Thursday, December 16, 2010

अभंग तुकयाचे

काही गाणी अगदी लहानपणापासून सोबत करत आहेत. एखादं गाणं हे गीतकार, संगीतकार, गायक यांच्या प्रयत्नांचं एकत्रित फलित असतं ही जाण खूप उशिरा आली. माझ्या तिसरी-चौथी पर्यंत आमच्याकडे टेपरेकॉर्डर नव्हता, त्यामुळे बहुतेक चांगल्या गाण्यांची पहिली ओळख रेडिओवर झालेली आहे. स्वत:हून निवडता अनेक उत्तम गाणी रेडिओमुळे कानावर पडत गेली आणि त्यामुळे नकळत गाण्यातली रुची वाढत गेली असावी. लहाणपणापासून सोबत असलेल्या आणि अजूनही अवीट गोडी कमी झालेल्या अशा एका अल्बमबद्दल लिहावे असे वाटले.

अभंग तुकयाचेया अल्बमचे माझ्या छोट्या संगीतविश्वात एक अढळ स्थान आहे. तुकारामाचे अभंग, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि लताचा अजोड नैसर्गिक स्वर. यातील प्रत्येकाचा मी फॅन आहे आणि इथे तिघेही एकत्र! हा पूर्ण अल्बम एक उत्कृष्ट सांगितिक अविष्कार आहे. अगा करुणाकरा, भेटी लागी जीवा, कन्या सासुरासी जाये या सारख्या अभंगांतील आर्त भाव असेल, सुंदर ते ध्यान, वृक्षवल्ली आम्हा सोयरे सारखे ऐकून गुळगुळीत झालेले अभंग असोत, किंवा आनंदाचे डोही, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, हाचि नेम आता सारखी भक्तीरसातले आणि प्रसन्न अभंग असोत, प्रत्येक अभंगाला त्याच्या अर्थाशी समर्पक अशी अप्रतिम चाल आहे आणि लताने ती तेवढीच उत्कृष्ट गायली आहे.

तुकारामाच्या एवढ्या समृद्ध अभंगसाठ्यातून निवडक दहा-अकरा अभंग निवडताना खळ्यांची (किंवा ज्यांनी हेच अभंग निवडले त्यांची) दमछाक झाली नसेल काय? मी बऱ्यापैकी unorganized पद्धतीने तुकारामगाथा वाचतो. कुठलंही पान उघडायचं, त्यावरचा कुठलातरी अभंग वाचायचा. आधी वाचलेला एखादा अभंग कधीतरी अचानक आठवतो, पण त्याचा गाथेतील अभंग क्रमांक किंवा पहिला चरण नेमकेपणाने आठवत नाही. तो शोधत असताना कुठलातरी तिसराच अभंग सापडतो आणि या नवीन अभंगानं आनंद मिळतो, जुना शोधायचा अभंग राहूनच जातो. असे असताना दहा-अकरा निवडक अभंग बहुतेक first-come-first-served या पद्धतीनेच निवडले असतील :). मला तुकारामात निर्माण झालेला रस याचं श्रेय तुकाराम या विषयावरच्या लिखाणाबरोबरच या अल्बमलाही जातं.

तुकारामाचे अभंग मौखिक परंपरेतून टिकले आहेत असे भालचंद्र नेमाडे त्यांच्या तुकाराम या पुस्तकात लिहितात. भारतीय संतसाहित्यामधील काही संत - विशेषत: ज्यांची रचना एकसंध नाही, वेगवेगळ्या पदांच्या, अभंगांच्या रूपात आहे - यांच्या साहित्यात बरेच पाठभेद आढळतात ते बहुधा यामुळेच. शबनम वीरमणी कबीरावरील आपल्या documentary प्रोजेक्ट मध्ये असे नोंदतात - तुम्ही उत्तर प्रदेशात जा आणि कबीराची पदं त्या भाषेत ऐकू येतात, तुम्ही राजस्थानात जा, कबीराची पदंही आपली भाषा बदलतात.

मौखिक परंपरेतून अभंग गद्य रुपात पुढे जाणार नाहीत, त्यांना चाल असेलच. आजच्या काळात मुद्रण अवस्थेसोबतच मौखिक परंपरेतून हे अभंग खळे/लता यांच्या कलेतून टिकवले जात आहेत, नाही का? गाथेत जाउन जेवढ्या लोकांनी हे अभंग वाचले असते त्यापेक्षा कितीतरी पट लोकांच्या ऐकण्यात हे अभंग सहजगतीने गेले आहेत. आपल्यापर्यंत हे अभंग पोचवण्याचं आणि ते रुजवण्याचं लता/खळे यांचं ऋण मान्य केलंच पाहिजे.

Thursday, November 25, 2010

सातवीण


हे नाव ऐकलंय? किंवा सोबतच्या फोटोमधली फुले आणि झाड पाहिलंय? दुर्दैवाने वासाला attach करण्याचे तंत्रज्ञान अजून आलेले नाहीये :) , नाहीतर या फुलांचा वाससुद्धा attach करून विचारलं असतंहा वास घेतला आहे? मी दरवर्षी एका झाडाच्या प्रेमात पडतोयमागच्या वर्षी बहाव्याच्या प्रेमात पडलो होतो, त्याच्या आधीच्या वर्षी बूचाच्या, या वर्षी सप्तपर्णीच्या! तसं हे झाड 4-5 वर्षे आधीपासूनच माहिती आहे. मुंबईमध्ये पवईत हिरानंदानी गार्डन्स या भागात सप्तपर्णीची खूप झाडं आहेत. मुंबई सोडल्यानंतर पुण्यात आलो पण पुण्यात मला हे झाड कुठे आढळलं नाही. सध्या नाशिक मध्ये आहे, आणि इथे सप्तपर्णी 4-5 ठिकाणी सापडलं. त्यामुळे मुंबईमधील वास्तव्याबद्दल nostalgic झालो आणि या झाडाचं नाव आणि अजून थोडी माहिती शोधली.



सातवीण (किंवा सप्तपर्णी) या झाडाला साधारणत: ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये ही फुलं येतात आणि त्यांचा सुगंध केवळ अवर्णनीय असतो. याला devil’s tree असेही नाव आहे. फुलाचा गुच्छ आणि त्याचं डिझाईन हे अतिशय नेत्रसुखद असतं. खूप सप्तपर्णी एकत्र असतील तर त्या वासाने दडपून जायला होतं. छाती भरून वास घेतला तरी अजून घ्यावासा वाटतो. कविकुलगुरू कालिदासाने रघुवंश या काव्यात (की नाटकात?) ’सप्तच्छदक्षीरकटुप्रवाहमासह्यमाघ्राय मदं तदीयम।’ (म्हणजे सप्तच्छदकिंवा सप्तपर्णी) या झाडाचा पांढरा, कडू चीक असतो. त्याचा दर्प रानटी, मदमस्त हत्तींच्या मदासारखा असतो) असे वर्णन केले आहे.
संदर्भ – 1. आपले वृक्षश्री. . महाजन

Thursday, October 28, 2010

कप भरून हवा चहा

एक
दोन
तीन
चार
पाच अधिक एक सहा
कप भरून हवा चहा

आता कुणाचं ऐकणार नाही
काळा झालो तरी भिणार नाही
तुम्हीच बोर्नव्हिटा पीत रहा
कप भरून हवा चहा

आजी भल्या पहाटे पिते
चहात आजोबांची मिशी नहाते
बाबा म्हणतात दूध प्या
पण मला हवा चहा

ताईला असतो अभ्यास म्हणून
दादा पावसात भिजला म्हणून
आईला दुखतंय डोकं म्हणून
होऊ द्या रात्र, वाजू द्या दहा,
मलाही आता हवा चहा
कप भरून हवा चहा

