Monday, February 23, 2009

काही योगायोग

एकदा किशोरींची मैफल ऐकून बाहेर येत होतो. फक्त मल्हार रागांवर आधारित मैफिल होती. किशोरीताईंनी ३-४ मल्हार गायले व शेवटी त्यांनी अडाणा मल्हार गायला. तो राग आणि बाकीचे मल्हार ऐकल्यावर असं जाणवलं की ज्या रागात गंधार (ग) स्वर महत्त्वाचा आहे किंवा ग स्वरावर विशेष focus आहे त्या रागांचं मल्हार रागावर चांगलं कलम होऊ शकतं. उदाहरणार्थ - दरबारी कानडा + मल्हार -> मियां मल्हार, अडाणा + मल्हार -> अडाणा मल्हार (दोन्ही रागांत ग वर आंदोलन आहे). मी ’ग’ स्वरावर विशेष focus असणारे बाकीचे राग आठवले. डोळ्यापुढे झिंझोटी, जयजयवंती हे राग आले. जयजयवंती आणि मल्हार यांचा मिश्र राग कसा असेल याचा विचार करू लागलो. डोक्यात रागस्वरूपावर विचार चालू होता. धडपडत का होईना डोळ्यापुढे रागस्वरूप उभं राहात होतं. घरी आलो, जयजयवंती व मल्हारावर आणखी माहिती मिळवावी म्हणून इंटरनेटवर गुगललं तर जयजयवंती आणि मल्हार यांचं मिश्रण असलेला जयंत मल्हार असा राग आधीच अस्तित्वात आहे हे कळालं. पं. बस्वराज राजगुरूंची या रागामधली recording मिळाली. त्याच्याशी मी विचार केलेलं रागस्वरूप त्याच्याशी बरंच जुळत होतं. माझे विचार कुठल्यातरी संगीतकाराशी थोडेसे का असेना जुळतात हे बघून छान वाटलं.

असाच आणखी एक योगायोग.
लॅबमधून रुमवर जाताना मी नेहमीच डोक्यात कुठलातरी राग घोळवत जायचो. त्यादिवशी नंद राग (मनातल्या मनात) गात चाललो होतो. नंद हा तीन रागांचं थोडंसं अवघड असं मिश्रण आहे - यमन, बिहाग आणि हमीर (हे राजन पर्रीकरांच्या site वरून स्पष्ट झालं), थोडाही तोल ढळला की नंद पार बिघडतो. 'ढूंढू बर सैंया' ही नंद रागातली प्रसिद्ध विलंबित बंदिश. यातील "बर सैं" या ठिकाणी आपल्याला बिहाग जाणवतो (सा-ग या आलापामधून). मी गात असताना मात्र एकदोनदा सा-ग ऐवजी चुकून सा-म असं गायलो आणि केदार रागाचा आभास निर्माण झाला. मला ते छान वाटलं. नंतर गाताना पण कधीकधी सा-म असं गायची इच्छा व्हायची. असं वाटलं की नंद आणि केदार यांचं मिश्रण करुन नवीन रागस्वरूप करता येईल का? थोडासा प्रयत्न केला पण नंद हा बऱ्यापैकी अवघड राग असल्याने नंद आणि केदार यांचं मिश्र स्वरूप खूप स्पष्टपणे दिसलं नाही. बऱ्याच दिवसांनी कुमारांच्या खूप साऱ्या खाजगी रेकॉर्डिंग मिळाल्या त्यात केदार नंद असा राग होता जो नंद आणि केदार रागाचा मिश्र राग आहे. पुन्हा एकदा छान वाटलं.

अजुन असे १-२ योगायोग आहेत. ते पुन्हा कधीतरी.

3 comments:

Raj said...

भारतीय शास्त्रीय संगीत ऐकताना माझी अवस्था एखाद्या वाचता न येणार्‍या मुलासारखी होते. गोष्टीच्या पुस्तकातली चित्रे खूप आवडतात. चित्रांपलिकडेही काहीतरी आहे याची जाणीव होते पण त्याचा आनंद घेता येत नाही. ज्यांना घेता येतो त्यांना मी भाग्यवान समजतो.

साधक said...

अप्रतिम. एवढं छान विश्लेषण करता येतं तुम्हाला म्हणजे अभ्यास चांगला आहे तुमचा. सुरांचे ज्ञान होवून मीही असा तुमच्यासारखा कधी रममाण होईल याची वाट पाहतोय.

Dhananjay said...

धन्यवाद! मीही जाणूनबुजून रागदारी किंवा तत्सम गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आपोआपच त्यात रस निर्माण होत गेला व अभ्यास होत जात आहे. संगीताची आवड आणि रस महत्वाचा. बाकी तांत्रिक गोष्टी दुय्यम.