोकोत्तरपण तर दिसतंच पण तो प्रवास सामान्यत्वातून असामान्यत्वाकडे होणारा असल्यामुळे जास्त सुंदर वाटतो. त्यामुळे सुरुवातीला बायकापोरे शिव्या देतात, देणेकरी दारात ठाण मांडून बसले आहेत अशी वर्णनं करणारा तुकाराम "आपुले मरण पाहिले म्या डोळा", "याचसाठी केला होता अट्टहास" किंवा "तुका आकाशाएवढा" अशा रचना करतो त्यावेळेस त्या प्रवासाने मी आश्चर्यचकित होतो. व हे आश्चर्य मला त्या प्रवासाबद्दल आणखी विचार करायला भाग पाडतं.

हे वाचताना जाणवलेली अजून एक गोष्ट - आपल्याकडील संताना देवपण देण्याची वृत्ती व चमत्कार व दंतकथांमधेच रमून जायची वृत्ती. तुकाराम हा समाजसुधारक आहे याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे व तुकारामाला फक्त एका भक्ताचं रूप देणे. जो तुकाराम भक्तीचे एवढे सुंदर अभंग लिहीतो तोच तुकाराम "माझे लेखी देव मेला | असो त्याला असेल|| " किंवा "आहे ऐसा देव वदवावी वाणी| नाही ऐसे मनी अनुभवावा||" हे लिहीतो हे आपण सोयीस्करपणे विसरुन जातो. तुकारामाचे अभंग इंद्रायणीतून वर येतात ही घटना किंवा तुकाराम सदेह वैकुंठाला जातो ही घटना मला एकतर रुपक वाटतात किंवा थोतांड वाटतात. पण जरा आजूबाजूला पाहिलं तर याच घटनेला जास्त महत्त्व दिलं जातंय असं दिसतं.

मागील काही articles मधे पण मला न झेपणार्‍या गोष्टींबद्दल मी लिहीतोय याची मला जाणीव आहे पण एखादी गोष्ट वाचल्यानंतर/ अनुभवल्यानंतर त्याबद्दलचे विचार मी लिहीत आलेलो आहे. वास्तविक तुकाराम ही काय माझ्यासारख्या माणसाने लिहायची गोष्ट आहे? जिथे म वा धोंड, नेमाडे, चित्रे यासारख्या लोकांनी लिहून ठेवलंय तिथे मी त्याबद्दल लिहीणं म्हणजे खरंतर न झेपणारी गोष्ट आहे. कदाचित इथून पुढेही अशाच एखाद्या /अनेक अशा गोष्टींवर लिहील. त्यावेळेस पुनुरुक्ती नको म्हणून हा परिछेद लिहीला.

4 comments:

Kaustubh said...

काय बोलू? नेहमीसारखंच वेगळं आणि छान. :)

a Sane man said...

खूप संयत लिखाण आहे हे. पात्रतेचा प्रश्न ब्लॉगवर तरी अलाहिदा. लिहित रहा, वाचायला आवडतं.

Meghana Bhuskute said...

सेन आहेच का इथे माझ्याआधी येऊन गेलेला?!
असो, फार सुरेख आहे लिखाण. अजून लिहा ना या विषयावर.

Sameer Samant said...

छानच लेख....आजच वाचला ..आवडला .. फक्त "माझे लेखी देव मेला" इ. अभंगांचा संदर्भ वेगळा आहे असे वाटते. देवावरील अविश्वासापेक्षा ते देवाशी लटके भांडण असावे. . .
पुढील link पहावी:
http://www.prahaar.in/madhyantar/faith/20250.html

बाकी छानच... असेच लिहीत राहा ...