- कवी दासू वैद्य

Wednesday, August 25, 2010

कलंदर केसवा

आउ कलंदर केसवा करी अबदाली भेसवा

जिनि अकास कुलह सर कीनी कउसै सपत पयाला
चमर पोस का मंदरु तेरा इह बिधि बने गुपाला

छपन कोटि का पेहनू तेरा सोलह सहस इजारा
भार अठारह मुदगरू तेरा सहनक सभ संसारा


देहि महजिदी मनु मौलाना सहज निवाज गुजारै
बीबी कौला सउ काइनु तेरा निरंकार अकारै

भगती करत मेरे ताल छिनाए किह पहि करउ पुकारै
नामे का सुआमी अंतरजामी फिरे सगल बेदेसवा

कुमार गंधर्वांचं 'कलंदर केसवा' हे निर्गुणी भजन ऐकल्यापासून त्याच्या शब्दांबद्दल कुतूहल होतं . निर्गुण भजनामध्ये (किंवा भक्तीमध्ये) कुठल्याही विशिष्ट देवाची प्रार्थना नसते. आत्म्याचे गुण वर्णन करणारी, सृष्टीची आणि मानवाची उत्पत्ती याचा शोध घेणारी, एखाद्या विशिष्ट देवापेक्षा अविनाशी तत्वावर श्रद्धा असणारी निर्गुण भक्ती ही भक्ती शाखा आहे. कुमार गंधर्वांनी बरीच निर्गुणी भजनं गायली आहेत. शून्य गढ शहर, सुनता है गुरु ग्यानी, हिरना समझ बुझ इत्यादी भजनं जशी ऐकत गेलो तसे त्यातले शब्द समजत गेले, पूर्ण संदर्भ जरी लागले नसले तरी या भजनांचे अर्थ लागले.

कुमारांनी गायलेली निर्गुणी भजनं बहुतेक करून कबीराची किंवा नाथ संप्रदायातली आहेत. कलंदर केसवा या भजनाचे शब्द ऐकून हे भजन कबीराचं असावं असं उगीच वाटून गेलं. शेवटच्या दोह्यात/कडव्यात नाममुद्रा नाही असं मला वाटलं. त्यामुळे हे कबीराचं भजन असावं असं वाटून अर्थ लावायचा प्रयत्न केला. सुरुवातीची ओळ "कलंदर केसवा करी अब्दाली भेसवा" यावरून मी अर्थ लावला - "हे केशवा, तू अब्दालीचा वेश करून ये". पण पुढच्या ओळीचा या ओळीशी संबंध लागेना. आणि अजून एक पंचाईत -अब्दाली कोण? मला माहित असलेला अब्दाली एकच - अहमदशाह अब्दाली. असं काही झालं असावं का की अब्दालीचं आक्रमण झालं आणि त्यापासून वाचवा म्हणून कबीरांनी केशवाचा धावा केला? पण wikipedia वर कबिरांचा कालावधी १४४०-१५१८ असा आहे आणि अहमद शाह अब्दालीचा कालावधी खूप अलीकडचा - १७२२-१७३३. म्हणजे हे ही समीकरण जुळेना. गुगल वर पहिल्या दोन ओळी इंग्लिश किंवा देवनागरी मध्ये टाईप करून बघितल्या पण काहीही कामाचे संदर्भ मिळाले नाही.

खूप दिवस हा असा non-aggressive शोध चालू असताना एक दिवस मधल्या दोन ओळी देवनागरी मध्ये शोधल्या आणि wow! वाटावं अशी एक लिंक मिळाली. त्या लिंकमधून बहुतेक गोष्टी स्पष्ट झाल्या.

हे भजन नामदेवांनी लिहिलेलं आहे आणि हे गुरु ग्रंथसाहिब (शिखांचा धर्मग्रंथ) मध्ये आहे. नामदेवांनी पंजाबी भाषेत काही रचना केलेली आहे आणि त्यांचा गुरु ग्रंथसाहिब मध्ये समावेश आहे ही माहिती आधी होती पण याशिवाय इतर काहीही यासंदर्भात वाचण्यात आलं नव्हतं. शेवटची "नामे का स्वामी अंतर्यामी" ही नाममुद्रा हे पद/भजन नामदेवांचं भजन आहे एवढा अंदाज यायला पुरेशी होती पण शेवटच्या ओळीपर्यंत उच्चार व्यवस्थित ऐकून समजावून घ्यावेत हा patience कुमारांचं भजन ऐकताना राहिला नव्हता. नामदेवांना कुठला अब्दाली अपेक्षीत होता याचा उत्तर आणखी थोडं गुगल करून मिळालं. नामदेवांना अभिप्रेत असलेला अब्दाली किंवा अब्दाल हे सुफी संप्रदायातील संत आहेत.

नामदेव केशवाला सुफी संताचा वेश घेऊन या अशी प्रार्थना करत आहेत आणि बाकीच्या कडव्यांमध्ये त्या वेषाचे वर्णन आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हे विश्व एका निराकार अविनाशी निर्गुणी तत्वावर आधारित आहे आणि हे तत्व आपल्यापुढे सगुण होताना हे निराकार गुण (आकाश, पृथ्वी) घेऊन मानवी रुपात येतं अशी धारणा आहे.

वर दिलेल्या लिंक वरचा इंग्लिश मधला अनुवाद वाचला आणि शब्दांबद्दल बऱ्यापैकी स्पष्टता आली पण संदर्भ मात्र लागले नाहीत म्हणून काही गोष्टींवर गुगल केलं तर अबदाल बद्दल खालील माहिती मिळाली.
१. सुफी लोकांचा विश्वास आहे की अल्लाने अब्दाल, अक़्ताब, आणि अवलिया अशा प्रकारच्या संताना हे जग चालवायचा अधिकार दिला आहे.
२. या जगात सात अबदाल आहेत जे पृथ्वीच्या सात खंडावर राज्य करतात (कउसै सपत पयाला या ओळीचा अर्थ सात जग तुझ्या चपला आहेत असा लिहिलं आहे. ते सात जग म्हणजेच सात खंड असावेत)
३. कुलह (जिनि अकास कुलह सर कीनी ) म्हणजे एक प्रकारची टोपी. kulah असं गुगल केलंत तर त्या टोपीचं चित्र पण दिसेल.
संदर्भ
१. गुरु ग्रंथसाहिब
२. वेबसाईट १ (सुफी संप्रदायाशी संबंधित)
३. वेबसाईट २ (सुफी संप्रदायाशी संबंधित)

Friday, May 28, 2010

संभ्रम

काल लेण्यांमध्ये बुद्धाचं एक शिल्प पाहिलं
भव्यच होतं ते - बुद्धाच्या चेहऱ्यावरचं शांत स्मितहास्य,
कुरळे केस, लांब कान, रुंद खांदे,
हाताचे तळवे आणि त्यावरील रेषा,
अंगावरील वस्त्र, या सर्वातून प्रतीत होणारी बुद्धाची विरक्ती.
हे सगळं ते शिल्प दाखवत होतं, भान हरपून बघत राहिलो.

इतर राजे भोगविलासात आणि साम्राज्यवाढीत दंग असताना
लौकिक सामर्थ्य आणि ऐश्वर्याकडे पाठ फिरवून गेलेला सिद्धार्थ.
त्या प्रेरणेपुढे मी नतमस्तक असतानाच एक सुंदर मुलगी समोरून गेली.
अवखळ डोळे, रेखीव बांधा, नितळ हात,
घामाने ओली झालेली मान, त्याला चिकटलेले केस,
नैसर्गिक शिल्पच जणू.

