Wednesday, April 8, 2009

माण्साने - अनावश्यक लेख

खरंतर हा लेख लिहायची गरज नसावी असं माझं मत होतं. त्यामुळेच माण्साने या कवितेला मी काहीही आगापीछा न लिहीता फक्त कविता टाकली होती. पण कौस्तुभशी बोलताना माझा हेतू तेवढासा सफल झालेला नाही आहे हे लक्षात आलं. लेख लिहायला कारणीभूत अजून एक गोष्ट म्हणता येईल. कुठलाही लेख लिहीला की ब्लॉग कमेंटस, काही इ-मेल आणि/किंवा काही प्रत्यक्ष भेटीतले उल्लेख त्या लेखाची पोच देत असतात. ’माण्साने’ या पोस्टच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. असं का व्हावं?

असं ध्यानात आलं की त्यातील कल्पना मध्यमवर्गी पांढरपेशाला रुचणाऱ्या नाहीयेत. त्या प्रतिमा/कल्पना धुवट या गटात मोडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळे (फक्त) संदीप खरे टाईप लोकांना तर त्या पचणं जरा अवघडच आहे. मी स्वत: कवितेचा बऱ्यापैकी रसिक आहे. कविता ही भावनांचं expression आहे असं माझं मत आहे. त्या भावना अनुभवजन्य असतील व अनुभव प्रामाणिक असतील तरच ती कविता कुठेतरी मनास भिडते असं माझं मत आहे. त्यामुळे पाडगावकरांच्या ’प्रेम म्हणजे प्रेम..’ आणि ’सलाम’ ही कविता दोन्ही मला सारख्याच आवडतात. विंदाची ’साठीचा गझल’ आणि ’रक्तसमाधी’ मला सारख्याच आवडतात. अशी अगणित कवितांची यादी येथे देऊ शकेल. सांगण्याचा मुद्दा हा की फक्त विद्रोही कविताच उत्कृष्ट आणि बाकीच्या त्या कचकड्या असं माझं मुळीच मत नाही. कवितेत (पुरेसा) अनुभव नसेल तर किंवा अनुभवांना प्रामाणिकपणा नसेल तर कवितेत दंभ येतो. संदीप खरे टाईप कवी याचं उत्तम उदाहरण आहे.

आता थोडंसं ’माण्साने’ विषयी -
नामदेव ढसाळांबद्दल मला फारशी माहिती नाही. ही कविता त्यांच्या सुरूवातीच्या कवितांपैकी आहे. सुरूवातीच्या कवितांनंतर ढसाळांच्या कवितेचाही साचा बनत गेला असं माझ्या एका ज्येष्ठ मित्राचं आणि परिचयातल्या एका ज्येष्ठ लेखकाचं मत आहे. मला जे काही सांगायचंय ते फक्त प्रस्तुत कवितेबद्दल आहे.

ज्या माणसाला जन्म झाल्यापासून कायम अन्यायच झालेला आहे, त्या माणसाकडून शुद्ध भाषेची, धुवट पाढरपेशेपणाची अपेक्षा करणं हे नुसतं चूक नाही तर तो त्यावर अजून एक अन्याय आहे. माण्साने ही कविता अशा एका माणसाची प्रस्थापित व्यवस्थेबद्दलची चीड आपल्यासमोर मांडते. हा माणूस झालेल्या अन्यायाच्या संतापाने थरथर कापतोय आणि ही कविता लिहीतोय असं वाटतं. त्यामुळेच कधीकधी दोन वेगळ्या व्यक्तींना एकाच पारड्यात बसवलेलं आढळेल. अन्यायाची वेगवेगळी (आणि किंचीत परस्परांशी संबंध नसलेली) रूपं एकानंतर एक मांडलेली आढळतील. आता त्या कवितेतील प्रतिमा किंवा वर्णन केलेली अन्यायाची रूपं जरा भडक वाटली तरी नीट विचार केला तर जाणवेल की सध्याच्या अन्यायाचं स्वरूप तेच आहे फक्त ढसाळांनी ते वेगळ्या स्वरूपात आणि शब्दांत मांडलं. बरं, ढसाळांना नुसतीच प्रस्थापित व्यवस्थेला शिव्या द्यायच्यात असं नाही हे त्यांनी शेवटच्या कडव्यात दाखवून दिलंय. ’सर्वे सन्तु निरामय:’ या श्लोकातील किंवा पसायदानातील भावनेशी नातं सांगणारं शेवटचं कडवं आहे.

ही कविता मी सांगितलेल्या दोन्ही निकषांवर उतरते आणि म्हणून ती मला सुंदर वाटते आणि आवडते. ज्यांना संदीप खरे आवडतो पण अशा कवितांकडे बघायला नको वाटतं त्यांनी आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांचा पुन्हा एकदा विचार करावा. मी आधी post केलेल्या कवितेवर काहीच प्रतिक्रिया (online/offline/प्रत्यक्ष) मिळाल्या नाहीत म्हणून हा लेख लिहीला.

1 comment:

Kaustubh said...

ढसाळांबद्दल मला काहीच कल्पना नाही. कवितेतला भाव उगाचच मोठा करून दाखवणे हासुद्धा दंभाचाच प्रकार आहे. कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा मला हेच वाटलं होतं. इतर वाचकांच्या बाबतीतही हेच झालं असावं. तुझ्या विश्लेषणानंतर काही गोष्टी पटल्या. पण एखादी कविता आवडते तेव्हा त्यातील भाव आपल्या अनुभवांशी, भावनांशी कुठेतरी सांगड घालत असतो असं मला वाटतं. तसं झालं नाही तर, भाव प्रामाणिक असूनही ते केवळ वास्तवाचं चित्रण होऊ शकतं. Schindler's List सारखा चित्रपट खूप काही सांगून गेला. पण तो आवडला नक्कीच नाही.

संदीप खरेच्या कवितांमधला भाव प्रामाणिक आहे असं मला वाटत नाही. आणि असला तरी त्याच्याशी relate तर मी मुळीच करू शकत नाही. (या विषयावर बोलायची संधी मी कधीच सोडत नाही. :P असो.)