Tuesday, April 6, 2010

बस नाम ही काफी है!

बेगम अख्तर ..
माझ्या पिढीत बेगम अख्तर ऐकणारे अणि त्यांचे रसिक असणारे फार लोक नाहीत. अख्तरीबाई हे एक व्यसन आहे. बोरकरांची एक कविता आहे - दंश या नावाची. त्या कवितेची सुरुवात आहे -
डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी कावीळ
डोळ्यामधील काजळ देखील झाले गं घननीळ
असं सगळं निळं निळं झाल्याची अवस्था बोरकर त्यात सांगतात. अशी काहीतरी अवस्था ज्यांना अख्तरीबाईंच्या सुराचा दंश झाला आहे त्यांची होते.

माझ्या आवडत्या माणसांची पहिली भेट कशी आणि कधी झाली हे माझ्या बऱ्यापैकी लक्षात असतं. अख्तरीबाईंच्या सुराची पहिली भेटही लक्षात आहे. त्यांची पहिली ऐकलेली ठुमरी होती - बालमवा तुम क्या जानो प्रीत. पहिल्यांदाच ऐकतानाही त्या सुराची आर्तता मनाला भिडली. नंतर हळूहळू त्यांचं गाणं ऐकत गेलो आणि बहुतांश गाणी पहिल्यांदा ऐकली की एक खजिना सापडल्याचा आनंद व्हायचा; अजूनही होतो. All time favourites मध्ये अख्तरीबाई कधी समाविष्ट झाल्या ते कळलंसुद्धा नाही. अख्तरींचं गाणं हे रोज ऐकावं असं प्रकरण नाही. तो दंश व्हायला आणि पेलायला भावनांची intensity तेवढीच जास्त व्हावी लागते. पण ज्यावेळी अख्तरींच्या सुराची तहान लागते त्यावेळी दुसऱ्या कशानेही ती तहान भागत नाही.

साधारणत: अख्तरींचं गाणं हे दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागता येतं. एक त्यांची ठुमरी (किंवा दादरा, टप्पा, कजरी इ.) आणि दुसरी त्यांची गझल. त्यांची ठुमरी समजायला आणि आवडायला त्यामानाने सोपी आहे. थोडंफार ठुमरी गायन ऐकलं असेल तर अख्तरीबाईंची ठुमरी नक्कीच आनंद देईल. अगदीच नवखे असाल असाल तर मात्र अख्तरीबाईचं गाणं थोडंसं जड जाईल. ठुमरीपेक्षा त्यांची गझल appreciate करायला थोडी अवघड आहे. त्यांच्या गझला एकदम hardcore उर्दूमध्ये असतात, त्यामुळे उर्दू येत नसेल तर बऱ्याच वेळेस नेमका अर्थ लागत नाही, अंदाज बांधावा लागतो. पण अख्तरीबाईंच्या सुराची जादू अशी आहे की ते उर्दू शब्द कधीच टोचत नाहीत. ज्याप्रमाणे दिल से.. मधील चल छैय्या छैय्या हे गाणं अस्खलित उर्दू असूनही ते टोचत नाही अगदी त्याचप्रमाणे. उदाहरण द्यायचं झालं तर दिवाना बनाना है तो.. ही गझल किंवा तबियत इन दिनो... या गझलेचं देता येईल. एकदा या (आणि अशा) गझल सुरु झाल्या की सुरासोबत आपण नकळत वाहत जातो.

अख्तरीबाईंवर दोन तीन लेख वाचले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही माहित नाही आणि जाणून घ्यावंसं वाटलं नाही. फक्त त्यांच्या आवाजात जी आर्तता आणि जो दर्द आहे त्याच्यामागे वैयक्तिक दु:ख असेल का असे कधीतरी वाटले होते. गझलमधला दर्द किंवा ठुमरी मधला शृंगार, विरह अख्तरीबाई ज्या पद्धतीने सादर करतात त्या दर्जाचं गाणं खूपच कमी जणांचं आहे. या संदर्भात सुनिताबाईंनी त्यांच्या मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरच्या लेखात एक आठवण दिली आहे. त्यात मन्सूर असं म्हणतात की जर ५०-६० वर्षानंतर भारतीय संगीतातील कुठलं गाणं टिकून राहणार असेल तर ते बेगम अख्तर आणि बालगंधर्व यांचं असेल!