मी मात्र नंतर विचारात - दोन अनुभूतींमुळे.
बुद्धाबद्दल आणि कलाकाराबद्दल वाटत असलेला आदर, बुद्धाच्या विरक्तीचा (अंशत:) प्रभाव.
आणि त्याचवेळी निसर्गाच्या जीवशास्त्रीय सत्याचे आणि मुलभूत प्रेरणेचे दर्शन.
विरक्ती आणि भोग या दोन टोकांच्या मध्ये मी.

Thursday, May 27, 2010

रब्बी शेरगिलचं एक गाणं

काहीही प्रस्तावना न करता हे गाणं ऐकावं आणि वाचावं अशी इच्छा आहे. गाणं - युट्युब वर, एम पी थ्री फाईल, आणि शब्द इथे आणि इथे.
गेल्या दोन-तीन posts मध्ये संवेदनशीलतेच्या नावाने बराच ओरडा केला होता. त्यावर उतारा म्हणून हे गाणं.

दोन ऑनलाईन उपक्रमांबद्दल

. शास्त्रीय संगीतातील बंदिशींचे शब्द - बंदिशबेस येथे मिळतील. अद्वैत जोशी यांची ती साईट आहे. शास्त्रीय संगीताच्या श्रोत्याला बंदिशीचे शब्द बऱ्यापैकी वेळेस कळत नाहीत. ते या साईट वर उपलब्ध करून दिलेले आहेत. अजूनही काही विभाग आहेत. पण बंदिशींचे शब्द नेटवर दुर्मिळ आहेत म्हणून फक्त त्याचा उल्लेख केला.

. एक कविता - पद्माकर, हृषिकेश, किरण ही मंडळी २००६ पासून हा ब्लॉग चालवत आहेत. सहजासहजी नेटवर सापडणाऱ्या कविता येथे सापडतील. (काही दिवसापूर्वी मीही त्यांना जोडलो गेलो आहे.)

असे सातत्यपूर्ण उपक्रम चालवल्याबद्दल दोन्ही उपक्रम सुरू करणाऱ्यांचे आणि इतर contributors चे हार्दिक अभिनंदन!

Wednesday, May 26, 2010

शास्त्रीय संगीतातील बदल - व्यापक विचार

एका मित्राने पाठवलं म्हणून धनश्री राय-पंडित यांचं हे व्याख्यान ऐकलं. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल तरुण पिढीत जो दुरावा निर्माण होतो त्याची वेगवेगळी कारणे देण्यात येतात. त्यात भारतीय संगीतात तांत्रिक गोष्टी जास्त आहेत म्हणून ते कदाचित समजावून घायला अवघड जातं असंही एक कारण मानलं जातं. या बाईंनी शास्त्रीय संगीतातील राग समजावून घ्यायला काही उपाय सुचवलाय. तो उपाय ऐकून (आणि मुख्यता: त्यामागचा विचार जाणून) मला काही गोष्टी सुचल्या. या लेखातील फक्त दुसरा मुद्दा वर उल्लेखलेल्या व्याख्यानाशी संबंधित आहे. बाकीचे त्या अनुषंगाने सुचलेले विचार.

या आधीही मी शास्त्रीय संगीतातील बदलत्या trends वर लिहिलं होतं. माझे काही समज थोडे अजून व्यापक झाले आहेत असे मला वाटते. त्यामुळे हा लेख लिहायची इच्छा झाली.

१. आक्षेप: भारतीय संगीताचा आत्मा हरवतो आहे - उत्तर : भारतीय संगीत हे जणू काही "दैवी संगीत" आहे आणि त्यामुळे त्यात बदल करण्यात येऊ नयेत असा काही मंडळींचा सूर असतो. नावं घ्यायची गरज नाहीये पण अगदी उत्तम, प्रथितयश आणि मला ज्या कलाकारांबद्दल व्यक्तिश: प्रचंड आदर आहे त्यांच्याकडून हे ऐकल्यावर मात्र हे कलाकार आपल्यापुढे अपूर्ण चित्र उभं करत आहेत असं मला वाटलं.

