Wednesday, February 4, 2009

आमीर खाँ साहेब

काही दिवसापूर्वी लिहीलं होतं. त्यावेळेस publish करावंसं वाटलं नाही. आत्ता वाचून बघितलं तर माझं मलाच ठीक वाटलं.
============================================================

अचानक ठरवता केलेल्या गोष्टींची मजा plan करून केलेल्या गोष्टींना येत नाही. खरेतर आज office मधे प्रचंड काम आहे. रात्रीचे ११ वाजलेत. उद्या गावाला जायचंय त्यामुळे काम करणे आवश्यक आहे पण गाणे कवितांचा असा काही मस्त मूड लागलाय! आमीर खाँसाहेबांचा अतिशय सुंदर यमन ऐकतोय त्यामुळे काहीतरी लिहावं अशी इच्छा झाली.

मला आमीर खाँचा यमन मी सगळ्यात पहिल्यांदा ऐकला. साधारणतः - वर्षांपूर्वी. त्याआधी फक्त "मधुबन मे राधिका नाचे रे" या रफीच्या गाण्यातील शेवटच्या ताना आमीर खाँनी गायल्यात एवढंच माहीत होतं. त्या ताना ऐकून छान तर वाटायचं पण आमीर खाँच्या गायकीच्या उंचीचा अंदाज आला नाही. सुरुवातीला त्यांचे - राग प्रचंड आवडले. मग तेच राग पुन्हापुन्हा ऐकत गेलो. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी सापडत गेलं - अजूनही सापडतं. PG करताना बरंच गाणं (recorded स्वरूपातलं) ऐकलं आणि आमीर खाँच्या उंचीचा अंदाज येत गेला.

काही लोक प्रसिद्धिसाठी गातात, काही लोक त्यांचं/त्यांच्या घराण्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी गातात, काही लोकांना खूष करण्यासाठी गातात. पण काही लोक गाण्याच्या रूपातून आत्मतत्वाचा शोध घेत असतात. मला आमीर खाँ या category मधले गायक वाटतात. खरंतर शास्त्रीय संगीतात बुद्धिमान गायकांची कमी नाही. dedicated गायकांची पण कमी नाही. मग आमीर खाँचं वेगळेपण कोणतं? शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत मला नाही सांगता येणार. पण मला जाणवणारं वेगळेपण नक्कीच सांगू शकतो.

आमीर खाँ संगीत गात नसावेत, तर ते संगीत जगत असावेत. कारण त्यांचं कुठलंही recording घेतलं तरी आमीर खाँ एक अगदी नवीन विचार मांडत आहेत असं वाटत नाही, किंवा चमत्कृतीपूर्ण मांडणी करत नाहीत. आपल्याला जाणवणाराच विचार ते सांगताहेत असं वाटतं. एखाद्या व्यक्तीने स्वतः जगत नसलेला विचार मांडायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला काय सांगायचंय ते कळतं पण ते सांगणं/ तो विचार आतपर्यंत झिरपत नाही. आमीरखाँ साहेबांचं गाणं आतमध्ये झिरपतं त्यामुळे त्यांचं केवळ गाणं ऐकून, त्यांना प्रत्यक्ष भेटताही त्यांच्या lifestyle चा, personality चा मला अंदाज येतो. वागण्या-बोलण्यात कुठलाही डौल नाही, अतिशय साधं वागणं/बोलणं . गाणं हा विषय सोडून दुसर्या विषयांबाबत विरक्ती म्हणता येईल एवढा अलिप्तपणा. कायम गाण्याचं चिंतन मनात. हे चिंतन काय असेल याचा मात्र थांग लागत नाही.

त्यांचं सगळं व्यक्तिमत्व त्यांनी गायलेल्या मारवा रागातून व्यक्त होतंय. धीरगंभीरपणा - आव आणलेला नव्हे तर जीवनाचं सार पचवून पण त्याचं जडत्व आलेला. मी हा मारवा enjoy करत ऐकू शकत नाही. तो मला अस्वस्थ करतो तरीही ऐकावासा वाटतो. आपल्याला न उलगडणारी कोडी हा माणूस उलगडून सांगतोय असं वाटत राहतं, ती भाषा तर कळत नाही, पण या माणसाची प्रामाणिकपणा आणि अधिकार आत भिडतो आणि मी पुन्हा एकदा खोलवर विचार करू लागतो.

No comments: