Monday, September 14, 2009

समीक्षक वृत्ती

समीक्षेच्या संदर्भात आज एक चांगला परिच्छेद वाचण्यात आला. तो देण्याआधी थोडेसे –

समीक्षा म्हणजे काय हे मला नक्की सांगता येणार नाही परंतु मराठीतलं समीक्षात्मक लिखाण मी थोडंफार वाचलंय. त्यावरून मी असा अंदाज करू शकतो की एखादा लेख/पुस्तक वाचताना जर कुठे काही अडलं (एखादा शब्द, शब्दांचा अर्थ किंवा काही संदर्भ) तर त्याचा पाठपुरावा करणं, कळालेली गोष्ट वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे म्हणजे समीक्षक वृत्ती. समीक्षक ही व्यक्ती रसिक तर असतेच पण तिच्यात अभ्यासक वृत्तीही असते. काही लोकांना समीक्षा म्हणजे काथ्याकूट असं जरी वाटत असलं तरी कलाकृती समजून घेण्यास चांगली समीक्षा खूपच मदत करते.

म. वा. धोंड हे एक श्रेष्ठ समीक्षक. त्यांची तीन पुस्तके वाचली आहेत आणि त्यांचे लिखाण मला आवडते. त्यांचे ’तरीही येतो वास फुलांना’ हे बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचे पुस्तक वाचले आणि मला मर्ढेकरांच्या कवितांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांच्या या/इतर पुस्तकांनी मला त्या-त्या विषयामध्ये रस निर्माण झाला आहे किंवा वाढला आहे. धोंडांवर या महिन्याच्या (सप्टेंबर २००९) अंतर्नाद मध्ये किशोर आरस यांनी एक लेख लिहीला आहे. त्या लेखातील परिच्छेद खाली लिहीतो आहे. हा परिच्छेद समीक्षक वृत्तीसंबंधी आहे आणि समीक्षकाची अभ्यासक वृत्ती, त्याला अर्थ लागत नसल्यामुळे जाणवणारी अस्वस्थता आणि अर्थ मिळाल्या नंतरचा आनंद यातून दिसतो.

============================================

पैं हींवराची दाट साऊली । सज्जनी जैसी वालिली ।

तैसिं पुण्ये डावलूनी गेली । अभक्तांते ॥

या ज्ञानेश्वरीतील ओवीने त्यांना (धोंडांना) अडवले. ओवीचा उत्तरार्ध सहज कळला, पण पूर्वार्ध नीट उमजेना. हिवराची सावली चांगली दाट असूनही सज्जन ती टाळतात, त्याअर्थी त्यात दुर्जनाकरिता काहीतरी ’गंमत’ नक्कीच असली पाहिजे. ती कोणती?

धोंडांना चुटपुट लागून राहिली. हिवर पूर्ण अपरिचित, म्हणून शब्दकोश व ज्ञानेश्वरीचे निघंटू पाहिले. शिवाजीराव भावे यांचा ’ज्ञानेश्वरी कोश’ न्याहाळला. समाधान होईना. मग ते वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटले. प्रा. धोंड म्हणतात, ’ते तर बिचारे माझ्याहूनही निष्पाप! त्यांना हिवराची सावली टाळायची असते हे तर ठाऊक नव्हतेच, पण हिवरही ठाऊक नव्हता.’ या काळात प्रा. धोंड आमच्या ’साहित्यसहवास’मध्ये लावलेल्या असंख्य झाडांकडे तासनतास टक लावून पाहत उभे असल्याचे दृश्य सर्व रहिवाशांना दिसत असे. पुढे नागपूर विद्यापीठात ते काही कामाकरिता गेले असता १८ वर्षे वयाच्या एका मुलाने हिवराचे झाड त्यांना दाखवले. ’अकॅशिया ल्यूकोफ्लॉइआ’ हे हिवराचे लॅटिन नाव असल्याचे त्यांना समजले. हिवर भेटला, पण त्याच्या सावलीला सज्जन का बसत नाहीत, हे कळले नाही. पुन्हा एकदा ते ग्रंथाला शरण गेले. जॉर्ज वॅटचा ’डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्रॉडक्टस ऑफ इंडिया’ हा बृहद ग्रंथ पाहत असताना ’हिवराची साल दारूकरता तयार केलेल्या रसायनात घातली तर ते लवकर फसफसते, त्यातील गाळ खाली बसातो आणि त्याला चांगला स्वाद येतो. म्हणून हिवराला ’शराब की कीकर’ असेही नाव आहे हे कळून आले आणि ’सज्जन’ हिवराच्या सावलीला का बसत नाहीत, याचा तत्काळ उलगडा झाला.

Tuesday, July 28, 2009

वर्तुळ

आज सकाळी थोडा अस्वस्थ होतो, नेमका कशामुळे माहीत नाही. त्यानंतर लोकप्रभामध्ये ज्यूंच्या छळछावण्यांबद्दलचा एक लेख वाचला. त्यामुळे अस्वस्थता अजून थोडी वाढली. अस्वस्थता घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या - चहा घेतला, नवी गाणी ऐकली, पेपर वाचला; पण अस्वस्थता जाईना. शेवटी आंतरजालावर भटकायला सुरूवात केली. एका ब्लॉगवर "सखी मन लागेना" ही बंदिश दिसली. अगदी नकळत मी कुमारांची "सखी मन लागेना" ही रेकॉर्डिंग लावली.

बागेश्री हा विरहरसप्रधान राग आहे असं वाचलेलं/ऐकलेलं आहे. मलापण बागेश्रीतील विरहरस जाणवतो. इतर वेळी, बागेश्री ऐकून अगदी थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. आज मात्र अगदी अनपेक्षित परिणाम घडला. जसजसा ती रेकॉर्डिंग ऐकत गेलो, तसतसं अस्वस्थता हळूहळू दूर होत गेली. मनात शांतता पसरायला लागली. रेकॉर्डिंग जेव्हा संपली तेव्हा मी पूर्ण normal ला होतो. अगदी अलगदपणे हा परिणाम घडला.

राग आणि रागातून व्यक्त होणाऱ्या भावनांचं वर्तुळ पूर्ण झालं.

Tuesday, April 21, 2009

दर्द से मेरा दामन भर दे...

रसिकतेचं आणि वेदनेचं नातं बरंच जवळचं आहे. जर वेदना नसेल तर जगणं फारच गुळचट/ स्वप्नाळू होउन जाईल. त्यामुळे केवळ आनंदासाठी कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं माझ्य़ा रसिकतेच्या भूमिकेत बसत नाही. त्यामुळे एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट गंभीर आहे किंवा शोकांत आहे म्हणून न बघणं मला पटत नाही. कलेची परिपूर्ण व्याख्य़ा करण्याएवढा अजून विचार झालेला नाही पण जी मला जगण्याच्या जास्त जवळ घेउन जाते, जो प्रत्येक अनुभव मला घेणं शक्य नाही तो अनुभव एका रुपात माझ्यापुढे मांडते ती कला असं मला वाटतं. यात रंजनाचा भाग आहे पण केवळ रंजन नाही.

मागे एकदा अभय बंग यांनी एका भाषणात फार सुंदर मुद्दा मांडला होता. आपण गरीबांच्या/पीडीतांच्या/वंचिताच्या/ निसर्गाच्या दु:खाशी का जोडून घ्यावं याचं उत्तर देताना ते म्हणाले की बाबा आमटे यांच्या आनंदवनात कुष्ठरोग झालेला एक मुलगा होता जो वेदनेसाठी देवाकडे प्रार्थना करायचा. जर वेदना झाली तर हातपाय जिवंत आहेत जर वेदना झाली नाही तर कुष्ठरोग आपलं जाळं पसरवतोय आणि आपण मृत्यूच्या जास्त जवळ जातोय. त्याचप्रमाणे समाजातील गरीबांच्या किंवा पीडीतांच्या दु:खाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि आपल्याच कोषात राहिलो तर आपल्याला मनाचा कुष्ठरोग व्हायला वेळ लागणार नाही. मग उरेल एक संवेदनाहीन मन जे कुठल्याच भावनांना अनुभवू शकणार नाही.

मला हा वेदनेचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे पटला. मी माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रीण आठवून पाहिले आणि मला जाणवलं की ज्या- ज्यावेळेस आमच्या दोघापैकी कुणीतरी एकजण दु:खात होतं त्यावेळेस त्याला/तिला दुसऱ्याने आधार दिला किंवा दु:ख समजावून घेतलं. त्या दु:खाच्या bond मुळेच मैत्री जास्त घट्ट होऊ शकली. केवळ मौजमजेवर आधारीत मैत्री फार जवळीक साधू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यासोबत दोन-तीन-चार वर्ष घालवलीत, फक्त मौजमजा केली ते मित्र/मैत्रिणी तेवढी वर्षं संपली की लगेच किंवा काही काळानंतर माझ्या भावविश्वातून दूर होत गेले.

काही दिवसांपुर्वी निर्माण शिबिरात एका सत्राची सुरूवात प्रियदर्शनने लताच्या ’दर्द से मेरा दामन भर दे’ या गाण्याने केली. त्यावेळेस हे गाणं आणि त्याचे शब्द खूपच आवडले. माझा हा लेख या गाण्यापासूनच सुचला. ’दर्द से मेरा दामन’ इथे ऐकता येईल. त्याचे शब्द इथे हिंग्लीश मधे आणि इथे हिंदी मध्ये वाचता येतील.

Friday, April 10, 2009

अर्थ

कवितेचा अर्थ लागणं ही एक शब्दांत सांगायला अवघड अशी प्रक्रिया आहे. त्यामुळेच एका व्यक्तीला लागलेला एखाद्या कवितेचा अर्थे दुसऱ्या व्यक्तीला जसाच्या तसा समजावून देणं नुसतं अवघड नाही तर काही कवितांच्या बाबतीत अशक्य आहे. जो अर्थ मला कळालाय असं वाटतं पण शब्दांत मांडता येत नाही तो दुसऱ्याला कसा काय समजावून सांगणार? तरीही कविता समजण्यासाठी रसग्रहण हा एक चांगला मार्ग आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ सांगणं नाही तर कवितेची सौंदर्यस्थळं दाखवून देणं. रसग्रहणाबद्द्ल पुन्हा केव्हातरी.

कवी अनिलांची कविता "अर्थ" वाचण्यात आली, जी वाचल्यावर वाटलं की मला कवितेचा अर्थ लागण्याची प्रक्रिया या कवितेतील प्रक्रियेशी बरीच मिळतीजुळती आहे. कविता भावली तर त्यातील शब्द बाजूला पडून त्या कवितेतील भावनांचा परिणाम राहतो. त्यामुळे एखाद्या कवितेपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया निरनिराळे विचार करत पुन्हा एकदा त्या कवितेपाशी येते आणि कवितेतील एखादी प्रतिमा किंवा कल्पना समजली नसेल तरी कवितेचा पूर्ण अर्थ लागल्याचा अनुभव येतो. अनिलांची कविता -

अर्थ
कुणाच्या कवितेत असलेल्या शब्दव्यूहांत
अर्थ शोधीत बसत नाही
वाहावल्या त्याच्या भावप्रवाहात वाहत जातो
बुडी घेऊन पाहतो ठाव कुठे लागतो
चाचपडत बुद्धीचे हात
तळचा गाळ उपसतात
त्यांना काही मिळत नाही
अटकतात चरण मात्र अंत:करणाचे असावधान
जीवनवेलीच्या तंतूने गुंफिल्या
बारीक मुळ्यांच्या कोवळ्य़ा गुंतागुंतीत
सुटतां सुटत नाहीत पाय फसत जातात
आत-बाहेर भिजून होऊन ओलाचिंब पुन्हा येता थडीवर
काही जरी सापडले नाही तरी
सार्थक होते!

- अनिल

Wednesday, April 8, 2009

माण्साने - अनावश्यक लेख

खरंतर हा लेख लिहायची गरज नसावी असं माझं मत होतं. त्यामुळेच माण्साने या कवितेला मी काहीही आगापीछा न लिहीता फक्त कविता टाकली होती. पण कौस्तुभशी बोलताना माझा हेतू तेवढासा सफल झालेला नाही आहे हे लक्षात आलं. लेख लिहायला कारणीभूत अजून एक गोष्ट म्हणता येईल. कुठलाही लेख लिहीला की ब्लॉग कमेंटस, काही इ-मेल आणि/किंवा काही प्रत्यक्ष भेटीतले उल्लेख त्या लेखाची पोच देत असतात. ’माण्साने’ या पोस्टच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. असं का व्हावं?

असं ध्यानात आलं की त्यातील कल्पना मध्यमवर्गी पांढरपेशाला रुचणाऱ्या नाहीयेत. त्या प्रतिमा/कल्पना धुवट या गटात मोडणाऱ्या नाहीयेत. त्यामुळे (फक्त) संदीप खरे टाईप लोकांना तर त्या पचणं जरा अवघडच आहे. मी स्वत: कवितेचा बऱ्यापैकी रसिक आहे. कविता ही भावनांचं expression आहे असं माझं मत आहे. त्या भावना अनुभवजन्य असतील व अनुभव प्रामाणिक असतील तरच ती कविता कुठेतरी मनास भिडते असं माझं मत आहे. त्यामुळे पाडगावकरांच्या ’प्रेम म्हणजे प्रेम..’ आणि ’सलाम’ ही कविता दोन्ही मला सारख्याच आवडतात. विंदाची ’साठीचा गझल’ आणि ’रक्तसमाधी’ मला सारख्याच आवडतात. अशी अगणित कवितांची यादी येथे देऊ शकेल. सांगण्याचा मुद्दा हा की फक्त विद्रोही कविताच उत्कृष्ट आणि बाकीच्या त्या कचकड्या असं माझं मुळीच मत नाही. कवितेत (पुरेसा) अनुभव नसेल तर किंवा अनुभवांना प्रामाणिकपणा नसेल तर कवितेत दंभ येतो. संदीप खरे टाईप कवी याचं उत्तम उदाहरण आहे.

आता थोडंसं ’माण्साने’ विषयी -
नामदेव ढसाळांबद्दल मला फारशी माहिती नाही. ही कविता त्यांच्या सुरूवातीच्या कवितांपैकी आहे. सुरूवातीच्या कवितांनंतर ढसाळांच्या कवितेचाही साचा बनत गेला असं माझ्या एका ज्येष्ठ मित्राचं आणि परिचयातल्या एका ज्येष्ठ लेखकाचं मत आहे. मला जे काही सांगायचंय ते फक्त प्रस्तुत कवितेबद्दल आहे.

ज्या माणसाला जन्म झाल्यापासून कायम अन्यायच झालेला आहे, त्या माणसाकडून शुद्ध भाषेची, धुवट पाढरपेशेपणाची अपेक्षा करणं हे नुसतं चूक नाही तर तो त्यावर अजून एक अन्याय आहे. माण्साने ही कविता अशा एका माणसाची प्रस्थापित व्यवस्थेबद्दलची चीड आपल्यासमोर मांडते. हा माणूस झालेल्या अन्यायाच्या संतापाने थरथर कापतोय आणि ही कविता लिहीतोय असं वाटतं. त्यामुळेच कधीकधी दोन वेगळ्या व्यक्तींना एकाच पारड्यात बसवलेलं आढळेल. अन्यायाची वेगवेगळी (आणि किंचीत परस्परांशी संबंध नसलेली) रूपं एकानंतर एक मांडलेली आढळतील. आता त्या कवितेतील प्रतिमा किंवा वर्णन केलेली अन्यायाची रूपं जरा भडक वाटली तरी नीट विचार केला तर जाणवेल की सध्याच्या अन्यायाचं स्वरूप तेच आहे फक्त ढसाळांनी ते वेगळ्या स्वरूपात आणि शब्दांत मांडलं. बरं, ढसाळांना नुसतीच प्रस्थापित व्यवस्थेला शिव्या द्यायच्यात असं नाही हे त्यांनी शेवटच्या कडव्यात दाखवून दिलंय. ’सर्वे सन्तु निरामय:’ या श्लोकातील किंवा पसायदानातील भावनेशी नातं सांगणारं शेवटचं कडवं आहे.

ही कविता मी सांगितलेल्या दोन्ही निकषांवर उतरते आणि म्हणून ती मला सुंदर वाटते आणि आवडते. ज्यांना संदीप खरे आवडतो पण अशा कवितांकडे बघायला नको वाटतं त्यांनी आपल्या मध्यमवर्गीय कल्पनांचा पुन्हा एकदा विचार करावा. मी आधी post केलेल्या कवितेवर काहीच प्रतिक्रिया (online/offline/प्रत्यक्ष) मिळाल्या नाहीत म्हणून हा लेख लिहीला.

Monday, February 23, 2009

काही योगायोग

एकदा किशोरींची मैफल ऐकून बाहेर येत होतो. फक्त मल्हार रागांवर आधारित मैफिल होती. किशोरीताईंनी ३-४ मल्हार गायले व शेवटी त्यांनी अडाणा मल्हार गायला. तो राग आणि बाकीचे मल्हार ऐकल्यावर असं जाणवलं की ज्या रागात गंधार (ग) स्वर महत्त्वाचा आहे किंवा ग स्वरावर विशेष focus आहे त्या रागांचं मल्हार रागावर चांगलं कलम होऊ शकतं. उदाहरणार्थ - दरबारी कानडा + मल्हार -> मियां मल्हार, अडाणा + मल्हार -> अडाणा मल्हार (दोन्ही रागांत ग वर आंदोलन आहे). मी ’ग’ स्वरावर विशेष focus असणारे बाकीचे राग आठवले. डोळ्यापुढे झिंझोटी, जयजयवंती हे राग आले. जयजयवंती आणि मल्हार यांचा मिश्र राग कसा असेल याचा विचार करू लागलो. डोक्यात रागस्वरूपावर विचार चालू होता. धडपडत का होईना डोळ्यापुढे रागस्वरूप उभं राहात होतं. घरी आलो, जयजयवंती व मल्हारावर आणखी माहिती मिळवावी म्हणून इंटरनेटवर गुगललं तर जयजयवंती आणि मल्हार यांचं मिश्रण असलेला जयंत मल्हार असा राग आधीच अस्तित्वात आहे हे कळालं. पं. बस्वराज राजगुरूंची या रागामधली recording मिळाली. त्याच्याशी मी विचार केलेलं रागस्वरूप त्याच्याशी बरंच जुळत होतं. माझे विचार कुठल्यातरी संगीतकाराशी थोडेसे का असेना जुळतात हे बघून छान वाटलं.

असाच आणखी एक योगायोग.
लॅबमधून रुमवर जाताना मी नेहमीच डोक्यात कुठलातरी राग घोळवत जायचो. त्यादिवशी नंद राग (मनातल्या मनात) गात चाललो होतो. नंद हा तीन रागांचं थोडंसं अवघड असं मिश्रण आहे - यमन, बिहाग आणि हमीर (हे राजन पर्रीकरांच्या site वरून स्पष्ट झालं), थोडाही तोल ढळला की नंद पार बिघडतो. 'ढूंढू बर सैंया' ही नंद रागातली प्रसिद्ध विलंबित बंदिश. यातील "बर सैं" या ठिकाणी आपल्याला बिहाग जाणवतो (सा-ग या आलापामधून). मी गात असताना मात्र एकदोनदा सा-ग ऐवजी चुकून सा-म असं गायलो आणि केदार रागाचा आभास निर्माण झाला. मला ते छान वाटलं. नंतर गाताना पण कधीकधी सा-म असं गायची इच्छा व्हायची. असं वाटलं की नंद आणि केदार यांचं मिश्रण करुन नवीन रागस्वरूप करता येईल का? थोडासा प्रयत्न केला पण नंद हा बऱ्यापैकी अवघड राग असल्याने नंद आणि केदार यांचं मिश्र स्वरूप खूप स्पष्टपणे दिसलं नाही. बऱ्याच दिवसांनी कुमारांच्या खूप साऱ्या खाजगी रेकॉर्डिंग मिळाल्या त्यात केदार नंद असा राग होता जो नंद आणि केदार रागाचा मिश्र राग आहे. पुन्हा एकदा छान वाटलं.

अजुन असे १-२ योगायोग आहेत. ते पुन्हा कधीतरी.