ख्याल संगीताबद्दलच बोलायचं तर ते जास्तीत जास्त ५०० वर्ष जुने आहे. त्याआधी (त्याला समांतरही) धृपद संगीत होते. त्याचा संदर्भ फार तर तिथून अजून ५००-१००० वर्षे मागे जाईल. लोकसंगीताचा संदर्भ अजून ३-४ हजार वर्षे पर्यंत जाईल. (हे सगळे आकडे अंदाजे टाकतो आहे, माझा मुद्दा मांडण्यात अचूक आकडे फारसे महत्त्वाचे नाहीत). शेतीचा उदयच जिथे २० हजार वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता आणि संस्कृतीचा उदय ४००००/५०००० वर्षापूर्वीपर्यंत झाला नव्हता तिथे शास्त्रीय संगीत हे जणू काही दैवी आहे आणि त्यात बदल होणे शक्यच नाही ही भूमिका मला तरी हास्यास्पद वाटते. आर डी बर्मन सारख्या संगीताला ७० च्या काळातल्या लोकांनी नाके मुरडलेली असणारच. त्यामुळे आज जे (भारतीय ) संगीत आहे ते जणूकाही फारच उथळ आहे असे सरसगट मानणे चुकीचे आहे.

२. भारतीय संगीताचे oversimplification : भारतीय रागसंगीत समजण्यास अवघड आहे असे माझे मत आहे. पण ते गाणे enjoy करण्यासाठी ते समजले पाहिजे असे कुठे आहे? त्यामुळे गाणे ऐकणे आणि ते समजणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. या आधीही याबद्दल एक लेख लिहिला आहे त्यामुळे जास्त खोलात जात नाही.

पण enjoy करण्यासाठी गाण्याच्या तांत्रिक बाजू समजण्याची गरज नाही याचा अर्थ तांत्रिक बाजू सोप्या आहेत असे मुळीच नाही. तांत्रिक बाजू समजावून घायला मेहनत घ्यावी लागते हे नि:संशय खरे आहे. त्यामुळे गाण्यातल्या तांत्रिक बाजू समजणे सोपे आहे असे oversimplification मात्र कृपया करू नये.

३. बदलते जीवनमान आणि संगीताचा संबंध : जिथे जीवनमान अस्थिर झाले आहे, लोकांचा उथळपणा वाढतो आहे, भोगवादी प्रवृत्ती वाढते आहे व तिला खतपाणी घालण्यास सर्व घटक तत्परतेने आपली भूमिका बजावत आहेत, तिथे संगीत किंवा कला या गोष्टींवर याचा परिणाम होणार नाही असे शक्य नाही. अगदी अपरिहार्यपणे तो होणार. पण परिणाम संगीतापेक्षा फार मोठ्या गोष्टीवर पडतो आहे आणि ती म्हणजे जीवनमूल्ये.

आजच्या (माझ्या) पिढीत किती लोक passionately काहीतरी करताना दिसतात? ते खेळ, कला, वाचन, ट्रेकिंग यासारखा काहीही असू शकतं. weekend ला timepass म्हणून करणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड (passion) असल्यामुळे ती गोष्ट करणं वेगळं. या आधीच्या या post चा रोख या उथळपणावर टीका करणे हाच होता. करमणूक म्हणून काही करूच नये एवढी अतार्किक भूमिका मी घेणार नाही. माझा आक्षेप आहे ते सर्व काही करमणूक म्हणून बघण्याला.

त्यामुळे जर काही हरवत असेलच तर ते भारतीय संगीत एवढंच हरवत नाहीये पण passion /संवेदनशीलता यासारखी महत्वाची मूल्ये हरवत आहेत. भारतीय संगीत बिघडत नाही असं मला म्हणायचं नाही. ते बदलत आहे, त्यातले काही बदल मला रुचत नाहीत. एक श्रोता म्हणून होत असणारे उथळ बदल मला नक्कीच टोचतात, त्रास देतात. पण या पूर्ण बदलांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघण्यात यावं असं मला वाटतं.

