Wednesday, May 26, 2010

शास्त्रीय संगीतातील बदल - व्यापक विचार

एका मित्राने पाठवलं म्हणून धनश्री राय-पंडित यांचं हे व्याख्यान ऐकलं. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल तरुण पिढीत जो दुरावा निर्माण होतो त्याची वेगवेगळी कारणे देण्यात येतात. त्यात भारतीय संगीतात तांत्रिक गोष्टी जास्त आहेत म्हणून ते कदाचित समजावून घायला अवघड जातं असंही एक कारण मानलं जातं. या बाईंनी शास्त्रीय संगीतातील राग समजावून घ्यायला काही उपाय सुचवलाय. तो उपाय ऐकून (आणि मुख्यता: त्यामागचा विचार जाणून) मला काही गोष्टी सुचल्या. या लेखातील फक्त दुसरा मुद्दा वर उल्लेखलेल्या व्याख्यानाशी संबंधित आहे. बाकीचे त्या अनुषंगाने सुचलेले विचार.

या आधीही मी शास्त्रीय संगीतातील बदलत्या trends वर लिहिलं होतं. माझे काही समज थोडे अजून व्यापक झाले आहेत असे मला वाटते. त्यामुळे हा लेख लिहायची इच्छा झाली.

१. आक्षेप: भारतीय संगीताचा आत्मा हरवतो आहे - उत्तर : भारतीय संगीत हे जणू काही "दैवी संगीत" आहे आणि त्यामुळे त्यात बदल करण्यात येऊ नयेत असा काही मंडळींचा सूर असतो. नावं घ्यायची गरज नाहीये पण अगदी उत्तम, प्रथितयश आणि मला ज्या कलाकारांबद्दल व्यक्तिश: प्रचंड आदर आहे त्यांच्याकडून हे ऐकल्यावर मात्र हे कलाकार आपल्यापुढे अपूर्ण चित्र उभं करत आहेत असं मला वाटलं.

ख्याल संगीताबद्दलच बोलायचं तर ते जास्तीत जास्त ५०० वर्ष जुने आहे. त्याआधी (त्याला समांतरही) धृपद संगीत होते. त्याचा संदर्भ फार तर तिथून अजून ५००-१००० वर्षे मागे जाईल. लोकसंगीताचा संदर्भ अजून ३-४ हजार वर्षे पर्यंत जाईल. (हे सगळे आकडे अंदाजे टाकतो आहे, माझा मुद्दा मांडण्यात अचूक आकडे फारसे महत्त्वाचे नाहीत). शेतीचा उदयच जिथे २० हजार वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता आणि संस्कृतीचा उदय ४००००/५०००० वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता तिथे शास्त्रीय संगीत हे जणू काही दैवी आहे आणि त्यात बदल होणे शक्यच नाही ही भूमिका मला तरी हास्यास्पद वाटते. आर डी बर्मन सारख्या संगीताला ७० च्या काळातल्या लोकांनी नाके मुरडलेली असणारच. त्यामुळे आज जे (भारतीय ) संगीत आहे ते जणूकाही फारच उथळ आहे असे सरसगट मानणे चुकीचे आहे.

२. भारतीय संगीताचे oversimplification : भारतीय रागसंगीत समजण्यास अवघड आहे असे माझे मत आहे. पण ते गाणे enjoy करण्यासाठी ते समजले पाहिजे असे कुठे आहे? त्यामुळे गाणे ऐकणे आणि ते समजणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. या आधीही याबद्दल एक लेख लिहिला आहे त्यामुळे जास्त खोलात जात नाही.

पण enjoy करण्यासाठी गाण्याच्या तांत्रिक बाजू समजण्याची गरज नाही याचा अर्थ तांत्रिक बाजू सोप्या आहेत असे मुळीच नाही. तांत्रिक बाजू समजावून घायला मेहनत घ्यावी लागते हे नि:संशय खरे आहे. त्यामुळे गाण्यातल्या तांत्रिक बाजू समजणे सोपे आहे असे oversimplification मात्र कृपया करू नये.

३. बदलते जीवनमान आणि संगीताचा संबंध : जिथे जीवनमान अस्थिर झाले आहे, लोकांचा उथळपणा वाढतो आहे, भोगवादी प्रवृत्ती वाढते आहे व तिला खतपाणी घालण्यास सर्व घटक तत्परतेने आपली भूमिका बजावत आहेत, तिथे संगीत किंवा कला या गोष्टींवर याचा परिणाम होणार नाही असे शक्य नाही. अगदी अपरिहार्यपणे तो होणार. पण परिणाम संगीतापेक्षा फार मोठ्या गोष्टीवर पडतो आहे आणि ती म्हणजे जीवनमूल्ये.