अख्तरीबाईंच्या गाण्यातील मला आवडलेल्या गोष्टी कुठल्या? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरांचा सच्चेपणा. असं सुरांचं सच्चेपण आणि नितळपण अख्तरीबाई सोडल्या तर मला ३-४ लोकांमध्येच दिसतं. वर उल्लेखल्याप्रमाणे गाण्यातील भाव दाखवण्याची क्षमता हा मला जाणवलेला दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी लिहून ठेवली आहे आणि अख्तरीबाईंच्या गाण्याच्या प्रत्येक रसिकाला ती माहित असेल. मज पामराचा पण तो weak point आहे त्यामुळे त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. गाणं गाताना मध्येच त्यांचा स्वर फाटतो किंवा थांबतो किंवा choke होतो. तशी ही गोष्ट निर्दोष गाण्याच्या दृष्टीने दुर्गुणच म्हटली पाहिजे पण त्यांच्या गाण्यात ती जागा अशी सुंदर वाटत राहते की बस. एकदा तशी जागा येऊन गेली की नकळत वाट बघत राहतो की पुन्हा ती जागा कधी येते आहे. ते स्वराचे choke होणं ऐकून जर तुमची heartbit miss होत नसेल तर आपली गाण्यातली wavelength जुळायला वेळ आहे असं मी म्हणेन.

अख्तरीबाईंच्या काही गाण्यावर वेगळे लेख लिहिता येतील एवढी ती गझल/ ठुमरी सुंदर आहेत. त्यांची बंगाली गाणी सुद्धा अशक्य सुंदर आहेत. तुम्हालाही अख्तरीबाईंच्या सुराचा दंश होवो अशी शुभेच्छा देऊन लेख संपवतो.

5 comments:

Anonymous said...

"ते स्वराचे choke होणं ऐकून जर तुमची heartbit miss होत नसेल तर आपली गाण्यातली wavelength जुळायला वेळ आहे असं मी म्हणेन."

अख्तरीबाईंचं गाणं ऐकलं तर नाहीये... पण वरच्या वाक्याचा मला जो अर्थ कळला तो जर खरा असेल तर मग आपले सूर नक्की जुळतील!

Naniwadekar said...

श्री वैद्‌य : बेगम अख्तरचं गाणं अगदी दोन मिनिटंही अ‍ैकवत नाही अ‍ितकं कंटाळवाणं वाटणार्‍या अनेकांपैकी मी एक आहे. याला अपवाद तिनी 'रोटी' चित्रपटात गायलेली ६ अप्रतिम गाणी. बाईची गायकी १९५० नन्तर बदलली (वा ज़ाणीवपूर्वक बदलवली) असा मी कुठे तरी उल्लेख वाचला आहे. आश्चर्य म्हणजे पुण्यातल्या एक खयालगायिका, ज्यांच्याकडून मी अख्तरीबाईंच्या स्तुतीची अपेक्षा केली नव्हती, एकदा बोलताना 'मी त्या बाईच्या प्रेमात पडले आहे' म्हणाल्या. त्यांनी एक बेगमची कॅसेट मला देअ‍ू केली होती; आता त्या प्रस्तावाचा मी स्वीकार करायला हवा होता असं उगीच वाटतं. तिची १९५० आधीची काही गाणी मला तिचा एक भक्त देणार होता, पण त्याचा आम्ही दोघांनीही पाठपुरावा केला नाही.

मल्लिकार्जुन मनसूर हे बाईंविषयी एरवी कधी काही बोलल्याचं ऐकलेलं नाही. ('मनसूर' नावाचं म्हणे कर्नाटकात बुवांचं गाव आहे.) तेव्हा एकदाच बुवांनी उल्लेख केला आणि तो ही इतका मनापासून, हे गणित मला सुटत नाही. पु लं चे बेगम अख्तर आणि लतावरचे लेख वाचताना या दोघींविषयी फार कमी माहिती असूनही त्यांनी ते लेख ठोकून दिले, असं मला वाटत रहातं. मात्र अख्तरीबाईविषयी मलाच काही माहिती नसल्यामुळे पु लं च्या त्याबद्‌दलच्या ज्ञान-अज्ञानाचा मी चांगला निवाडा करू शकत नाही. माधव मोहोळकरांचा 'गीतयात्री' पुस्तकातला अख्तरीबाईवरचा लेख मनापासून लिहिलेला आहे. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्यावरचे 'गुण गाईन आवडी' मधले लेखही असेच ठोकून दिलेले वाटतात. १९८४ कडे पु लं नी वसन्तरावांवर लिहिलेला स्मृतिलेख मला खूप आवडतो. (त्या लेखाच्या सुरवातीला 'अब्द अब्द मनी येते' हे मर्ढेकरांचे शब्द आहेत.) वामनराव देशपांडे यांनीही एका लेखात कुमारजींची भरमसाठ स्तुतीच केली, पण 'आधी नुसतीच स्तुती केली होती' ही कबुलीही 'कुमार गंधर्व - एक पुनर्विचार' या प्रदीर्घ लेखात दिली. हे दोन्ही लेख 'आलापिनी' या अत्यन्त वाचनीय पुस्तकात आहेत.

आवाज़ टिकवण्याची कला मानवाला जेमतेम शंभर वर्षांपासूनच माहीत झाल्यामुळे कुठला आवाज़ टिकेल अशी अपेक्षा होती आणि कुठला टिकला, या परस्परसंबंधाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. तो अज़ून १००-२०० वर्षांनी जास्त मनोरंजक विषय ठरावा. पण आज़ ना बालगंधर्व कोणी ऐकतं, ना बेगम अख्तर, ना लताची खरी चांगली गाणी. लताला तसे लोक विसरलेलेच आहेत आणि अज़ून ३०-४० वर्षांनी तर तिची आठवण फारच कमी लोक ठेवतील, असा अंदाज़ एकदा अलूरकरांनी गप्पा मारताना व्यक्त केला होता. मलाही तसंच वाटतं. मात्र एकीकडे पन्नासपेक्षा जास्त वयाच्या लोकांत लताचीच ज़ुनी गाणी जास्त खपतात असा व्यावसायिकांचा अनुभवही आहे. तेव्हा लताचं (किंवा बालगंधर्वांचं) गाणं चांगलं आहे, हे कारण ते गाणं त्याचा नवीन लोकांनी स्वीकार करून लोकप्रिय रहायला कदाचित पुरेसं ठरणार नाही. एरवीही मला स्वत:ला 'धर्मात्मा' सारख्या चित्रपटातली मोज़की गाणी सोडल्यास बालगंधर्वांचं गाणं खास आवडत नाही; तो काळ माझ्या लेखी दीनानाथांचा.

मन्सूरांच्या अख्तरीबाई बद्‌दलच्या उद्‌गारांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचं तसं काही कारण नाही. पण एरवी ते या बाईंविषयी कधीही काहीही न बोलता अल्लादिया खान, भास्करबुवा बखले, मंजी खान, भूर्जी खान यांच्याविषयीच का बोलत, हा प्रश्न मनात येतोच. ते स्वत: ख्यालगायक असल्यामुळे त्या गायकीबद्‌दलच त्यांना प्रश्न विचारल्या ज़ात, हे ही एक कारण असू शकेल.

Dhananjay said...

@alhadmahabal प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@nanivadekar प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
आपल्याला बेगम अख्तर आवडत नसूनही आपण एवढे प्रदीर्घ उत्तर लिहायचे कष्ट घेतलेत याबद्दल धन्यवाद. माझं विचाराल तर मी मला जे कलाकार आवडत नाहीत त्यांच्यावरचे लेख पूर्ण वाचले नसते आणि वाचले असते तरी दुर्लक्षून सोडून दिले असते (कलाकारांची नावंच हवी असतील तर उदाहरणार्थ पं. जसराज किंवा सलील कुलकर्णी). असो.
माझ्या लेखाचा मुद्दा अख्तरींच्या गाण्यात मला काय आवडतं आणि त्यामुळे अख्तरी मला का श्रेष्ठ वाटतात असा आहे. बाकीच्यांना अख्तरी श्रेष्ठ /कनिष्ठ कशाही वाटल्या तरी मला हरकत नाही. (हरकत घेणारा मी कोण?) त्यामुळे आपल्या अख्तरींबाबतच्या मताला माझी हरकत नाही.
सुनिताबाईंच्या लेखातील उल्लेख सहजच दिला होता, अख्तरी किती श्रेष्ठ आहेत यासाठी मन्सुरांची साक्ष काढण्यासाठी नाही. बरं त्यासाठी तुम्ही लताबाईना मध्ये आणून अलुरकरांचे जे मत दिलात तेही विरोधाभासीच नाही का? (म्हणजे मी मन्सुरांचा संदर्भ देत असेल तर तुम्ही अलुरकरांचा देताय! त्यातला कुठला जास्त वजनदार हे तुम्हीच ठरवा!)
आपल्याला हवं ते गाणं ऐकत राहूया. चांगलं वाटलं तर त्यावर लिहू किंवा इतरांना सांगू. नाही वाटला तर सोडून देऊ. (तपशीलातील चुका मात्र नक्की कळवायला हव्यात.) कसे?
आलापिनीच्या संदर्भाबद्दल धन्यवाद. अगदी खास नाही पण अख्तरींवरचा कृ. द. दिक्षितांचा लेखही चांगला आहे (पुस्तक : अत्तर सुगंध).

Naniwadekar said...

"मला जे कलाकार आवडत नाहीत त्यांच्यावरचे लेख पूर्ण वाचले नसते" ... मागे एकदा मी गांधीजींवर काही टीका केल्यावर एका मित्रानी तुमच्या एका लेखाची लिंक पाठवली होती. त्यात एका कलंत्री नामक गृहस्थाचे समर्थन होते. तो लेख (शैली आणि त्याहीपेक्षा विचार) मला आवडला, म्हणून मी तुमचे इतर काही चांगले लेख वाचले. तेव्हा इथे माझा रोख होता तो लेखक-कलाकारावर, टीकाविषय असलेल्या अख्तरीबाईवर नाही. न आवडलेल्या लेखावर टीका करतानाही 'टीका करण्याची आवड' हा आवडीचा प्रकार असू शकतो. पण बेगम अख्तरचे गाणे अनेकांना आवडते हे आधीच माहीत असल्यामुळे इथे फक्त 'तुम्हाला ते का आवडते' याची उत्सुकता हा लेख वाचण्यामागे होती.