Tuesday, April 6, 2010

बस नाम ही काफी है!

बेगम अख्तर ..
माझ्या पिढीत बेगम अख्तर ऐकणारे अणि त्यांचे रसिक असणारे फार लोक नाहीत. अख्तरीबाई हे एक व्यसन आहे. बोरकरांची एक कविता आहे - दंश या नावाची. त्या कवितेची सुरुवात आहे -
डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी कावीळ
डोळ्यामधील काजळ देखील झाले गं घननीळ
असं सगळं निळं निळं झाल्याची अवस्था बोरकर त्यात सांगतात. अशी काहीतरी अवस्था ज्यांना अख्तरीबाईंच्या सुराचा दंश झाला आहे त्यांची होते.

माझ्या आवडत्या माणसांची पहिली भेट कशी आणि कधी झाली हे माझ्या बऱ्यापैकी लक्षात असतं. अख्तरीबाईंच्या सुराची पहिली भेटही लक्षात आहे. त्यांची पहिली ऐकलेली ठुमरी होती - बालमवा तुम क्या जानो प्रीत. पहिल्यांदाच ऐकतानाही त्या सुराची आर्तता मनाला भिडली. नंतर हळूहळू त्यांचं गाणं ऐकत गेलो आणि बहुतांश गाणी पहिल्यांदा ऐकली की एक खजिना सापडल्याचा आनंद व्हायचा; अजूनही होतो. All time favourites मध्ये अख्तरीबाई कधी समाविष्ट झाल्या ते कळलंसुद्धा नाही. अख्तरींचं गाणं हे रोज ऐकावं असं प्रकरण नाही. तो दंश व्हायला आणि पेलायला भावनांची intensity तेवढीच जास्त व्हावी लागते. पण ज्यावेळी अख्तरींच्या सुराची तहान लागते त्यावेळी दुसऱ्या कशानेही ती तहान भागत नाही.

साधारणत: अख्तरींचं गाणं हे दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागता येतं. एक त्यांची ठुमरी (किंवा दादरा, टप्पा, कजरी इ.) आणि दुसरी त्यांची गझल. त्यांची ठुमरी समजायला आणि आवडायला त्यामानाने सोपी आहे. थोडंफार ठुमरी गायन ऐकलं असेल तर अख्तरीबाईंची ठुमरी नक्कीच आनंद देईल. अगदीच नवखे असाल असाल तर मात्र अख्तरीबाईचं गाणं थोडंसं जड जाईल. ठुमरीपेक्षा त्यांची गझल appreciate करायला थोडी अवघड आहे. त्यांच्या गझला एकदम hardcore उर्दूमध्ये असतात, त्यामुळे उर्दू येत नसेल तर बऱ्याच वेळेस नेमका अर्थ लागत नाही, अंदाज बांधावा लागतो. पण अख्तरीबाईंच्या सुराची जादू अशी आहे की ते उर्दू शब्द कधीच टोचत नाहीत. ज्याप्रमाणे दिल से.. मधील चल छैय्या छैय्या हे गाणं अस्खलित उर्दू असूनही ते टोचत नाही अगदी त्याचप्रमाणे. उदाहरण द्यायचं झालं तर दिवाना बनाना है तो.. ही गझल किंवा तबियत इन दिनो... या गझलेचं देता येईल. एकदा या (आणि अशा) गझल सुरु झाल्या की सुरासोबत आपण नकळत वाहत जातो.