आजच्या (माझ्या) पिढीत किती लोक passionately काहीतरी करताना दिसतात? ते खेळ, कला, वाचन, ट्रेकिंग यासारखा काहीही असू शकतं. weekend ला timepass म्हणून करणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड (passion) असल्यामुळे ती गोष्ट करणं वेगळं. या आधीच्या या post चा रोख या उथळपणावर टीका करणे हाच होता. करमणूक म्हणून काही करूच नये एवढी अतार्किक भूमिका मी घेणार नाही. माझा आक्षेप आहे ते सर्व काही करमणूक म्हणून बघण्याला.

त्यामुळे जर काही हरवत असेलच तर ते भारतीय संगीत एवढंच हरवत नाहीये पण passion /संवेदनशीलता यासारखी महत्वाची मूल्ये हरवत आहेत. भारतीय संगीत बिघडत नाही असं मला म्हणायचं नाही. ते बदलत आहे, त्यातले काही बदल मला रुचत नाहीत. एक श्रोता म्हणून होत असणारे उथळ बदल मला नक्कीच टोचतात, त्रास देतात. पण या पूर्ण बदलांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघण्यात यावं असं मला वाटतं.

7 comments:

साधक said...

त्यामुळे जर काही हरवत असेलच तर ते भारतीय संगीत एवढंच हरवत नाहीये पण passion /संवेदनशीलता यासारखी महत्वाची मूल्ये हरवत आहेत.
पूर्णपणे सहमत.
>>भारतीय संगीत बिघडत नाही असं मला म्हणायचं नाही.
इथे भारतीय संगीत म्हणजे फिल्मी संगीत म्हणायचय का तुम्हाला?

>>त्यात बदल होणे शक्यच नाही ही भूमिका मला तरी हास्यास्पद वाटते.
तुम्ही भूमिका तुम्ही फारशी स्पष्ट केली नाही. बदल म्हणजे नेमके कोणते बदल? आणि ते करण्या आधी पारंपारिक संगीत पद्धतीला जे सांगायचं आहे ते आपल्याला पूर्ण पणे समजलं आहे का याचा आढावा घेणं महत्त्वाचं वाटतं.

sharayu said...

ख्याल ५००-६०० वर्षांपूर्वी प्रचारात आला असे नसून अस्तित्वात असलेली ख्यालगायकी तेव्हा लोकप्रिय झाली.

Naniwadekar said...

> भारतीय रागसंगीत समजण्यास अवघड आहे असे माझे मत आहे. पण ते गाणे enjoy करण्यासाठी ते समजले पाहिजे असे कुठे आहे? त्यामुळे गाणे ऐकणे आणि ते समजणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
>---

रागसंगीत समज़ायला तर कठीण आहेच, पण नुसते न समज़ता आवडायलाही सोपे नाही. ज्या ज़ुन्या काळाचे आपण उदात्तीकरण करतो त्या काळीही श्रोत्यांची संख्या कमीच होती. मनसूरांवरच्या लेखात पु ल म्हणतात : झुंडीच्या झुंडी संगीतसभांना ज़ात. हा त्यांचा गोडबोलेपणा. तशा झुंडी फक्त बालगंधर्वांच्या नाटकांना ज़ात आणि त्याही एका विशिष्ट समाज़ातल्याच; शास्त्रीय संगीताच्या सभांना झुंडी ज़ात नसत, असे माझे मत इतर वाचनातून झाले आहे. स्वत: मनसूर म्हणतात : 'सुननेवाले कम थे'. http://www.youtube.com/watch?v=pcJAU7Q5BBI


> आक्षेप: भारतीय संगीताचा आत्मा हरवतो आहे - उत्तर : भारतीय संगीत हे जणू काही "दैवी संगीत" आहे...
>---

संगीताचा आत्मा हरवतो आहेच; त्याचा ते संगीत दैवी असण्या-नसण्याशी संबंध वाटत नाही. मुळात हे क्षेत्र रूढीप्रिय माणसांचे आहे, म्हणून 'दैवी संगीत' वगैरे शब्द ऐकू येतात. देवाकडून आलेलं असो-नसो, देव अस्तित्वात असो-नसो, पण 'देवाकडे नेणारं' असं हे संगीत नक्कीच आहे. त्या अर्थानी 'दैवी' म्हणायला हरकत नाही. कुठल्याही गोष्टीत कधीही इष्ट बदल करायला हरकत नसावी, तसे काही मुद्‌दे रागसंगीताबद्‌दल माण्डता येतील किंवा पुढे घडू शकतील.

