आपण बर्याच गोष्टी आपल्याला सोयीस्कर पडतील अशा गृहीत धरतो. मग कधीतरी एखादा अनुभव असा येतो किंवा असं काहीतरी वाचण्यात येतं की ती गृहीतके पूर्णपणे मोडून पडतात व वस्तुस्थिती लक्षात येउन परिस्थितीचा पूर्ण विचार करणं आवश्यक बनतं. सध्या आपण शेतकर्यांचं जगणं असंच गृहीत धरुन चाललो आहोत. पेपरमध्ये शेतकर्यांच्या आत्महत्येची बातमी वाचली की थोडा वेळ हळहळ वाटून आपण कामाला लागतो. कर्जबाजारीपणा हेच शेतकर्यांच्या आत्महत्याचं कारण आहे असं प्रसारमाध्यमं भासवतात. पण हा कर्जबाजारीपणा का आला आहे याचं बारोमास इतकं अचूक चित्रण मला तरी कुठल्या लिखाणात आढळलं नाही. (कदाचित माझं वाचन कमी असेल, पण त्यामुळे बारोमासचं महत्व कमी होत नाही.)
बारोमास वरवर पाहता एक कादंबरी आहे. पण नीट विचार केला तर बारोमास फक्त ललित अनुभव मांडणारी कादंबरी न ठरता सध्याच्या शेतीविषयक प्रश्नावर भाष्य करणारं पुस्तक आहे. शेती, शेतीचे सध्याचे स्वरूप व त्यातील डोंगराएवढ्या अडचणी निस्तरता निस्तरता होणारी शेतकर्याची होणारी दमछाक देशमुखांनी एका सुशिक्षीत तरुणाच्या व त्याच्या कुटुंबियाच्या माध्यमातून मांडली आहे.
एकनाथ हा एक सुशिक्षीत तरुण. पण नोकरीसाठी लाच देउ न शकल्याने तो आपला वडिलोपार्जित धंदा - शेती करु लागतो. या शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने त्याची व त्याच्या कुटुंबाची होणारी घुसमट, कुठेच मार्ग दिसत नसल्यामुळे अंधश्रद्धकडे होणारी वाटचाल, आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळे भावाभावात बिघडलेले संबंध व विस्कटलेली वैवाहिक नाती, नोकरीसाठीच्या असहायतेचा फायदा घेउन पैसे घेणारे व फसवणारे नोकरीचे दलाल,या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणारे नेते आणि या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध देशमुखांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडला आहे.
शेतकर्यांची vote bank सर्वच राजकीय नेत्यांनी गृहीत धरल्यामुळे जागतिकीकरणानंतर आवश्यक असलेले policy मधील बदल केले गेले नाहीत. ( जागतिकीकरणानंतर - हे माझं आधीचं मत होतं. अरूण देशपांडे यांच्या अंकोली येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर समजलं की या policies शेतकर्यांना favourable कधीच नव्हत्या. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून - संदर्भ : महात्मा फुले व पंजाबराव देशमुखांचं लिखाण). या policies च्या अभावामुळं शेतकर्यांना मोठा तोटा सोसून आपला माल विकावा लागतोय. व त्याचं फलित म्हणजे शेतकर्यांचं खालावलेलं राहणीमान, मुलभूत सुविधांचा अभाव, विकासाच्या संधीचा अभाव. या सगळ्या गोष्टी आणि सोबतच निसर्गाची अवकृपा यांचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकर्यांची परिस्थिती दिवसेदिवस बिघडतच जातेय. लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणं ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाय केले तरंच चित्र थोडंफार बदलण्याची शक्यता आहे.
एकंदरीत बारोमास हे एक अस्वस्थ करणारं पुस्तक आहे. सदानंद देशमुखांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २००४ सालचा पुरस्कार मिळालेला आहे.
disclaimer :
पुस्तकाच्या विषयावरूनच लक्षात आलं असेल की हा एक खूप मोठा विषय आहे. शेती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, जागतिकीकरण या विषयांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्यावर प्रभुत्वानं लिहीणं शक्य नाही. माझ्या या लेखाचा हेतू शेती किंवा तत्सम विषयावर भाष्य करणं हा नसून असं भाष्य करणार्या एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन देणे हा आहे. पण हे पुस्तक वाचल्यावर मलातरी या विषयाचा जास्त अभ्यास (theoritical/practical) करावा असं वाटलं म्हणून हा लेख लिहीला आहे. आधीच्या post मध्ये नमूद (mention) केल्याप्रमाणे टीका व सूचनांचे स्वागत. तपशीलातील चुका असतील तर अवश्य कळवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
CHHAN REVIEW AAHE.....BAROMAS STORY AGDI SADANAND DESHMUKH SIRRANSARKHICH AAHE...KARAN MIHI SIRRANCHACH ''SHRI SARASWATI JUNIOR COLLEGE MADHE SIKHLELA VIDHYARTHI AAHE..
Post a Comment