अख्तरीबाईंवर दोन तीन लेख वाचले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही माहित नाही आणि जाणून घ्यावंसं वाटलं नाही. फक्त त्यांच्या आवाजात जी आर्तता आणि जो दर्द आहे त्याच्यामागे वैयक्तिक दु:ख असेल का असे कधीतरी वाटले होते. गझलमधला दर्द किंवा ठुमरी मधला शृंगार, विरह अख्तरीबाई ज्या पद्धतीने सादर करतात त्या दर्जाचं गाणं खूपच कमी जणांचं आहे. या संदर्भात सुनिताबाईंनी त्यांच्या मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरच्या लेखात एक आठवण दिली आहे. त्यात मन्सूर असं म्हणतात की जर ५०-६० वर्षानंतर भारतीय संगीतातील कुठलं गाणं टिकून राहणार असेल तर ते बेगम अख्तर आणि बालगंधर्व यांचं असेल!

अख्तरीबाईंच्या गाण्यातील मला आवडलेल्या गोष्टी कुठल्या? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरांचा सच्चेपणा. असं सुरांचं सच्चेपण आणि नितळपण अख्तरीबाई सोडल्या तर मला ३-४ लोकांमध्येच दिसतं. वर उल्लेखल्याप्रमाणे गाण्यातील भाव दाखवण्याची क्षमता हा मला जाणवलेला दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी लिहून ठेवली आहे आणि अख्तरीबाईंच्या गाण्याच्या प्रत्येक रसिकाला ती माहित असेल. मज पामराचा पण तो weak point आहे त्यामुळे त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. गाणं गाताना मध्येच त्यांचा स्वर फाटतो किंवा थांबतो किंवा choke होतो. तशी ही गोष्ट निर्दोष गाण्याच्या दृष्टीने दुर्गुणच म्हटली पाहिजे पण त्यांच्या गाण्यात ती जागा अशी सुंदर वाटत राहते की बस. एकदा तशी जागा येऊन गेली की नकळत वाट बघत राहतो की पुन्हा ती जागा कधी येते आहे. ते स्वराचे choke होणं ऐकून जर तुमची heartbit miss होत नसेल तर आपली गाण्यातली wavelength जुळायला वेळ आहे असं मी म्हणेन.

अख्तरीबाईंच्या काही गाण्यावर वेगळे लेख लिहिता येतील एवढी ती गझल/ ठुमरी सुंदर आहेत. त्यांची बंगाली गाणी सुद्धा अशक्य सुंदर आहेत. तुम्हालाही अख्तरीबाईंच्या सुराचा दंश होवो अशी शुभेच्छा देऊन लेख संपवतो.

Friday, January 15, 2010

काही घटना आणि काही (तिखट) प्रश्न

सतीश शेट्टी यांचं खून झाला. त्यामुळे काही लोकांना खूप फायदा होईल, बऱ्याच लोकांना काहीच फरक पडणार नाही. मी शेट्टी यांचे नाव पहिल्यांदा २ दिवसापूर्वीच वाचले पण त्यांच्याबद्दल जे लिहून आले त्यामुळे त्यांचे कार्य कळले. त्यांच्या कामाबद्दल, खुनाबद्दल, त्यामुळे उद्भवलेल्या प्रश्नाबद्दल वर्तमानपत्रात वाचायला मिळेलच, त्यामुळे अधिक काही सांगण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. शरमलेल्या आणि संतापलेल्या मनाने त्यांना माझी श्रद्धांजली. जर शेट्टी यांच्या खुनाने काहीच वाटत नसेल तर आपले मन समाजाप्रती आणि एकूणच कोडगे बनत चाललं आहे हे स्वत:शी मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपल्याकडे आहे?

दुसरी श्रद्धांजली गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या अनेक जीवांना. विशेष करून त्यातल्या लहान मुलांना. ज्या वयात आशावादाने मन भरलेलं असावं त्या वयात ही मुलं असं काय करताहेत? यातले बहुतेक जण हे परीक्षा पद्धतीचे किंवा reality शोज चे बळी आहेत. लहान मुलांचे reality शोज बघणारे या आत्महत्येप्रती स्वत:ची अल्पस्वल्प (नैतिक) जबाबदारी मान्य करतील?