'अतर सुगंध' मधला कृ द दिक्षितांचा लेख तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साधारणच आहे. मोहोळकरांचा लेख मला बरीच मेहनत घेऊन लिहिल्यासारखा वाटला.

अलूरकर आणि मन्सूर यांना कमीजास्त वज़न लावणे हा प्रकार मात्र मला विचित्र वाटला. ज्या विषयात मला माहितीच नाही त्या विषयावर मी दुसर्‍याच्या मताचा स्वीकार करीनही. उदा. माझे आवडते लेखक आणि विचारी माणूस या नात्यानी पु लं नी (किंवा एखाद्‌या बंगाली मित्रानी) दोन बंगाली लेखकांची तुलना केली तर मी 'असे असू शकेल' हे नक्कीच मान्य करीन. पण मला स्वत:ला गाण्याचं थोडंफार ज्ञान आणि (ज्ञान असो-नसो पण) त्याबद्‌दल मत बनवता येत असताना त्यांनी केसरबाई केरकरांची कितीही स्तुती केली तरी बाईंचे गाणे मला आवडतच नाही, तेव्हा पु लं च्या मताला मी ते गाणे पुन्हा ऐकावे या अर्थानी वज़न नाही, पण एका तज्ज्ञाला ते गाणे आवडते या अर्थानी वज़न आहे. 'अब्दुल करीम खानसाहेबांना गाण्यातले काय कळते' असा जाहीर प्रश्न करून वझेबुवांनी वाद घडवल्याचेही उदाहरण आहेच.

पॅट्रिक बार्‌क्ले या फ़ूटबॉल-लेखकाला मी फार मानतो. पण मधे त्यांनी प्लॅटिनी आणि झिडान (Zidane चा उच्चार मला माहीत नाही) यांना मॅरॅडोनाच्या पंक्तीला बसवले, याला काय म्हणणार? स्वत: प्लॅटिनी म्हणतो : What Zidane could do with a football, Maradona could do with a banana peel. पण हे वाक्य वाचले नसते तर निव्वळ Patrick Barclay म्हणतो म्हणून त्या मताला वज़न देणे किती योग्य ठरले असते?

त्याहीपुढे ज़ाऊन मी म्हणेन की तुमच्या वा अलूरकरांच्या आणि मन्सूरांच्या मतात फरक असला तर माझा कल तुम्हाला जास्त वज़न देण्याकडे असेल, कारण या संदर्भात मी तुम्हाला उलटे प्रश्न विचारू शकतो, शिवीगाळ करू शकतो, आणि तुम्ही त्याची दखल घेण्याची जास्त शक्यता असल्यामुळे तुम्ही पहिलेच जास्त विचार करून बोलाल. ही मोठी मंडळी बरेचदा हवे ते ठोकून देतात, आणि त्यांना कोण विचारणार? शिवाय विचार करून गाण्याची सवय असलेल्या गायकाला संगीताबद्‌दल साधकबाधक विचार मांडता येईलच, असे नाही. पण त्याबद्‌दल स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. एरवी हा प्रतिसाद फारच लांबेल.

अमुक रागाचा वा चालीचा अमुक रसाशी फारसा सम्बन्ध नसतो यावर माझा विश्वास आहे. त्याविरुद्‌ध मत असलेले अनेक ज्ञानी लोक मला माहीत आहेत. पण माझ्या मताचे सोदाहरण समर्थन वसन्तराव देशपाण्डे यांनी केले आहे, ज़े मी काही वर्षांपूर्वी ऐकले. आता ज़र हे समर्थन कॅसेटरुपानी आपल्या कानावर पडले नसते तर चालीचा रसाशी नको तितका संबंध लावणार्‍या एखाद्‌या कलाकाराचा आधार घेऊन निव्वळ बोलणार्‍याच्या तथाकथित वज़नावर आपण निर्णय लावणे योग्य ठरले असते का?

HAREKRISHNAJI said...

दिवाना बनाना है तो दिवाना बना दे
वर्ना कही तकदीर तमाशा न बना दे

मी पण एक दिवाणा, बेगम अख़तरींचा.

नादावलेलो, खुळावलेलो.

मध्यंतरी मी त्यांच्यावर बनवलेली एक फिल्म पाहिली, कार्यक्रमात त्यांची न ऐकलेली गाणी देखिल ऐकली.