हिटलरला ज्यूंविषयी जेवढे असेल तितपतही प्रेम मला आर डी बर्मनविषयी नाही. आज़ अमेरिकेतल्या कुठल्याही किराणा दुकानात पाच मिनिटे ज़ायचीही चोरी आहे, कारण ज़ोरात वाज़णारे Funchum-gharana संगीत. भारतातल्या खाज़गी बसप्रवासात तर हा दारूण अनुभव १५-२० वर्षे तरी येतो आहे. प्रतिभा असूनही संगीतदेवतेची वस्त्रे फेडण्यात रस दाखवला म्हणून तर माझा फंचमवर जास्तच राग आहे. 'माझ्याच लोकांत मी परका होत चाललो आहे' हे पु लं नी १९७३ सुमारास लिहिले (सन्दर्भ - 'एक शून्य मी' हा लेख), त्याला माझ्या मते मुख्य कारण म्हणजे तेव्हा बोकाळू लागलेली पंचम-संस्कृती.


> परिणाम संगीतापेक्षा फार मोठ्या गोष्टीवर पडतो आहे आणि ती म्हणजे जीवनमूल्ये.
>---
हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण मग 'संगीतावरही परिणाम पडतो आहे' हे तुम्ही मान्य करताच आहात.

Dhananjay said...

@Sadhak
आपण जो संदर्भ घेतला आहे तिथे भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत असे मला अपेक्षित आहे.

इथे बदल म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातले बदल (किंवा त्यासोबतचे प्रयोग) अपेक्षित आहेत. उदा. भारतीय संगीताचे आणि पाश्चात्य संगीताचे fusion

@Sharayu
याबद्दल नक्की संदर्भ शोधावे लागणार. सध्या उल्लेखलेले काळ हे अचूक नाही ते मला माहिती आहे. मुद्दा हे संगीत evolve होत गेलं हा आहे.

Dhananjay said...

@Naniwadekar
प्रतिक्रियेबद्दल खूपच धन्यवाद.
आपल्या पहिल्या मुद्द्याशी असहमत. शास्त्रीय संगीत प्रंचंड लोकप्रिय होऊ शकत नाही, त्याचा आधीचा (अंदाजे १९०० च्या आधीचा) श्रोतावर्गमर्यादित होता हे मला समजते. पण "पण नुसते न समज़ता आवडायलाही सोपे नाही" या आपल्या मताशी असहमत. माझ्यासमोर अशी कमीतकमी ७-८ वैयक्तिक परिचयातल्या व्यक्ती आहेत ज्यांना शास्त्रीय संगीत "समजत" नाही पण "आवडते". या व्यक्ती शास्त्रीय संगीतातील उच्च नीच ओळखू शकतात. त्यामुळे हे माझे मत स्व-अनुभवातून बनवले आहे. फक्त, पुस्तकांची आवड लागायला जसा एक चांगला वाचक मित्र आवश्यक असतो, तसेच चांगलं गाणं आवडायला चांगला श्रोता मित्र असल्याने फायदा होतो असे मला वाटते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या मुद्द्याबद्दल सध्यातरी काही comments नाहीत.

Naniwadekar said...

मी आणि माझे दोन मित्र होस्टेलवर कायम शास्त्रीय संगीत ऐकायचो. मनसूर, कुमारजी, किशोरी. भीमसेनपायी तर आम्ही वेडेच होतो. ते ऐकून २-३ मित्र कमीजास्त प्रमाणात ऐकू लागले, पण उरलेले ७-८ मित्र कोरडेच राहिले. त्यामानी 'लता मंगेशकर' हे फक्त नांव ऐकलेले काही दक्षिणभाषिक मित्र लवकर लता ऐकू लागले. अशा लोकांना खयालगायक म्हणून भीमसेन चालतो, गजाननबुवा ज़ोशी वा अभिषेकी चालण्याचं प्रमाण कमी असतं. (ही भीमसेनवर टीका नाही, तर तो त्या गायकाच्या मोठेपणाचा एक भाग आहे.)

वाद्‌यसंगीत आणि कंठसंगीत यांच्या तुलनेतही हा प्रकार दिसतो. अपघातानी सभास्थानी पोचलेले लोकही अनेकदा शिवकुमार शर्माचा (अगदी आलापीचाही) आनन्द घेतात, भले ते उत्साहानी नन्तर त्याचा पाठपुरावा न करोत. वसन्तरावांची नाट्यगीते आवडीने ऐकणारेही त्यांची संथ आलापी ऐकण्याच्या भानगडीत पडत नाहीत. असा माझा रोख होता.

> चांगलं गाणं आवडायला चांगला श्रोता मित्र असल्याने फायदा होतो असे मला वाटते.
>---
हे पूर्णपणे मान्य.

Raj said...

आजच्या (माझ्या) पिढीत किती लोक passionately काहीतरी करताना दिसतात? ते खेळ, कला, वाचन, ट्रेकिंग यासारखा काहीही असू शकतं. weekend ला timepass म्हणून करणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड (passion) असल्यामुळे ती गोष्ट करणं वेगळं. >>
सही. या विषयावर मी एक-दोनदा लिहीलं आहे. सर्व मुद्द्यांवर १००% सहमत.
बादवे, तुमचा ब्लॉग बघितला, सुरेख, ओरिजिनल विचार आहेत.