Wednesday, February 4, 2009

आमीर खाँ साहेब

काही दिवसापूर्वी लिहीलं होतं. त्यावेळेस publish करावंसं वाटलं नाही. आत्ता वाचून बघितलं तर माझं मलाच ठीक वाटलं.
============================================================

अचानक न ठरवता केलेल्या गोष्टींची मजा plan करून केलेल्या गोष्टींना येत नाही. खरेतर आज office मधे प्रचंड काम आहे. रात्रीचे ११ वाजलेत. उद्या गावाला जायचंय त्यामुळे काम करणे आवश्यक आहे पण गाणे व कवितांचा असा काही मस्त मूड लागलाय! आमीर खाँसाहेबांचा अतिशय सुंदर यमन ऐकतोय त्यामुळे काहीतरी लिहावं अशी इच्छा झाली.

मला आमीर खाँचा यमन मी सगळ्यात पहिल्यांदा ऐकला. साधारणतः ५-६ वर्षांपूर्वी. त्याआधी फक्त "मधुबन मे राधिका नाचे रे" या रफीच्या गाण्यातील शेवटच्या ताना आमीर खाँनी गायल्यात एवढंच माहीत होतं. त्या ताना ऐकून छान तर वाटायचं पण आमीर खाँच्या गायकीच्या उंचीचा अंदाज आला नाही. सुरुवातीला त्यांचे ३-४ राग प्रचंड आवडले. मग तेच राग पुन्हापुन्हा ऐकत गेलो. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी सापडत गेलं - अजूनही सापडतं. PG करताना बरंच गाणं (recorded स्वरूपातलं) ऐकलं आणि आमीर खाँच्या उंचीचा अंदाज येत गेला.

काही लोक प्रसिद्धिसाठी गातात, काही लोक त्यांचं/त्यांच्या घराण्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी गातात, काही लोकांना खूष करण्यासाठी गातात. पण काही लोक गाण्याच्या रूपातून आत्मतत्वाचा शोध घेत असतात. मला आमीर खाँ या category मधले गायक वाटतात. खरंतर शास्त्रीय संगीतात बुद्धिमान गायकांची कमी नाही. dedicated गायकांची पण कमी नाही. मग आमीर खाँचं वेगळेपण कोणतं? शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत मला नाही सांगता येणार. पण मला जाणवणारं वेगळेपण नक्कीच सांगू शकतो.

आमीर खाँ संगीत गात नसावेत, तर ते संगीत जगत असावेत. कारण त्यांचं कुठलंही recording घेतलं तरी आमीर खाँ एक अगदी नवीन विचार मांडत आहेत असं वाटत नाही, किंवा चमत्कृतीपूर्ण मांडणी करत नाहीत. आपल्याला जाणवणाराच विचार ते सांगताहेत असं वाटतं. एखाद्या व्यक्तीने स्वतः जगत नसलेला विचार मांडायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला काय सांगायचंय ते कळतं पण ते सांगणं/ तो विचार आतपर्यंत झिरपत नाही. आमीरखाँ साहेबांचं गाणं आतमध्ये झिरपतं त्यामुळे त्यांचं केवळ गाणं ऐकून, त्यांना प्रत्यक्ष न भेटताही त्यांच्या lifestyle चा, personality चा मला अंदाज येतो. वागण्या-बोलण्यात कुठलाही डौल नाही, अतिशय साधं वागणं/बोलणं . गाणं हा विषय सोडून दुसर्‍या विषयांबाबत विरक्ती म्हणता येईल एवढा अलिप्तपणा. कायम गाण्याचं चिंतन मनात. हे चिंतन काय असेल याचा मात्र थांग लागत नाही.

त्यांचं सगळं व्यक्तिमत्व त्यांनी गायलेल्या मारवा रागातून व्यक्त होतंय. धीरगंभीरपणा - आव आणलेला नव्हे तर जीवनाचं सार पचवून पण त्याचं जडत्व न आलेला. मी हा मारवा enjoy करत ऐकू शकत नाही. तो मला अस्वस्थ करतो तरीही ऐकावासा वाटतो. आपल्याला न उलगडणारी कोडी हा माणूस उलगडून सांगतोय असं वाटत राहतं, ती भाषा तर कळत नाही, पण या माणसाची प्रामाणिकपणा आणि अधिकार आत भिडतो आणि मी पुन्हा एकदा खोलवर विचार करू लागतो.